बंदूक परवान्यांचे जगात सगळ्यात कडक नियम जपानमध्ये; तरी शिंझो आबेंची गोळ्या घालून हत्या झाली

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी राष्ट्रीय निवडणुकीसाठी प्रचार करताना गोळ्या झाडण्यात आल्या. जपानी पब्लिक ब्रॉडकास्टर एनएचकेच्या रिपोर्टरने  सांगितले की तिने दोन बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर आबे यांना रक्तस्त्राव होत असल्याचे पाहिले.

त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आबे यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला मात्र  हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट केले तेव्हा आबे हार्टअटॅकच्या अवस्थेत असल्याचे सांगितलं जात आहे. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेकडील नारा शहरात गोळीबार केल्याचा संशय असलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नारा येथील रहिवासी तेत्सुया यामागामी असे संशयित गोळीबार करणाऱ्याचे नाव सांगितले जात आहे.

जपानच्या राजकारणातले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातले देखील शिंझो आबे हे मोठे नाव आहे.

त्यांच्या पंतप्रधान काळात भारत आणि जपान यांच्या उंचावलेल्या संबंधांमुळे शिंझो आबे हे नाव आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहित देखील असेल. त्यामुळेच त्यांच्यावर झालेल्या या हल्याने जगभराबरोबरच भारतातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

विशेषतः दुसऱ्या महायुद्धातील महासंहारानंतर जपानने जी धोरणं स्वीकारली आहेत त्यामुळे आज एक शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जातो. जपानमध्ये जगातील सर्वात कठोर बंदूक-नियंत्रण कायदे आहेत.

 १२ करोड ६५ लाख लोकांच्या देशात बंदुकांमुळे होणारे वार्षिक मृत्यू  नेहमी एक अंकीच राहिले आहेत.

त्यामुळे आबे यांच्यावर झालेल्या हल्यांनंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  शिंजो आबे यांच्यावर टेत्सुया यामागामी नावाच्या ४१ वर्षीय व्यक्तीने गोळ्या झाडल्या असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामागामी हा हल्ला झालेल्या नारा येथील रहिवासी आहे.तो रिटायर होण्याच्या आधी जपानच्या सैन्यात कार्यरत होता. जपानच्या मेरिटाइम  सेल्फ-डिफेन्स फोर्सचा तो  सदस्य होता. मेरिटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स हे जपानची नेव्ही असलयसारखीच आहे. 

शिंजो आबे यांचा जपानच्या मिलिटरी धोरणांवरील विचार तरी या हल्ल्यामागे नाहीये ना असा ही संशय व्यक्त केला जात आहे.

जपान आपल्या सैन्यदलांच्या नावात सेल्फ-डिफेन्स फोर्स लावतं यालाही इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धातील विनाशकारी पराभवानंतर टोकियोने शांततावादी दृष्टिकोनाच्या अवलंब करत अनेक वर्षांच्या युद्धाचा  लादण्याच्या धोरणाचा त्याग केला होता. हल्ला झाल्यास केवळ जपानी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी बळाचा वापर करण्याचे वचन जपानने दिलं होतं. त्यामुळंच जपानची आर्मी  सेल्फ-डिफेन्स फोर्स म्हणून ओळखली जाते. देशाचं युद्धांनंतर संविधानही शांततावादी दृष्टिकोनानेच बनवण्यात आलं होतं.

मात्र शिंझो आबे यामध्ये बदल करण्याच्या मताचे होते. 

जापनीज आर्मीला जास्त अधिकार देण्याच्या बाजूचं शिंझो आबे यांचं मत होतं. 

त्यांनी जपानच्या सैनिकांनाही बाहेरच्या देशात लढण्यासाठी पाठवण्यासाठीही प्रयत्न सुरु केले होते. मिलिटरीचं बजेटही वाढवण्यात येत होतं. नॉर्थ कोरिया, चीन यांच्याकडून असलेले वाढते धोके असल्याचं लक्षात घेता जपानच्या संरक्षणसाठी असलेलं अमेरिकेवरील अवलंबित्व देखील त्यांना कमी करायचं होतं.

मात्र याला जपानी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोधही होत होता.

 एका रिपोर्टनुसार अंदाजे 10 पैकी नऊ जपानी नागरिकांवर सेल्फ-डिफेन्स फोर्सची सकारात्मक छाप आहे जे अर्ध-लष्करी दल आहे. आणि शिंझो आबे यालाच पूर्ण लष्करी करण्याच्या बाजूने होते.

मात्र आतड्याच्या अजरामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या या योजना बारगळल्या होत्या.

आबे हे एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचे आजोबा किशी नोबुसुके यांनी 1957 ते 1960 पर्यंत जपानचे पंतप्रधान म्हणून काम केले  आणि त्यांच्यापासूनच त्यांनी देशाच्या मिलिटरीचे पॉवर वाढवण्याची प्रेरणा घेतल्याचं सांगण्यात येतं.

आबे यांनी टोकियोमधील सेकेई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर ते अमेरिकेला गेले जिथे त्यांनी लॉस एंजेलिसच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास केला.

1980 च्या दशकाच्या सुरुवातीस आबे लिबरल-डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये सक्रिय झाले आणि 1982 मध्ये त्यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री असलेले त्यांचे वडील अबे शिंतारो यांचे सचिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

आबे हे दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले आणि युद्धानंतरचे सर्वात तरुण देशाचे पहिले पंतप्रधान बनले.आबे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले होते. त्यांनी 2006 मध्ये एक वर्ष आणि पुन्हा 2012 ते 2020 पर्यंत हे पद भूषवले होते. 

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही जपानच्या राजकारणात आबे यांची शक्ती आणि प्रभाव टिकून आहे. काही पंतप्रधान राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर जातात  परंतु आबे यांचा तो मार्ग नव्हता. ते त्यांच्या पक्षाच्या सर्वात मोठ्या गटाचे प्रमुख आहेत.

जपानला आर्थिक स्तब्धतेतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने आक्रमक चलनविषयक आणि वित्तीय धोरणांचा संच “अबेनॉमिक्स” त्यांनी मांडला होता.

 Abenomics च्या सुरुवातीच्या काळात मिळालेल्या यशाने आबेची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवली होती. 

आबे यांच्या काळात भारत-जपान संबंध एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचले होते.

2014 मध्ये शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांना “विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी” मध्ये अपग्रेड करण्यास सहमती दर्शविली होती.

नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षा, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधा, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये संबंध वाढले होते. 2014 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे असणारे शिंजो आबे हे पहिले जपानी पंतप्रधान होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यमानशी येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी स्वागत केले होते. विदेशी नेत्याचे ते अशा प्रकारचे पहिलेच स्वागत होते. त्यानंतरच्या भारत भेटीत  शिंजो आबे यांचे स्वागत अहमदाबादमध्ये रोड शोमध्ये करण्यात आले होते.

2006-07 मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आबे यांनी भारताला भेट दिली  होती आणि संसदेला संबोधित केले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात, त्यांनी भारताला तीनदा भेट दिली. कोणत्याही जपानी पंतप्रधानांनी दिलेली भारताला दिलेली ही सर्वाधिक भेट होती. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वाड संघटना उभारण्यातही आबे यांचे मोठे योगदान आहे.

त्यामुळे आबे यांच्यावरील हल्ल्याबद्दल भारतातूनही तेवढीच हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.