राजकारणाचा लईच कंटाळा आला असला, तर हे ४ पर्याय ट्राय मारुन बघा…

२१ जून पासून सुरू आहे, अगदी कंटाळा आलाय. बहुमत झालं, राज्यात सरकार आलं. आत्ता बास्स करतील अस वाटलं होतं पण गैरसमज झाला. अजूनपण नेते आपल्या घरी कसे चाललेत, स्वागत कस होतंय हे टिव्हीवर सुरूच आहे. थोडक्यात राज्यसभेच्या निवडणूकीपासून हेच हेच बघुन कंटाळा आलाय.. पण काय करायचं कळना.. 

पण काळजी करु नका, राजकारणाच्या ओव्हरडोसवर रामबाण उपाय घेवून आलोय.

पर्याय क्रमांक एक म्हणजे, घरात थांबूच नका फिरायला जा..!

गुवाहाटी आपल्या बजेटच्या बाहेर असलं, तरी काय झाडी, काय डोंगार बघायला आपण महाराष्ट्रात लय ठिकाणी फिरु शकतो. पावसाळा आला की मुख्य आकर्षण असतंय कोकण, रपारप पाऊस पडत असताना कोकणात जायचा फील वेगळा असतोय, बीचवर जाता येत नाही पण निसर्गातली हिरवळ बघणं म्हणजे सुख असतंय सुख. काय काय भिडू असतात ज्यांना कोकण बघायचाही कंटाळा येतो, त्यांच्यापुढंही पर्याय आहेत, चिखलदरा आहे, कोयनेचं बॅकवॉटर आहे, तुमचा हनिमून नसला, तरी लोणावळा-खंडाळा आहे.

पावसाळ्यात सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतोय, धबधबा! देवकुंड, ताम्हिणी, मळवली, ठोसेघर आणि दूधसागर, नावं घ्याल तितकी कमी. फिरण्याचा आणखीन एक बेस्ट पर्याय म्हणजे ट्रेकिंग. वर्तमानाच्या कंटाळ्यातून भूतकाळात जाण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे गडकिल्ले. पावसाळ्यात गेलेच पाहिजे असे किल्ले म्हणजे लोहगड विसापूर, जीवधन, नळदुर्ग, राजगड, प्रबळगड, घनगड.

गडकिल्ल्यांवर जाऊन नेमकं काय होतं हा सांगण्याचा नाही, अनुभवण्याचा विषय ए. त्यामुळं निवांत फिरायला जा, पाऊसपाण्यात स्वतःची काळजी तेवढी घ्या!

पर्याय क्रमांक दोन – पुस्तकं वाचा

ऑप्शन दोन – पुस्तकं वाचा. गेल्या १५ एक दिवसात काय वाचलंय याची उजळणी करायची म्हणलं, तर डोळ्यांसमोर काय येतं ? तर राजकीय विश्लेषण, म्हणजे हा पवारांचा गेम आहे की ठाकरेंचा, फडणवीसांचा कार्यक्रम नेमका कुणी केला, एकनाथ शिंदे परत येणार का ? आता या झोनमधून बाहेर पडायचंय म्हणजे वाचायला हवंच.

डोक्याला बौद्धिक खाद्य पाहीजे असलं तर सेपिअन्स वाचा, गिरीष कुबेराचं टाटायन वाचा, सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन, गर्जा महाराष्ट्र वाचू शकता. बाकी नरहर कुरुंदकर यांची कोणतीही पुस्तकं वाचू शकता. 

कथा कांदबऱ्या वाचून ट्रान्स मध्ये जायचं असेल, तर भालचंद्र नेमाडे यांचं कोसला, बिढार, झुल, हूल, झरिला, हिंदू बेस्ट आहेतच. तसंच भाऊ पाध्येंचं वासूनाका आहे. तेही तुम्हाला खतरनाक ट्रान्समध्ये घेऊन जाईल.

पण डोक्याला लोडच नकोय तर रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांची, बाबा कदमांची कोणतीही पुस्तक घ्या. 

सुहास शिरवाळकर, नारायण धारप यांचीही कोणतीही पुस्तकं वाचू शकता. त्यातही विनोदी खुमासदार वाचू वाटत असलं तर पुल देशपांडे, दमा मिरासदार, शंकर पाटील यांची पुस्तक बेस्टच पर्याय आहेत.

पर्याय क्रमांक तीन म्हणजे वेब सिरीज-पिक्चर बघणं

दिवसभर राजकारण बघायला टीव्हीसमोर बसायचे दिवस गेलेत, त्यामुळं पुन्हा बिंजवॉचिंगचा कारभार करता येऊ शकतोय. वेबसिरीजचं म्हणाल तर, स्ट्रेंजर थिंग्स, लव्ह डेथ अँड रोबोट्स आहे, आपल्या राजकीय ड्राम्यापेक्षा जास्त डोकं भंजाळून घ्यायचं असलं तर ब्लॅक मिरर आहे. द बॉईज किंवा पंचायतचे दोन्ही सिझन परत बिंज मारले, तरी होतंय.

क्रिकेटची आवड असेल, तर बंदो मे था दम नावाची डॉक्युमेंट्री आहे, निर्मल पाठक की घरवापसी आहे आणि राजकारणा बघायचं असेलच, तर प्लॅनेट मराठीवर रानबाजार आहेच. बाकी अल्ट बालाजीवर नवीन काय आलं असेल, तर ते काय आम्हाला माहीत नाय, ते तुम्ही शोधायला घेऊ शकताय.

थेटरात जाऊन पिक्चर बघायचा असला, तर मराठीत वाय आणि मिडीयम स्पायसी, हिंदीत माधवनचा  रॉकेट्री, राष्ट्रकवच ओम, खास डॉग लव्हर्ससाठी चार्ली, कमल हसनचा विक्रम, मिनियन्स असे कित्येक पर्याय आहेत. चारेक तास आणि पॉपकॉर्नचे पैसे निवांत जातात, बाकी टेन्शन नाही.    

पर्याय चौथा आणि अखेरचा, कारण यापुढं सगळे पर्याय फेल आहेत.

हा पर्याय म्हणजे झोप. आता तुम्ही म्हणाल भिडूला आवडतो म्हणून हा पर्याय निवडला असाल. तर तुमचं म्हणणं अजिबात चुकीचं नाहीये. या सगळ्या सत्तानाट्याच्या काळात फक्त नेत्यांचीच नाही, आपली पण झोप उडाली होती. रोज पहाटे एकदा तरी मोबाईल उघडून आपण नजर मारायचो, सरकार आहे की नाही, आमदार आले की नाहीत, या सगळ्यात झोपेचा बाजार उठायचा.

बरं झोप इतकी महत्त्वाची का आहे ? तर काही दिवस जरी अपुरी झोप झाली, तर मानसिक आरोग्याचा गेम होऊ शकतोय. म्हणजे चिडचिड वाढते, उत्साह राहत नाही, एकाग्रता भंग होते, सगळ्यात खुंखार म्हणजे संशयी वृत्ती वाढते आणि या सगळ्याचा परिणाम शेवटी आजारपण आणि डिप्रेशनपर्यंत नेतोय, तेही अगदी सहज.

त्यामुळं राजकारण नकोसं वाटत असलं, तर निवांत झोपा. असंही आपल्याला जागं राहून नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत. हा कुठं जेवन झालं का? या प्रश्नाचं उत्तर येण्याची जुळणी असेल, तर मात्र जागं राहू शकताय.

तिकडचं सरकार स्थापन करणं महत्त्वाचं असतंय.

आम्ही चार पर्याय द्यायचं काम केलंय, इथं तुम्हाला राजकारण दिसणार नाही, जरा शांतता मिळेल, नवं काहीतरी शिकायला मिळेल, मुख्य म्हणजे आराम मिळाला की नवा काय राडा झालाच तर ताजंतवानं राहता येईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.