एकेकाळची पुण्याची CA फर्म आज हजारो कोटी रुपयांची आयटी कंपनी बनलीय.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पुण्यात किर्तने पंडीत असोसिएट नावाची सुप्रसिध्द सीए फर्म आहे. ही फर्म रवी पंडीत यांच्या वडिलांची. ते स्वतः अमेरिकेच्या सुप्रसिद्ध एमआईटीच्या स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पास आउट झालेले गोल्ड मेडलीस्ट. अमेरिकन अकौंटन्सी फर्ममध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव होता. वडिलांच्या फर्ममध्ये मदत करण्यासाठी ते भारतात परत आले.

रवी पंडीतांची सीएच्या क्षेत्रावर त्यांची कमांड होतीच. पण हिशोबाच्या पोथ्या सांभाळण्याच्या जुन्या पुराण्या पद्धतीचा त्यांना कंटाळा आला होता. आपल्या कस्टमर्सचे अकाऊन्ट सांभाळण्याच्या सोबतच आणखी कोणती सर्व्हिस देता येईल याचा ते कायम विचार करायचे.

अशातच त्यांच्या फर्म मध्ये एक नवीन सीए जॉईन झाला. किशोर पाटील त्यांचं नाव.

पुण्याजवळच्या एका छोट्या गावातून आलेले किशोर पाटील हुशार होते. काही दिवसातच प्रगती करून ते किर्तने पंडीत असोसीएट सीए फर्म मध्ये पार्टनर बनले. रवी पंडित आणि किशोर पाटील दोघांचे अकाऊंटन्सीबद्दलचे विचार जुळणारे होते. वयात प्रचंड अंतर असूनही दोघांची घट्ट मैत्री जमली..

दररोज टेबल टेनिस खेळायला जाणाऱ्या या पार्टनर्समध्ये आपल्या फर्ममध्ये नवीन काय करता येईल याची चर्चा व्हायची.

तो काळ म्हणजे भारतात राजीव गांधीनी आणलेल्या संपर्क क्रांतीचा. कम्युनिकेशन क्षेत्रातले बरेच जुनाट नियम त्यांनी काढून टाकले होते. भारतात संगणक क्रांती येऊ घातली होती. वेगवेगळ्या कंपन्या या क्रांतीसाठी सज्ज होत होत्या.

किर्तने पंडित फर्मच्या ग्राहकांकडून रवी आणि किशोर यांना कळालं की कंपन्यांना इंटर्नल ऑडीट सिस्टीमची गरज आहे. त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकायचं ठरवल. किशोर पाटलांचा शाळेतला एक मित्र आयआयटी पास आउट होता.

त्याच नाव शिरीष पटवर्धन. त्याची मदत घेऊन ही सिस्टीम बनवायचं त्यांनी ठरवल.  

शिरीष पटवर्धन यांना अमेरिकेतल्या ओरकल, एसएपी, टीसीएस अशा कंपन्यामध्ये काम करण्याचा अनुभव होता. त्यांनी ती इंटर्नल ऑडीट सिस्टीम बनवली. कोल्हापूरच्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीत ती बसवली गेली. किर्तने पंडीत फर्मने पहिल्या प्रोजेक्टच्या यशानंतर आपल्या बाकी ग्राहकांना सुद्धा ही सेवा देण्यास   सुरवात केली.

 हीच सुरवात होती केपीसीए च रुपांतर केपीआयटी होण्याची…

१९८९ मध्ये केपीआयटीच अधिकृत रजिस्ट्रेशन करण्यात आलं. फक्त इंटर्नल ऑडीट सिस्टीम नाही तर बाकीचे छोटे मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात येऊ लागले. फक्त पुण्यातच नाही बाहेरहून सॉफ्टवेअरची मागणी येऊ लागली. y2k च्या संदर्भातील बरीच कामे ही त्यांना मिळू लागली होती. राकेश झुनझुनवाला सारख्या भारतातल्या दिग्गज इन्व्हेस्टरने त्यांच्या बिझनेसला फंडिंग केलं.

केपीआयटीच नाव काही दिवसातच फेमस झालं. रवी पंडित यांनी अमेरिकेतून कामे आणली. किशोर पाटील पुण्यातून कंपनीचा व्यवहार सांभाळत होते तर शिरीष पटवर्धन टेक्निकल बाजूचा किल्ला लढवत होते.

पुढच्या काही वर्षात इंग्लंडमध्ये केपीआयटीच ऑफिस उघडण्यात आलं. १९९९ साली कंपनीचे शेअर पब्लिकला खुले करण्यात आले. १२ कोटीचे शेअर तब्बल ५२ पटीने वाढले. या निर्णयामुळे त्यांच्या बिझनेसला मोठ्ठ बुस्ट मिळाला. पुण्यात ऑटोमोटिव्ह सेक्टर मोठ्या प्रमाणात आहे. केपीआयटीने या क्षेत्रासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये स्पेशालिटी बनवली.

दोनच वर्षात त्यांच्या सगळ्यात मोठ्या कस्टमर असणाऱ्या कमिन्स कंपनीने त्यांचे काही शेअर विकत घेतले. केपीआयटी या छोट्या कंपनीसाठी हा सर्वात मोठा निर्णय होता. अमेरिकतल्या इंजिन बनवणाऱ्या कमिन्सला आयटी क्षेत्रात उतरायचे होते. आणि त्यासाठी भारतातल्या केपीआयटीची मदत त्यांनी घेतली.

कंपनीच नवीन नाव केपीआयटी कमिन्स बनलं होतं.

पुढच्या दहावर्षात एकेकाळी सीए फर्म असलेली केपीआयटी हजारो कोटीरुपयांची आयटी कंपनी बनली. भारतातल्याच नाही तर जगातल्या आघाडीच्या कंपनीपैकी एक म्हणून तिला ओळखल जात. युरोप, अमेरिका, जपान, थायलंड इथल्या ऑफिसमध्ये हजारो कर्मचारी काम करत आहेत. मागच्या काही वर्षांपूर्वी कमिन्स आणि केपीआयटी परत वेगळे झाले.

काही दिवसापासून ऑटोमोबाईल क्षेत्राला मंदीने ग्रासले आहे, त्यातच नव्या इलेक्ट्रोनिक गाड्या येऊ घातल्या आहेत. याचा पुण्यातील सॉफ्टवेअर कंपन्यावरही पडसाद उमटणे साहजिक आहे. केपीआयटीने काही दिवसापूर्वीच या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अनेक नवे बदल केले आहे. ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग आणि मोबिलिटी सोल्युशन्स कंपनी म्हणून लक्ष केंद्रित केल आहे.

किशोर पाटील आणि रवी पंडित यांची जोडी ही आव्हाने पार करून भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राला ग्लोबल नकाशावर नेतील यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.