सिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली ?

“आणि मग शिक्षणाने पुरुष जग चालवायला शिकला, अन महिला घर चालवायला”

एखाद्या स्त्रीवादी संघटनेच्या लढ्यातील किंवा मोर्चातील फलकावर शोभावं असं हे वाक्य. पण गल्लत करू नका, कुठल्याही स्त्रीवादी संघटनेचा या वाक्याशी कसलाही संबंध नाहीये. हे वाक्य आहे महिलांच्या सिग्रेटचं प्रमोशन करण्यासाठी १९७५ साली करण्यात आलेल्या ‘व्हर्जिनिया स्लीम्स’च्या जाहिरातीतलं.

सद्यस्थितीत सिग्रेटला स्त्रिवादाचं प्रतिक म्हणून प्रमोट करण्याचा ट्रेंड जोर धरतोय. पण खरंच सिग्रेटचा आणि फेमिनीझमचा काहीएक संबंध आहे का, की ही फक्त सिग्रेट कंपन्यांची एक मार्केटिंग गिमिक आहे..? आम्हालाही हा प्रश्न सतावत होताच. म्हणूनच आम्ही या विषयाला हात घातला आणि जे काही सापडलं ते तुमच्याशी शेअर करण्याचा हा प्रयत्न केला …

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम म्हणजे काय ..?

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं तर समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळावी, केवळ लिंगाधारित भेदभावामुळे जे स्वातंत्र्य महिलांना जन्मतःच मिळालंय ते त्यांच्यापासून हिरावलं जाऊ नये, सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय पातळीवर स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी लढणारी, स्त्रियांच्या स्वातंत्र्य अस्तित्वासाठी आग्रही असणारी, चळवळ होय. (ही काही स्त्रीवादाची व्याख्या असल्याचा आमचा दावा नाही. यापलीकडेही स्त्रीवादाचे अनेक कंगोरे असल्याची आम्हाला कल्पना आहेच. तूर्तास फक्त वाचकांसाठी फेमिनिझमचं इंट्रोडक्शन म्हणून या माहितीकडे बघण्यात यावं.)

महिलांनी सिग्रेट पिण्याची सुरुवात…

महिलांनी मोठ्या प्रमाणात सिग्रेट पिण्याची सुरुवात सर्वप्रथम पहिल्या महायुद्धानंतर झाल्याचं बघायला मिळतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना त्यांच्या खाद्यासह सिग्रेट देखील दिल्या जायच्या. या महायुद्धात पुरुष सैनिकांबरोबरच महिलांचाही समावेश होता. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागलेल्या स्त्रियांनीही सिग्रेट प्यायला सुरुवात केली. तरुण मुलींमध्ये हे प्रमाण अधिक होतं. एव्हाना स्टाईल स्टेटमेंट आणि बंडखोरीचं प्रतिक म्हणूनही मुलींनी स्मोकिंग करायला सुरुवात केली होतीच.

महिलांच्या सिग्रेट पिण्यासंदर्भातील एक किस्सा तर अतिशय मजेदार आहे. अमेरिकेतील एका हॉटेल मॅनेजरने जेव्हा सिग्रेट पिणाऱ्या महिलांविषयी नाराजी व्यक्त करताना असं म्हंटलं की, “सिग्रेटसारख्या खेळण्याशी नेमकं कसं खेळायचं हेच या महिलांना कळत नाही. ते खेळणं नीट हाताळताही येत नसल्याने या महिला खेळातील मजा घालवतात” त्यावेळी त्याला उत्तर म्हणून फिलीप मॉरीस यांनी तर महिलांना सिग्रेट प्यायला शिकवणारी व्याखानमालाच सुरु केली. हे फिलीप मॉरीस म्हणजे आजघडीचा सिग्रेटचा आघाडीचा ब्रॅण्ड असणाऱ्या ‘मार्लबोरो’ची उत्पादक कंपनी ‘फिलीप मॉरीस इंटरनशनल’ ज्यांच्या नावावरून आहे, तेच.

‘इस्टर संडे परेड’ आणि ‘एडवर्ड बर्निझ’

फेमिनिझम आणि सिग्रेटचा संबंध समजावून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम १९२९ ला झालेल्या ‘इस्टर संडे परेड’ विषयी जाणून घेणं अगत्याचं ठरतं. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये सहभागी व्हायचं आणि न्यूयॉर्कमधील सार्वजनिक ठिकाणी जमा होऊन, सिग्रेट पिण्याचं आवाहन महिलांना करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे महिलांनी परेडमध्ये सहभागी व्हावं यासाठी आणि सिग्रेटच्या खर्चासाठी फंडिंगही करण्यात आलं होतं. शिवाय परेडचे व्यवस्थित छायाचित्रण करण्यासाठी, व्यावसायिक फोटोग्राफर्सना बोलावून सर्व वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून परेडच्या बातम्या आणि सिग्रेट ओढणाऱ्या महिलांचे फोटोज छापून येतील याची व्यवस्थित काळजी देखील घेतली गेली होती. या सगळ्यांमागचे मास्टरमाईड म्हणजे जनसंपर्क क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘एडवर्ड बर्निझ’ हे होत. जे त्यावेळी ‘अमेरिकन टोबॅको कंपनी’ या सिग्रेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या जनसंपर्काचे काम बघत असत.

फेमिनिझमचं सिग्रेट कनेक्शन

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महिलांनी सिग्रेट पिणं, ही गोष्ट प्रस्थापित सामाजिक संकेतांच्या विरुद्ध होती. वेश्यावृत्तीकडे कल असणाऱ्या स्त्रिया सिग्रेट पितात, असं समजलं जायचं. सिग्रेटचा संबंध स्त्रियांच्या चारित्र्याशी जोडला जायचा. ज्या कुणी महिला सिग्रेट प्यायच्या त्या आपल्या घरी किंवा खासगी जागेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सिग्रेट पिण्याची परवानगी नव्हतीच. जेनी लॅशर या महिलेला तर आपल्या मुलांसमोर सिग्रेट प्यायल्याने महिनाभराचा तुरुंगवासही भोगायला लागला होता. थोडक्यात काय तर सिग्रेट ही ‘पुरुषी’ गोष्ट समजली जायची. ही कोंडी फोडण्यासाठी काही लोकांनी मग सिग्रेटला स्त्री-पुरुष समानता आणि स्त्रीमुक्तीचे प्रतिक म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच सिग्रेट आणि स्त्री मुक्तीच्या संदर्भातील ‘स्वातंत्र्याच्या मशाली’ (Torches of Freedom) या मोहिमेची सुरुवात झाली.

Torches of Freedom- ‘स्वातंत्र्याच्या मशाली’

 

‘Torches of Freedom’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम वापरला तो अब्राहम ब्रील या ऑस्ट्रियन मानसशास्त्राज्ञाने. स्त्रीमुक्ती आणि स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात बोलताना, ‘सिग्रेट पिणं ही महिलांची तीव्र आंतरिक इच्छा असू शकते’ असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यांच्या याच प्रतिपादनाचा उपयोग पुढे एडवर्ड बर्निझ यांनी अतिशय खुबीने ‘Torches of Freedom’ ही मोहीम राबवताना केला. सिग्रेटचा संबंध त्यांनी स्त्री-पुरुष समानतेशी आणि स्त्रीमुक्तीशी जोडला. मोठ्या प्रमाणात महिलांना सिग्रेट पिण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी ही मोहीम राबविली.

१९२९ साली एडवर्ड बर्निझ ज्यावेळी ‘Torches of Freedom’ मोहिमेची तयारी करत होते त्याच पार्श्वभूमीवर, ‘अमेरिकन टोबॅको कंपनी’चे अध्यक्ष ‘जॉर्ज वाशिंग्टन हिल’ याचं महिलांच्या सिग्रेट उत्पादनामधील गुंतवणुकीसंदर्भातील एक विधान अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांनी म्हंटलय की, “महिलांच्या सिग्रेटच्या उत्पादनात गुंतवणूक करणं, हे घरासमोरच्या परसबागेत सोन्याची खाण सुरु करण्यासारखं असेल” विशेष म्हणजे एडवर्ड बर्निझ हे त्यावेळी याच कंपनीच्या जनसंपर्काचे काम बघत होते.

‘Torches of Freedom’ हे खरं तर सिग्रेटचा स्त्रीमुक्तीशी संबंध जोडून, महिलांच्या सिग्रेटच्या प्रमोशनसाठी, सिग्रेट उत्पादक कंपन्यांनी राबवलेलं अभियान होतं. ज्यामुळे अर्थातच सिग्रेट उत्पादक कंपन्यांना खूप मोठं मार्केट उपलब्ध होणार होतं. अभियान यशस्वीतेनंतर तसं ते झालं देखील. जगभरात सिग्रेट पिणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आजघडीला जगभरात सिग्रेट पिणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होत असताना महिलांच्या बाबतीत मात्र हा आकडा वाढतो आहे, ही परिस्थिती यासंदर्भात बरीच बोलकी आहे.

आमची भूमिका- ‘स्मोकिंग’ करणं हे महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील आरोग्याच्या दृष्टीने घातकच असल्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महिलांच्याच काय तर पुरुषांच्या देखील ‘स्मोकिंग’चं समर्थन करण्याचं कुठलंही कारण आम्हांस सापडलेलं नाही. परंतु आम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याने कुठल्याही व्यक्तीने स्मोकिंग करावं किंवा करू नये यासंदर्भातील निर्णय आम्ही संबंधित व्यक्तीच्या विवेकावर सोडून देतो. फक्त महिलांनी स्मोकिंग करताना त्याचा संबंध फेमिनिझमशी जोडून उगाच उथळपणाचं प्रदर्शन करू नये, असं आम्हांस वाटतं.

तळटीप- ही माहिती संकलित करताना आम्हाला सिग्रेटच्या झुरक्यांचा लाभ झालेला असल्याने आम्ही ‘मार्लबोरो’च्या ऋणातच राहू इच्छितो.

Leave A Reply

Your email address will not be published.