फाळणीच्यावेळी दुरावलेले भाऊ जेव्हा भेटले तेव्हा पाकिस्तानलाही अश्रू अनावर झाले

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा भारताने स्थलांतर अनुभवलं तेव्हा अनेकांच्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या आठवणी ताज्या झाल्या. या फाळणीदरम्यान अनेकांची हसती खेळती घरं उध्वस्त झाली. एका रात्रीतून सक्ख्याचं वैर झालं, होत्याचं नव्हतं झालं. जिवापाड जपलेली नाती तुटली, ज्यांचा चेहरा बघून दिवसाची सुरुवात व्हायची ते चेहरे बघण्यासाठी डोळे आसुसले गेले. जी लोकं म्हणजे आयुष्य होती तीच लोकं त्यांचं आयुष्य जगत आहेत की नाही, जिवंत आहेत की नाही याचीही कल्पना राहिली नाही. ज्यांच्या नावे आनंदाची, दुःखाची कोणत्याही भावना व्यक्त करणारी पत्रं हमखास लिहिली जायची ती पत्रं लिहायला कागद आणि पेन तर राहिला पण पत्रं पाठवण्यासाठी पत्ताच राहिला नाही.

फाळणीच्या दरम्यानचं स्थलांतर आणि तेव्हा घडलेल्या घटना आजही पुस्तकात वाचताना पुस्तकांच्या पानातून वेदनेच्या किंचाळ्या ऐकू येतात. सनी देओलच्या गदर आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटांतील  फाळणीची दृश्य अंगावर शहारे आणतात. प्रत्यक्षदर्शी नसतानाही कित्येक लोक फाळणीचं नाव काढलं की निःशब्द आणि सुन्न होतात, तेव्हा ज्यांनी ते सर्व प्रत्यक्ष अनुभवलं असेल त्यांच्या भावनांचा माग काढणंही अवघड आहे.

अशा फाळणीच्या वेळी दुरावलेल्या लोकांनी अनेकदा आपल्या आप्तेष्टांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलं आहे. शक्य होईल त्या माध्यमांच्या मदतीने अजूनही अनेकांचा तपास चालूच आहे. त्यात काहींना यशही मिळालं आहे. याचं ताजं उदाहरण नुकतंच भारताने अनुभवलं आहे. फाळणीच्या वेळी दुरावलेले दोन भाऊ तब्बल ७४ वर्षानंतर बुधवार १२ जानेवारी २०२२ ला भेटले आहेत. आणि त्यांचा हा भावनिक क्षण फाळणीच्या जखमांवर सुखद मलम लावताना संपूर्ण भारत अनुभवतो आहे.

मोहम्मद सदीक आणि मोहम्मद हबीब आका असं या दोन्ही भावांचं नाव आहे.

पाकिस्तानातील फैसलाबाद येथे मोहम्मद सदीक राहतात. तर त्यांचा मोठे बंधू मोहम्मद हबीब आका उर्फ शैला हे भारतातील पंजाबमधील फुलनवाल या ठिकाणी राहतात. १९४७ ला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी एकमेकांपासून दुरावलेल्या या दोन्ही भावांची भेट शक्य झाली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून.

फाळणीच्या वेळी सादिक हे लहान होते. फाळणीदरम्यान, सादिक हे पाकिस्तानात गेले आणि त्यांचा मोठा भाऊ हबीब हे भारतात आले. दोघांची पहिली भेट व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर झाली होती, आणि आता हे एकमेकांना समोरासमोर भेटले. सदीक हे पाकिस्तनातून आपल्या मोठ्या भावाची भेट घेण्यासाठी आले होते. करतारपूरमध्ये दोघांची भेट झाली.

करतारपूर कॉरिडॉर हा पाकिस्तानला भारताच्या सीमेशी जोडणारा भाग आहे. कॉरिडॉरमध्ये पाऊल ठेवताच भेटीसाठी आलेल्यांना पहिली सूचना दिली जाते ती म्हणजे भारतीय कोणत्याही पाकिस्तानीशी बोलणार नाही किंवा नंबरची देवाणघेवाण करणार नाहीत. कॉरिडॉरवर एखादा भारतीय पाकिस्तानशी बोलताना दिसला तरी पाक रेंजर्स त्यांना अडवतात. हे दोघेही भाऊ याच कॉरिडॉरला भेटले. भेटता क्षणी दोन्ही भाऊ एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडू लागले.

त्यांचा हा भावनिक क्षण बघून तिथे उपस्थित  सगळ्यांच्याचेच अश्रु अनावर झाले. अगदी पाक रेंजर्सही भावूक झाले आणि दुपारी ४ वाजेपर्यंत या दोन भावांना वेगळे करण्याचे धाडस कोणीही केलं नाही.

दोन्ही भावांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली. इतकी वर्ष कोण काय करत होतं, दिवस कसे गेले सगळं विचारलं.  हबीब यांनी त्यांचे भाऊ सिदीक यांना सांगितल्यानुसार, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आईच्या सेवेत वाहून घेतलं. त्यांनी लग्नही केलं नाही. भेटीनंतर हबीब यांनी करतारपूरच्या उपक्रमाचं कौतुक केलं. कॉरिडॉर सुरू केल्यानं मला माझ्या भावाशी पुन्हा भेटता आलं, असं हबीब यांनी सांगितलं. शिवाय या कॉरिडॉरच्या माध्यमातून ते परत एकमेकांना भेटतील, अशी ग्वाही देत या भावांनी एकमेकांचा निरोप घेतला.

फाळणीच्या वेदना अजूनही कशा ताज्या आहेत हेच या दोन्ही भावांच्या भेटीने परत एकदा सिध्द केलं आहे. भारत – पाकिस्तान फाळणीने दोन देश तर पाडले पण अनेकांच्या हृदयाचेसुद्धा दोन भाग केले आहेत. मात्र हे दोन्ही भाऊ भेटले अशा घटना एक गोष्ट स्पष्ट करतात की मनाने जुडलेली नाती कितीही प्रयत्न केले तरी तुटत नाहीत. आणि एकमेकांचा शोध घेत भेटण्याचे पर्याय शोधून काढतात. अशावेळी कोणत्याही देशाच्या सीमाही त्यांना थांबवू शकत नाही.

या भावांच्या भेटीची ही घटना फाळणीच्या ग्रंथातील सुखद अध्याय म्हणून आपण पाहू शकतो. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.