देशाच्या इतिहासात सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपद भूषविलेला एकमेव माणूस !

मोहम्मद हिदायतुल्ला यांचा आज स्मृतिदिन.

अतिशय प्रतिष्ठीत विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ असलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म १७ डिसेंबर १९०५ रोजी एका उच्चभ्रू मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील उर्दूतील नामवंत कवी होते. त्यांच्याकडूनच मोहम्मद हिदायतुल्ला यांना साहित्यिक वारसा मिळाला.

पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तेथे त्यांच्या अत्युत्तम शैक्षणिक कामगिरीबद्दल हिदायतुल्ला यांना दुसऱ्या ऑर्डर ऑफ मेरीट आणि सुवर्णपदकाने गौरविण्यात आलं. त्याचवेळी त्यांची ‘इंडियन मजलिस’ या संघटनेच्या अध्यक्षपदी देखील निवड झाली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले आणि नागपूर उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी कायदा आणि इंग्रजी भाषेचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली.

भारताचे पहिले मुस्लीम सरन्यायाधीश 

नोव्हेंबर  १९५६ साली जेव्हा ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले, त्यावेळी ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणारे सर्वात तरुण न्यायाधीश ठरले होते. २ वर्षानंतर ज्यावेळी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, त्यावेळी देखील त्यांनी याच विक्रमाची पुनरावृत्ती केली.

१० वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राहिल्यानंतर २८ फेब्रुवारी १९६८ रोजी ते देशाच्या सरन्यायाधीश पदावर विराजमान झाले. भारताचे  सरन्यायाधीश बनलेले ते पहिलेच मुस्लीम ठरले. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्वपूर्ण निर्णय दिले. मुलभूत हक्कासंदर्भातील गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य सरकार हा ऐतिहासिक निर्णय देखील त्यांच्याच कार्यकाळातला.

२ वेळा देशाच्या राष्ट्रपतीपदी 

हिदायतुल्ला देशाचे सरन्यायाधीश असतानाच १९६९ साली राष्ट्रपती झाकीर हुसैन  यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तत्कालीन उपराष्ट्रपती वराह व्यंकट गिरी हे देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती झाले.

परंतु व्ही.व्ही. गिरी यांनी १९६९ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हिदायतुल्ला साधारणतः महिनाभराच्या कालावधीसाठी देशाचे राष्ट्रपती बनले.

त्यांच्या या महिनाभराच्या राष्ट्रपतीपदाच्या कालावधीत अमेरिकेचे तत्कालीन राष्टाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारताचा दौरा केला. या अतिशय महत्वाच्या दौऱ्यामुळे हिदायतुल्ला यांचा एका महिन्याच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळाला देखील भारताच्या राजकीय इतिहासात वेगळं महत्व प्राप्त झालं.

१९७९ ते १९८४ या कालावधीत हिदायतुल्ला देशाच्या उपराष्ट्रपती बनले. परंतु १९८२ साली तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग हे वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेल्यामुळे परत एकदा कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. यावेळी मात्र त्यांना राष्ट्रपती म्हणून जवळपास १ वर्षाचा कालावधी मिळाला.

अशाप्रकारे देशाचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे तिन्ही पदे भूषविणारे हिदायतुल्ला हे देशाच्या इतिहासातील एकमेव व्यक्तिमत्व ठरले.

प्रतिष्ठीत विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ असणाऱ्या हिदायतुल्ला यांनी अनेक पुस्तकांचं देखील लिखाण केलं. ते भाषाप्रेमी देखील होते. हिंदी, उर्दू, इंग्रजी यांव्यतिरिक्त त्यांना बंगाली आणि संस्कृत भाषा देखील अवगत होत्या.

हे ही वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.