शिवाजी राजांचा तिसरा डोळा !!!!

स्वराज्याचा कान, नाक, डोळे कोण होते ? असं कोणी विचारलं तर, स्वराज्याचा एक एक मावळा हे उत्तर कोणत्याही मराठी माणसाच्या मुखातून सहज येईल. या मावळ्यांच्या साथीनेच शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती झाले. 

आजचा दिवस म्हणजे स्वराज्याचा सुवर्णक्षण. स्वराज्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेल्या प्रत्येक मावळ्याचं कर्तृत्व आजच्या दिवशी साकार झालं. 

जेव्हा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा विषय निघतो तेव्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून काम केलं अशा बहिर्जी नाईकांचा उल्लेख अभिमानाने करावा लागतो. बहिर्जी नाईक शिवरायांच्या लष्कारात नेमके कसे सहभागी झाली याबाबत अनेक मतप्रवाह आहेत काही इतिहासकारांच्या मते स्वराज्यात लांडगे आणि कोल्ह्यांची संख्या जास्त झाल्यानंतर शिवाजी राजांनी त्यांची शेपटी आणुन देणाऱ्यांना ईनाम ठेवलं. बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त शेपट्या आणुन दिल्याने ते मावळ्यांच्या रुपात स्वराज्य कार्यात जोडले गेले तर काहींच्या मते शिवाजीराजे शिमग्याचा खेळ पाहत होते. या खेळात अनेकांची हुबेहुब नक्कल करणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले.

बहिर्जी नाईकांच्या स्वराज्यकार्यात समाविष्ठ होण्याचा इतिहास वेगवेगळा असला तरी त्यांच्या पुढील कार्याबद्गल कोणाचच दुमत नाही. 

अफजलखान वधाच्या वेळी बहिर्जी नाईक खानाच्या सैन्यात सैनिक म्हणून भरती झाले. खानं काय खातो, काय पितो, सैन्य किती यांची पुर्ण माहिती शिवाजीराजांपर्यन्त पोहचवण्याच काम बहिर्जी नाईक यांनी अफजलखानाच्या फौजेत सैनिक राहून केलं.  अफजलखानाचा डाव हा शिवाजीराजांना संपवण्याचा आहे ही माहिती देखील त्यांनीच दिली पुढे अफजलखान चिलखत न घालता भेटीस येणार असल्यांची माहिती बहिर्जी नाईकांमुळेच मिळाल्याचं इतिहासतज्ञ सांगतात. 

सुरत लुटीदरम्यान शिवाजी राजांनी सुरतेच्या सुभेदार इनायतखानास निर्वाणीचे पत्र दिले त्यात त्यांनी सुरतेच्या  हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावे लिहली होती. कोसो दूर असणाऱ्या शिवाजींना आपल्या शहरातील धनिकांची नावे देखील माहित असल्याचं समजल्यानंतर सुरतेत एकच दहशत पसरली होती. याचं महत्वाचं कारण म्हणजे बहिर्जी नाईक चार ते पाच महिने वेषांतर करुन सुरतेत रहायला होते. 

लुटीदरम्यान महाराजांच्या शेजारी असणाऱ्या बहिर्जी नाईकांना ओळखलं होतं. बहिर्जी नाईकांना ओळखण्याचा हा इतिहासातील एकमेव प्रसंग. शिवराज्याभिषेकाचं जे चित्र आपण पाहतो त्यामध्ये महाराजांना मुजरा करणारा जो इंग्रज आहे त्याचं नाव हेन्री ओग्झेन्दन त्याचा भाऊ सुरत लुटीदरम्यान आपली वखार वाचावी म्हणून महाराजांजवळ पोहचला. तेव्हा महाराजांच्या जवळ असणारी व्यक्ती हिच गेली चार पाच महिने सुरतमध्ये भिकाऱ्याच्या वेषात फिरत असल्याचं या इंग्रजांने ईस्ट इंडियाला लिहलेल्या पत्रात सांगितलं आहे. 

FACEBOOK

उंबरखिंडीत कारतलब खानाच्या २०,००० सैन्याचा महाराजांनी धुव्वा उडवला होता. खान कोकणात जाण्यासाठी बोर खिंडाचा मार्ग निवडणार असल्याची माहिती होती. मात्र खानाने देखील गनिमी कावा करण्याचं ठरवलं होतं व त्यांनी अचानक बोर घाटाच्या ऐवजी उंबरखिंडीच्या मार्गाने कोकणात जाण्याचं ठरवलं. अचानक बदलण्यात आलेला हा निर्णय तितक्याचं वेगाने महाराजांच्या जवळ पोहचवण्याचं काम बहिर्जी नाईकांनी पार पाडलं. स्वराज्याचे मावळे लागलीच उंबरखिंडीत डेरेदाखल झाले. आघाडीवरुन आणि पिछाडीवरुन हल्ला करत खानाच्या फौजेला उंबरखिंडीत सळो की पळो करुन सोडलं. त्यामुळेच खानाच्या २०,००० फौजेला महाराजांपुढे शरणागती पत्करावी लागली. 

काहीसा असाच किस्सा शाहिस्तेखानाचा. शाहिस्तेखानावर महाराज स्वत: चालून गेले. खान खातो काय पितो काय  इथपासून ते तो रात्री कोणत्या मार्गाने चालतो. कुठल्या खोलीत झोपतो याची इंत्यभूत माहिती महाराजांना बहिर्जी नाईक यांनी पोहचली होती.  त्यातूनच पुढे शाहिस्तेखानावर हल्ला करण्यात यश आलं. 

बहिर्जी नाईक हे गुप्तहेर. महाराजांनी बहिर्जी नाईकांना सरदार पदवी देवू केली. ३००० गुप्तहेरांची फौज बहिर्जींबरोबर असायची. गुप्तहेर असल्या कारणाने त्यांचे अनेक किस्से इतिहासांचा पानावर आले नाहीत. ते स्वराज्यात कसे आले याबाबत जसे मतभेद आहेत तसेच ते कसे गेले याबद्दल देखील मतभेत आहेत. कोण म्हणतं जखमी अवस्थेत असणारे बहिर्जी भूपाळगडावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात आले आणि तिथेच त्यांनी प्राण सोडला तर कोणी सांगत गडावरच हेरगिरी करत असताना त्यांचा मृत्यू झाला. 

अनेक मावळ्याप्रमाणेच स्वराज्याच्या हा सुवर्णक्षण आला. यात बहिर्जी नाईक शिवाजीराजांचा तिसरा डोळा म्हणून कामी आले.