लोकमान्य टिळक, बाळासाहेब, राज ठाकरे अन् नवनीत राणा एक गोष्ट कॉमन आहे : कलम १५३

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीनं पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. कलम १५३ अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा हा अजामीनपत्र असल्यानं राणा दाम्पत्याला बांद्रा येथील कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं आता मातोश्री बंगल्यापुढं हनुमान चालीसा म्हणण्यापासून चालू झालेला राडा आता अजूनच लांबणार हे फिक्स झालं आहे.

यामध्ये भारतीय दंड सहिंतेचं कलम १५३ A हे महत्वाची भूमिका बजवणार आहे. 

भारतीय दंड संहितेतील एक विवादित कलाम म्हणून या कायद्याचा इतिहास आहे. अगदी लोकमान्य टिळकांपासून, बाळासाहेब आणि राज ठाकरेंपर्यंत अनेक जणांवर या कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

त्यामुळं पाहिलं बघू हे कलम नक्की काय आहे ते.

धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व  शत्रुत्व निर्माण करण्याची कोणी कृती करत आले तर त्या व्यक्तीवर या कलमांतर्गत कारवाई करण्यात येते.हा गुन्हा दखलपात्र गुन्हा मानण्यात येतो आणि त्यासाठीची शिक्षा तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

प्रार्थनास्थळामध्ये जाऊन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यास गुन्ह्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. 

त्यामुळं जी चिथावणीखोर भाषणं, वक्तव्य किंवा कृती असतात त्याविरोधात हे कलम लावण्यात येतं.मात्र चिथावणीखोर वक्त्याची नेमकी कोणती आहेत याची काही प्रॉपर डेफिनेशन नसल्यानं अनेकदा या कलमाच्या वापरामुळं गदारोळ निर्माण होतो.

या कलमांतर्गत भारतात शिक्षा झालेलं पाहिलं व्यक्तिमत्व होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 

१८८६च्या भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १५३-A अंतर्गत दोषी ठरलेले टिळक हे कदाचित पहिले आणि एकमेव मोठे राजकीय नेते ठरले. १२ मे १९०८ रोजीच्या केसरीच्या संपादकीयासाठी त्यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मे मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती आणि १७ जुलै १९०८ रोजी न्यायमूर्ती डावर आणि सहा युरोपियन आणि तीन पारसी यांचा समावेश असलेल्या ज्युरीसमोर केस सुनावणीसाठी आली तेव्हा टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली. सात विरुद्ध दोन जणांच्या निकालाने त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

या निकालावर बोलताना टिळक यांनी तो निर्णय चुकीचा असून मी निर्दोष आहे हे सांगितलेलं.

आज मुंबई हायकोर्ट मध्ये याच केसचा उल्लेख असलेला फलक लावला आहे ,ज्यात टिळक यांना कसे चुकीच्या पद्धतीने हा कायदा वापरून शिक्षा केले असा उल्लेख आहे.

लोकमान्य टिळकांच्या खटल्याच्या या निकालावर केवळ भारतातच नव्हे तर इंग्लंडमध्येही तीव्र टीका झाली होती. 

काळ बदलत गेला. महाराष्ट्रात या कायद्याची अजून एकदा चर्चा झाली ती म्हणजे छगन भुजबळ हे  उपमुख्यमंत्री गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची परवानगी दिल्यानंतर. मुंबई दंगल प्रकरणी त्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचं फर्मान काढलं होतं. 

१९९२-९३च्या दंग्यांदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवून बाळासाहेबांवर १५३A लावण्यात आलं होतं.  

याच गुन्ह्यासाठी त्यांना २४ जुलै २००० ला तब्बल ७ वर्षांनी अटक करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई अक्षरश: थांबली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बाळासाहेबांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. 

मात्र अटकेनंतर काही तासातच बाळासाहेबांना जामिनावर सोडण्यात आलं.

त्यानंतर २००८ मध्ये जेव्हा राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती तेव्हा देखील मुंबईमध्ये असाच कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.  रेल्वे भरती परीक्षेसाठी कल्याणमध्ये आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात राज यांच्यावर कल्याण पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये १५३ A चा देखील समावेश होता. 

तेव्हा राज ठाकरेंना बेल भेटायच्या आधी एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती.

आता नवनीत राणा यांच्यावर देखील हाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं या गुन्ह्यात त्या किती अडचणीत येतात हे येणाऱ्या काळात कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.