वसंतदादांच्या या निर्णयामूळं काँग्रेस नेत्यांची पोरबाळं राजकारणात आली…
कोणी कितीही नाही म्हटल तरी काँग्रेसमध्ये घराणेशाही वरपासून खालीपर्यंत फोफावली आहे हे मान्यच करावे लागेल. पण काही वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. ब्रिटिशांच्याविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातून आलेले नेते काँग्रेस पक्ष आणि पर्यायाने सरकार चालवत होते. खेडोपाडी गांधी टोपी घालणारे काँग्रेसचे कार्यकर्ते दिसायचे.
साधारण सत्तरच्या दशकात राजकारण बदलत गेलं. अनेक वर्ष सत्तेच्या उबेत राहून काँग्रेसमधला चळवळीतला कार्यकर्ता हरवला.
इंदिरा गांधी व त्यांचा मुलगा संजय गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीमुळे अनेकजन काँग्रेसपासून दुरावले. स्वतःच्या करिष्म्यावर राजकारणात आपली जागा बनवणाऱ्या इंदिराजींनी सत्तेतली अस्थिरता व असुरक्षितता यामधून आपला वारसदार म्हणून आधी संजय गांधी व नंतर राजीव गांधी यांना निवडून काँग्रेसमध्ये घराणेशाहीची पहिली मुहूर्तमेढ रोवली.
हाच पायंडा दिल्लीपासून गल्लीपर्यंत दिसून येऊ लागला. महाराष्ट्रातील राजकारणात मात्र अजूनही जुन्या नेत्यांची पकड कायम होती. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण हे सगळे नेते स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते. यशवंतराव चव्हाणांनी आपला वारसा शरद पवारांना सोपवला मात्र त्यांनी वसंतदादा पाटलांचा विश्वासघात करून काँग्रेस फोडली.
इथून सुरु झाला महाराष्ट्रातील काँग्रेसचा सावळागोंधळ.
आधीच राष्ट्रीय काँग्रेसच आय काँग्रेस, अर्स काँग्रेस असे विभाजन झालेले त्यात ही शरदरावांची सोशालीस्ट काँग्रेस व जनसंघ वगैरे सगळ्यांना घेऊन स्थापन केलेले पुलोद सरकार.
गावपातळीवर एकेकाळी खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. प्रत्येक नेत्याचे वेगळे गट निर्माण झाले. यशवंतराव व वसंतदादा या प्रतीसरकारच्या काळापासून पक्के दोस्त असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्यातही वितुष्ट आले. आपले मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी पाडले असा गैरसमज दादांना झाला होता. याच ईर्ष्येतून त्यांनी आपली पत्नी शालिनीताई यांना साताऱच्या लोकसभा निवडणुकीत यशवंतरावांच्या विरुद्ध उभे केले.
पुढे काही वर्षांनी या दोन्ही मित्रांची दिलजमाई झाली. यशवंतराव आय काँग्रेसमध्ये परतले. महाराष्ट्रातील सत्तेची पॉवर आपल्या हातातून निसटू नये अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयोग करणाऱ्या इंदिरा गांधीनी अखेर १९८३ साली जनमाणसावर आणि संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्री केलं.
पुढे एका वर्षातच इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यावेळची लोकसभा न भुतोनभविष्यती अशा बहुमताने जिंकली. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेत उमटलेला आक्रोश व सहानुभूती लाट यामध्ये विरोधी पक्ष उडून गेले. भाजपचे पूर्ण देशभरात फक्त २ खासदार निवडणून आले. काँग्रेसचे ४१४ खासदार हा एकप्रकारचा विक्रम होता.
मात्र महाराष्ट्रात या निवडणुकीला एक दुःखद किनार सुद्धा होती,
मतदानाच्या आधीच काही दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाणांचे निधन झाले होते.
तरीही राज्यात काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले. शरद पवारांच्या काँग्रेसची धूळधाण उडाली. एवढे प्रचंड यश मिळाल्या मुळे आय काँग्रेसचा आत्मविश्वास गगनाला पोहचला होता. भारताचा सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा मान मिळवणाऱ्या राजीव गांधीनी काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याचे सुतोवाच केले.
जास्तीतजास्त तरुणांनी राजकारणात यावे ही राजीव गांधींची इच्छा होती. त्यांचे अनेक उच्चशिक्षित मित्र आपली नोकरी सोडून सरकारमध्ये सामील झाले होते. गावपातळीपर्यंत असेच व्हावे असे आदेश त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पुढच्याच वर्षी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आल्या. राजीव गांधींच्या कॉम्प्युटर वापरणाऱ्या सल्लागारांनी संशोधन केले आणि त्याला धरून पक्षश्रेष्ठींनी एक अजब निर्णय जाहीर करण्यात आला.
“महाराष्ट्रातील ज्या काँग्रेस आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत, त्या आमदाराला १९८५ च्या विधानसभा निवडणूकीच तिकीट द्यायचे नाही.”
या धोरणाचा फटका महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना बसला.
गटबाजीवर आळा बसावा म्हणून राजीव गांधीनी छडी उगारली होती. त्याचा फटका वसंतदादांच्या मंत्रीमंडळातील १३ मंत्र्यांना देखील बसला होता. यात मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे तीन मंत्रीदेखील होते. लातूरचे शिवाजीराव पाटील निलंगेकर, जळगावच्या प्रतिभाताई पाटील आणि इचलकरंजीचे कल्लाप्पा आवाडे.
प्रतिभाताई पाटील या एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेत्या होत्या. त्यांचे दिल्लीतही वजन होते. प्रतिभाताईना विधानसभेमध्ये डावलले पण त्यांची रवानगी राज्यसभेत केली गेली. काही दिवसातच त्या राज्यसभेच्या उपाध्यक्षा बनल्या.
कल्लाप्पा आवाडे हे दादांच्या मंत्री मंडळातील उद्योगराज्यमंत्री. पण तरीही लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या इचलकरंजी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब माने यांना मतदान झाले नाही. दोघेही काँग्रेसचे जुने कार्यकर्ते पण गटबाजीचे ग्रहण लागल्यामुळे आवाडे गटाने गद्दारी केली असा आरोप बाळासाहेब मानेंनी केला. याची दखल दिल्लीमध्ये घेऊन कल्लाप्पा आवाडेंच तिकीट कापलं गेलं.
वसंतदादांचे हे कट्टर कार्यकर्ते. एकदिवस मुख्यमंत्र्यांनी कल्लाप्पा आवाडेंना भेटायला बोलावलं. गप्पा मारता मारता त्यांना सहज विचारल की मुलगा काय करतो? आवाडे म्हणाले,
“घरच्या उद्योगव्यवसायात आहे.”
वसंतदादा काही बोलले नाहीत. काही दिवसांनी कळाल की इचलकरंजी विधानसभेच तिकीट आवाडेंचे चिरंजीव प्रकाशराव आवाडे यांना जाहीर करण्यात आले आहे.
वडीलंाच्या जागेवर मुलाला तिकीट देण्याचा हा घराणेशाहीचा पहिला प्रयोग वसंतदादांनी केला होता.
असाच प्रकार त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी देखील केला. त्यांचे सुपुत्र दिलीपराव पाटील यांना निलंगा येथून विधानसभा तिकीट दिले. असं म्हणतात की यावेळी वसंतदादा यांनी घोषणा केली होती की,
“दिल्लीकरांनी निलंगेकरांच तिकीट कापल पण मी त्यांना मुख्यमंत्री करून दाखवेन.”
पुढे वसंतदादानी प्रदेशाध्यक्ष पदाच्या वादावरून राजीनामा दिला पण रिकाम्या झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आपले समर्थक शिवाजीराव निलंगेकर यांना बसवले आणि आपले शब्द खरे करून दाखवले.
दिल्लीतल्या श्रेष्ठींच्या वादापायी वसंतदादांनी महाराष्ट्रात मात्र घराणेशाहीचा चुकीचा पायंडा पाडला. आज या रोगाची लागण प्रत्येक पक्षाला लागली आहे.
ज्या दिलीपराव निलंगेकर पाटील यांना दादांनी तिकीट दिले त्यांच्या मुलाने म्हणजेच संभाजीराव निलंगेकर यांनी आपल्या आजोबांचा शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचा पराभव केला. सध्या ते भाजपमध्ये मंत्रीपदावर आहेत.
सहकारातले अनेक नेते आपआपले संस्थान निर्माण करून तिथे आपल्यानंतर आपल्या लेकराबाळांची वर्णी लावू लागल्यामुळे सहकाराचे खरे उद्दिष्ट भरकटून गेले आहे. आज याच घराणेशाहीतून निर्माण झालेले अनेक वारस राजकारणात कोणत्याही विचारसरणीशी नाही तर फक्त सत्तेच्या खुर्चीशी बांधील असलेले पहावयास मिळतात.
हे ही वाच भिडू.
- वसंतदादा पाटलांनी देखील राजकीय संन्यास घेतला होता.
- सामनाचं यश हा तर शालिनीताई पाटलांचा कृपाशिर्वाद
- वसंतदादा पाटील आणि शालिनीताईंच्या लग्नाची गोष्ट.
- राजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…?