यूपीतलं राजकारणच नाही तर तिथली प्रचारातली घोषणाबाजी देखील बाप असते…

राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. त्यात कोणतीच शक्यता गृहीत धरता येत नाही आणि कोणतीच शक्यता नाकारताही येत नाही. आणि भारताचं राजकारण काय विचारू नका.  म्हणजे सांगायचं झालं ना तर, भारतीय राजकारणाचा इतिहास हा चर्चेचा, वादविवादाचा आणि राजकीय शत्रूंवर हल्ले- प्रतिहल्ले चढवण्याचा, एकमेकांचे ज्ञान- अज्ञान काढून बौद्धिक पातळी मोजण्याचा विषय नाहीच मुळी. अशा गोष्टींची कल्पना नेत्यांनी तर सोडाच पण राजकीय विश्लेषक आणि विचारवंत सुद्धा हे सांगत नाहीत.

आपल्याकडं निवडणुका सुरु झाल्या कि, घोषणाबाजी सुरु होते बाकी आपल्याकडं दुसरा काही विषय नसतो. सगळं वातावरण तापतं ते नुसत्या घोषणाबाजींवर… 

आता तुम्ही म्हणाल, भिडू हे तू काय सांगतोय, म्हणजे नक्की विषय काय आहे ?

तर सध्या देशात ५ राज्यात निवडणुकांचं वारं वाहतय. हवा हळूहळू तापू लागलीय. वातावरणात रंग चढू लागलाय. आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आणि पुढचे महिना-दीड महिना हा खेळ सुरू राहणार आहे. निवडणूक म्हटलं, की प्रचार आला आणि प्रचार म्हटलं, की घोषणाबाजी आली. मग या घोषणा पक्षाच्या पारंपरिक घोषणा असो, एखादा उमेदवार किंवा नेत्याच्या निमत्तानं विशेष तयार करण्यात आलेल्या असो किंवा परिस्थितीचं वर्णन करणाऱ्या असो. एखादी घोषणा सुपरहिट्ट झाली, की मग त्याचीच चर्चा सुरू होते.

आता चर्चा यूपीतल्या घोषणांची आहे. 

खरं तर १९६० नंतर भारतीय राजकारण सतत भावनिक मुद्दे आणि भौतिक गरजांच्या पूर्ततेभोवतीच फिरत राहिले आहे. पण हि परिस्थिती बदलली १९७१ साली. तेव्हाच्या सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवून इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाओ’ अशी राजकीय दवंडी पिटली. अर्धपोटी, दरिद्री भारतीय मतदारांच्या ती काळजाला भिडली आणि प्रचंड लोकप्रियही ठरली. देशातील कोट्यवधी गलितगात्र मतदारांना ती आश्वासकही वाटली होती.

त्यानंतर मात्र घोषणाबाजी चिक्कार फेमस व्हायला लागली.

नुसत्या उत्तरप्रदेशचं बघायला गेलं ना तर १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी अर्थातच काशीराम यांची बसप टॉपला होती. या निवडणुकीत कांशीराम यांनी अशी घोषणा दिली कि उत्तरप्रदेशचं राजकारणचं या घोषणेने बदलून ठेवलं. घोषणा होती, 

तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार

जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी

वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा

१९९१ मध्ये ‘राम लला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ हि घोषणा दिली गेली. आणि विशेष म्हणजे हि आजवरची विशेष लोकप्रिय घोषणा राहिलीय. 

१९९३ मध्ये बसप आणि सपा मिळून विधानसभा निवडणूक लढले होते तेव्हा  ‘मिले मुलायम कांशीराम, हवा में उड़ गए जय श्री राम’ हि काउंटर घोषणा किल्लर ठरली. 

२००७ मध्ये बसप ने घोषणा दिली होती चढ़ गुंडन की छाती पर, मुहर लगेगी हाथी पर। आणि त्यानंतरचे निकाल तुम्हाला माहित नसतील तर सांगायला आनंद होतो कि त्यावेळी सुश्री कुमारी बहनजी मायावती यांचं बहुमताचा सरकार आलं. थोडक्यात बहनजी मायवती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी बसल्या होत्या.

पुढे २०१२ साली अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपा चं सरकार उत्तरप्रदेशात आलं होत. कारण त्यांची घोषणा होती, जिसका जलवा कायम है, उसका नाम मुलायम है। 

पुढे २०१७ साली उत्तरप्रदेशात योगीराज आलं. या निवडणुकीच्या वेळी भाजपची घोषणा होती, न गुंडाराज न भ्रष्टाचार, अबकी बार भाजपा सरकार। या घोषणेने सिरियसली कमाल केली होती. 

आता उत्तरप्रदेशात निवडणूक लागल्यात, यात भाजपची घोषणा आहे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। 

तर सपाची घोषणा आहे, देखो बाबा जी का खेल, हर क्षेत्र में हो गए फेल कृष्णा कृष्णा हरे हरे, अखिलेश भैया घरे घरे

तर काँग्रेसची घोषणा आहे  लड़की हूं, लड़ सकती हूं।

पूर्वीच्या निवडणुकांमध्ये रॅली, मेळावे आणि सभांमध्ये या घोषणा खूप दिल्या जायच्या. जाहीरनामा किंवा जाहिरातींमधूनही घोषणा झळकायच्या. भिंतीभिंतीवर घोषणा लिहून प्रचार करण्याची पद्धत त्यावेळी खूप लोकप्रिय होती. शहरभर विविध रंगांमध्ये घोषणा लिहिलेल्या भिंती दिसायच्या. कर्णे लावून दिवसभर रिक्षा फिरत असायच्या. त्यामधून पक्षाच्या घोषणा दिल्या जायच्या. आता तशा पद्धतीच्या प्रचारावर बंधनं आली असली तरी व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या भिंतीवर घोषणाबाजी चांगलीच रंगली आहे.

तेव्हा प्रचाराची पद्धती बदलली असली तरी घोषणाबाजी तशीच राहिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.