झी न्यूज ते आजतक… सुधीर चौधरी एवढे फेमस का आहेत ?

“नमस्कार DNA में आपका स्वागत है में हु सुधीर चौधरी”
गेल्या अनेक वर्षांपासून झी न्यूजच्या आणि DNA च्या प्रेक्षकांना हा आवाज ऐकण्याची सवय झाली होती. पण आता हा आवाज ऐकू येत नाही. कारण हा शो ज्यांचा होता त्या सुधीर चौधरींनी झी न्यूज सोडलं. जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा फक्त पत्रकारिता क्षेत्रच नाही तर सामान्य जनतेच्या भुवया सुद्धा उंचावल्या होत्या.
अगदी २ दिवस ट्विटरवर #SudhirChaudhariLeftZeeNews हे ट्रेंड होत होतं. ते शांत होत नाही की आता परत सुधीर चौधरी ट्रेंडिंगवर आले आहेत. यावेळेस #SudhirChaudhariJoinAajTak हे ट्रेंडिंगवर आलं.
अनेक लोक जॉब स्विच करतात पण एखादा पत्रकार एक मीडिया हाऊस सोडतो दुसरीकडे जॉईन करतो तेव्हा त्यांची एवढी चर्चा का होतेय? सुधीर चौधरी इतके लोकप्रिय कसे झाले? ते सतत वादात का अडकले? हे जाणून घेऊया…
सुधीर चौधरी हे वरिष्ठ पत्रकार असून ते पूर्वी झी न्यूज, विऑन, झी बिझिनेस, झी २४ तासचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास सुरु झाला ९० च्या दशकात झी समुहापासून. त्यावेळी झी न्यूज हे चॅनलही नवीनच होतं. १९९४ ला सुधीर रिपोर्टर म्हणून जॉईन झाले. हा असा काळ होता जेव्हा रात्री फक्त अर्धा तास येणाऱ्या बुलेटीनमध्ये काय दाखवावं? हा प्रश्न होता.
सुधीर रिपोर्टर असल्याने भारत सरकारच्या मंत्रालयात जाऊन प्रेस रिलीज आणण्यासाठी झटायचे. कारण तो अर्धा तास भरून काढणं ही तारेवरची कसरत होती.
याच कामाच्या धडपडीतून सुधीर यांनी पुढे १९९९ साली कारगिल युद्ध कव्हर केलं, त्यावेळी त्यांनी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा इंटरव्यू देखील केला होता. पण त्या इंटरव्यूची सीडी झीच्या स्टुडिओपर्यंत पोहोचण्याआधी कॅप्टन बत्रा शहिद झाले, याची खंत आजही सुधीर व्यक्त करतात. पुढे २००१ मध्ये त्यांनी संसदेवरील हल्ला कव्हर केला.
दहशतवादी हल्ल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ यांच्यात झालेल्या इस्लामाबाद बैठकीचं कवरेज करणाऱ्या टीममध्ये त्यांचा समावेश होता.त्यांनी सीरिया युद्ध देखील कव्हर केलं.अजून एक गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी फार कमी लोकांना मुलाखती देतात, सुधीर चौधरींनीदेखील त्यांची मुलाखत घेतलीये..ते मोदींच्या जवळचे आणि प्रो भाजप आहेत, अशी टिका त्यांच्यावर सातत्याने होते.
आता त्यांच्या करिअरचं सांगायच तर २००३ मध्ये त्यांनी झी न्यूज सोडलं. सहारा समय हे हिंदी न्यूज चॅनेल सुरू करण्यात मोलाचा वाटा दिला. काही काळासाठी ते इंडिया टीव्हीमध्येही रुजू झाले होते. लाईव्ह इंडिया चॅनलचे संपादक म्हणूनही काम बघितलं. २०१२ मध्ये, ते परत झी न्यूजमध्ये सामील झाले. आतापर्यंत काळ बदललेला. न्यूजरूममध्ये हजारो बातम्या येऊन पडायच्या आणि त्यातील जास्तीत जास्त ५०० दाखवल्या जायच्या.
त्यातही न्यूज बघण्याचा प्रेक्षकांचा कल बदलला होता. एखाद्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय सुरु आहे, अशाप्रकारच्या बातम्या TRP द्यायच्या. पण सुधीर यांना नेमकं हेच नको होतं अस त्यांना एका मुलाखतीत सांगितल..अशा वेळी काय करावं? हा विचार सुरु असताना कुणीतरी त्यांना सुचवलं ‘तुम्ही तुमच्या व्युव्हर्सला कधी भेटलाय का?’
सुधीर यांच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्यांनी टीमसह भारत दौरा केला. दिल्ली, भुवनेश्वर, मेरठ, मुंबईसह गावागावात गेले. लोकांशी बोलले.
तेव्हा त्यांना समजलं लोकांना ‘ब्रेकिंग जानकारी चाहिए ब्रेकिंग न्यूज नहीं’
बस्स.. हा गॅप भरून काढण्याचं सुधीर यांनी ठरवलं आणि ‘डेली न्यूज अँड अॅनालिसिस’ म्हणजेच DNA ची सुरुवात केली.
प्राईम टाइममध्ये येणाऱ्या DNA मध्ये ३५ वर्षांच्या वरचे लोक पाहतील असे विषय करा म्हणून त्यांना सांगण्यात आलं.पण त्यांनी मात्र लहान मुलं, स्त्रियाही पाहतील असे विषय आणायचं ठरवल अस त्यांनी एका मुलाखतीत सांगितलयं..
या सगळ्यात त्यांनी बातमीचं जे विश्लेषण केलं त्यामुळेच DNA म्हणजे सुधीर चौधरी असं समीकरण तयार झाल्याचं लोक सांगतात. त्यांच्या कामासाठी त्यांना ‘हिंदी ब्रॉडकास्टिंग’ प्रकारात उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कारही मिळाला.पण त्यांच्या याचं DNA शोला विरोध करणारे लोकही तितकेचं आहेत.
सुधीर जेवढे प्रसिद्ध झाले तसेच ते कॉंट्रोव्हर्सीमुळेही प्रकाशझोतात आले.
२०१२ मध्ये, चौधरी आणि त्यांचे सहकारी समीर अहलुवालिया यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी असा आरोप केला होता की, जिंदाल ग्रुपला कोळसा घोटाळ्याशी जोडणाऱ्या स्टोरीज वगळण्यासाठी या दोन पत्रकारांनी त्यांच्याकडून १०० कोटी उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना १४ दिवसांसाठी जेल अनुभवावं लागलं होतं.
२०१६ मध्ये २००० च्या नवीन नोटेमध्ये मायक्रो नॅनो जीपीएस चिप असल्याचं ते म्हणाले होते, तेव्हाही ट्रोल झाले होते. २०१९ मध्ये चौधरी यांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी अमेरिकन कमेंटेटर मार्टिन लाँगमन यांच्या लेखाची चोरी करत भाषण केलंय. तेव्हा लाँगमन आणि मोइत्रा या दोघांनीही असं काही नसल्याचं सांगितलं होतं आणि महुआ मोइत्रा यांनी सुधीर चौधरी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.
त्यानंतर चौधरी यांनी त्यांच्या रोजच्या प्राइम टाइम शोमध्ये महुआ मोइत्रा यांच्या भाषणाचा केवळ काही भाग प्रसारित झाल्याचं मान्य करत माफी मागितली होती.
२०२० मध्ये चौधरी तेव्हा देखील ट्रोल झाले होते जेव्हा त्यांनी मुस्लिमांवर भारताच्या कोरोना व्हायरस युद्धात अडथळा आणल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इस्लामोफोबिक म्हणून टीका केली गेली होती.
पत्रकारितेत २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि जास्त काळ झीमध्ये राहिलेल्या सुधीर यांनी आता झीला सोडत आज तकला निवडलंय.. काही जणांना त्यांची पत्रकारिता आवडते तर काहींना आवडत नाही. तुम्हांला या सगळ्याबाबत काय वाटतं ? कमेंटमध्ये सांगा…
हे ही वाच भिडू :
- आता अर्णब वगरैना विसरा.. कारण मुलाखत घ्यायला येत आहेत जवान दिलोंकी धडकन !
- सूत्र-सूत्र म्हणजे कोण असतात, संपादक-पत्रकारांना विचारलं त्यांनी अखेर सांगितलं..
- एका पत्रकारामुळे ८ वर्षांपूर्वी मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती…