पावसाळ्यात हवामान खातं जारी करते त्या रेड, ऑरेंज, यल्लो अलर्ट चा अर्थ काय असतोय ?

राज्याच्या अनेक भागात ४ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे थांबायचं नाव घेत नाहीये. अनेक भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीये. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीये.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा कोल्हापूर अशा ९ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

तर नाशिक, चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. तसेच एनडीआरएफ जवानांना आणि इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मात्र पावसाळ्यात दिले जाणारे Yellow, Orange आणि Red अलर्ट म्हणजे काय असतात हा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असणार आहे. 

समजा तुम्ही मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याचे असाल आणि मराठवाड्यात जर रेड अलर्ट जारी केला असेल तर त्या रेड अलर्टचा अर्थ काय असतो ? हा रेड, ऑरेंज, येल्लो अलर्ट नेमकं कोण घोषित करत असतं? हि अलर्ट सिस्टीम काय असते ?

तेच जाणून घेऊया अगदी सहज सोप्या पद्धतीने..

सर्वात पहिलं पाहुयात यातील ग्रीन अलर्ट चा अर्थ काय ?

तर पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ असा की, अमुक अमुक शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य आहे, किंव्हा येत्या काही दिवसांमध्ये असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

म्हणजेच समुद्र किनारी जाऊ नका, धरणाच्या शेजारी जाऊ नका असल्या सूचना प्रशासनातर्फे दिल्या जात नाहीत. ग्रीन अलर्ट म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे त्यामुळे सहसा हा अलर्ट जारी करायची आवश्यता नसतेच.

आता यलो अलर्ट म्हणजे काय ते बघूया…

हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलो अलर्ट दिला जातो. येलो अलर्ट देण्यामागचा उद्देश असा असतो कि, अमुक अमुक शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. तुम्‍हाला तात्‍काळ असा धोका नसतो पण एकंदरीत हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी राहताय किंव्हा प्रवासात आहात तर त्याबाबतची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. 

जेणेकरून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होऊ नये.  त्यानुसार प्रशासनातर्फे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. 

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय ?

हवामान खात्याने नाशिक, चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्यात मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे. ऑरेंज अलर्ट जारी केला कि, समजून घ्यायचं की हवामान आता जास्त खराब होणार आहे. आपल्यावर संकट कधीही येऊ शकतं ज्याचा परिणाम आपल्या जनजीवनावर होऊ होणार असतो. 

म्हणजेच वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, तुम्ही प्रवासात असाल, कामावर जात असाल, किंव्हा मुलांना शाळेत पाठवत असाल तर वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. 

ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते.  त्याबाबत तुम्हाला खबरदारी घेणं गरजेचं असतं.  गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सूचना ऑरेंज अलर्ट मध्ये दिल्या जातात. 

आता येऊया रेड अलर्ट वर..

राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे आता थेट ऍक्शन घेण्याची वेळ. याचा सरळ सोपा अर्थ सांगायचा तर तुमच्या जीवाची आणि मालमत्तेची सुरक्षेची वेळ आली आहे. अनेकदा या रेड अलर्ट मध्ये पूरस्थिती असणाऱ्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी नेले जाते.  

हवामानानुसार सुरक्षा व्यवस्था केली जाते, पावसाळयात रेड अलर्टच्या वेळी सामान्य जीवनाला असलेला धोका लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक, शालेय कामकाज यासारखे नियमित काम बंद केले जाऊ शकते.  

तर हे होते ४ प्रकारचे अलर्ट. मात्र हे अलर्टस जारी कोण करत असते ?

तर याचं उत्तर आहे –भारतीय हवामान विभाग.

हवामान खाते, हवामानाशी संबंधित रंगांच्या माध्यमातून Warnings Alerts देत असतं. त्यासाठी हवामान विभाग चार रंगाचा कोड म्हणून वापर असते.   यामध्ये ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अशा रंगाचा वापर होतो. 

याबाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने हवामान शास्त्राचे अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितल्यानुसार,   

“अलर्ट सिस्टीम फक्त पावसाच्या परिस्थितीच वापरली जाते असं नाही तर, हवामान शास्त्रात अनेक प्रकारचा अभ्यास केला जातो.  उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता पाहता हे अलर्टस दिले जातात तसेच जमिनीच्या उंच-सखल भागांचा अभ्यास केला जातो. हवामानातील होणाऱ्या बदलांचा, पर्यावरणाचा अभ्यास केला जातो आणि खासकरून पावसाचा अभ्यास केला जातो”.  

“ही सिस्टीम सर्वात आधी युकेच्या हवामान खात्याने सुरु केली त्यानंतर भारतासह अनेक देशांनी ही सिस्टीम फॉलो करायला सुरुवात केली.भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय हवामान विभाग नियमितपणे हवामान परिस्थितीचा अंदाज घेते आणि दररोज आपल्या वेबसाइटवर या कलर कोड सिस्टीमनुसार तुमच्या भागातील हवामानाची स्थिती सांगते”, अशी माहिती देवळाणकर यांनी दिली. 

तर रंगांच्या आधारे अलर्ट जारी करण्याची ही सिस्टीम फार जुनी नाहीये. ही अलर्ट सिस्टीम २०१६ मध्ये सुरू करण्यात आली आहे. फक्त भारतातच नाहीये तर जगातील इतर देशांमध्ये देखील हीच सिस्टीम फॉलो केली जाते. त्या त्या रंगाच्या आधारे त्या त्या इशाऱ्यांचा अर्थ लावला जातो.

एक मात्र आहे ते म्हणजे, या अलर्ट सिस्टीममुळे अनेकदा आलेली संकटं टळलीत किंव्हा जरी संकट आली तरीही नुकसान कमी झालं.  अनेक प्रकारच्या आपत्तींमध्ये पूर्वीपेक्षा अधिक बचाव करणं शक्य झालं आहे.

तर या आम्ही सांगितलेल्या या माहितीनुसार तुम्ही वेळोवेळी हवामान खात्याच्या अलर्ट कडे, बातम्यांकडे लक्ष ठेवा, आपल्या भागातील परिस्थितीची जाणीव ठेवा आणि स्वतःच संरक्षण करा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.