जगभरात फक्त १० लोक असतात अशा EMM Negative ब्लडग्रुपचा १ माणूस गुजरातमध्ये सापडलाय

‘रक्ताची नाती’ म्हणत खूप इमोशनल करणारे डायलॉग आजवर तुम्ही ऐकले असतील. जसे सिनेमात तसे घरी सुद्धा. यामागे तथ्यच आहे म्हणा. आपला रक्तगट आपल्याला आपल्या पालकांकडून वारशाने मिळालेल्या जनुकांद्वारे निर्धारित केला जातो. प्रत्येक गट एकतर आरएचडी पॉझिटिव्ह किंवा आरएचडी निगेटिव्ह असू शकतो. 

पण ज्यांचा ब्लडग्रुप अगदीच वेगळा असेल, इतका की जगभरातून दुर्मिळ ब्लडग्रुप असेल, तर नक्की कोणता डायलॉग म्हणायचा? 

अचानक हा प्रश्न पडायचं कारण आहे एक बातमी. 

भारतामध्ये डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. तोही इतका दुर्मिळ की हा रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती आहे, असं सांगितलं जातंय. या रक्तगटाचा प्रकार आहे –

EMM Negative / ईएमएम निगेटिव्ह

नाव वाचूनच तुमच्या पण भुवया वाकड्या झाल्या असतील. म्हणून विषय सविस्तर समजून घेऊया…

हा दुर्मिळ रक्तगट असलेला व्यक्ती भारतात आढळला आहे गुजरातमध्ये. राजकोट इथे राहणाऱ्या ६५ वर्षांच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद इथं हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. यावेळी त्यांच्या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर हे रक्त कोणत्याही रक्तगटाशी जुळत नव्हतं.

मग आजोबांच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी थेट अमेरिकेत पाठवले. न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेत तपासणी पाठवलेल्या या रक्ताच्या नमुन्यांचे निष्कर्ष एका वर्षानंतर आले. तेव्हा समोर आलं की त्यांचा रक्तगट दुर्मिळ आहे तोही इतका की जगात असे फक्त १० लोक आहेत. आणि भारतात  असणारे ते पहिले ठरलेत. 

काय असतो EMM Negative रक्तगट? हे जाणून घेण्याआधी जरा रक्ताबद्दल बेसिक माहिती बघू..  

आपल्या पूर्वजांना रक्ताबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांना फक्त इतकं माहिती होतं की रक्त शरीराच्या आतमध्ये राहीलं तर ठीक आणि बाहेर आलं तर संकटाची घंटी. पण १९०१ साली ऑस्ट्रियन फिजिशियन  कार्ल लँडस्टीनर यांनी रक्ताचं वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. आणि १९०९ मध्ये त्यांनी रक्ताचे चार प्रकार सांगितले.

 ए, बी, एबी आणि ओ. 

या कामासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. 

या रक्तात साधारणत: चार गोष्टी आढळतात. पाहिलं लाल रक्तपेशी (आरबीसी). दुसरं पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी). तिसरं असतं प्लेटलेट्स आणि चौथं असतं प्लाझ्मा.

रक्तामध्ये अँटीजेन प्रोटीन सुद्धा असतात. हे अँटीजेन बाह्य घुसखोरीची माहिती देतात. रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्याचं काम करतात ज्यामुळे संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते. अँटिजेन नसेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीरात संरक्षणाची यंत्रणा सुरू करू शकत नाही.

मानवी शरीरात आरएच आणि डफी सारख्या ४० पेक्षा जास्त ब्लड सिस्टीम आणि ३५० पेक्षा जास्त अँटीजेन असतात. EMM हे असंच एक कॉमन हाय फ्रिक्वेन्सी अँटीजेन असतं. हे अँटीजेन मानवी शरीरात नैसर्गिक रित्या तयार होतं.

तर ईएमएम रक्तगट हा  AB+ असतो ज्यात ईएमएम ‘निगेटिव्ह’ फ्रिक्वेन्सी असते. म्हणजेच या रक्तगटातील लोकांच्या शरीरात ईएमएम हाई-फ्रिक्वेंसी अँटीजेनची कमतरता असते. या रक्तगटातील लोक रक्तदान करू शकत नाहीत किंवा ते कोणाकडूनही ते घेऊ शकत नाहीत. 

अँटी-ईएमएम रक्तगट सगळ्यात पहिले १९७३ मध्ये वैज्ञानिकांच्या निरीक्षणास आला होता आणि या रक्तगटाचे व्यक्ती १९८७ मध्ये पहिल्यांदा आढळले. चार जण ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नव्हता अशा वेगवेगळ्या देशातील लोकांमध्ये हा रक्तगट आढळला.  

१९९८ मध्ये एका ७० वयाच्या युरोपमधल्या माणसामध्ये हा रक्तगट आढळला होता. २०१२ मध्ये एका २६ वर्षांच्या आफ्रिकन गर्भवती महिलेमध्ये हा आढळला होता.  २०१३ मध्ये एका ५८ वयाच्या जपानी माणसामध्ये याप्रकारचा रक्तगट आढळला होता. हा व्यक्ती पूर्णतः आंधळा होता. 

आणि आता भारतामध्ये २०२२ ला हे ६५ वर्षांचे भारतीय आजोबा आता रक्तगटाचे आढळले आहेत. वर्षभरापूर्वी त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा त्यांना रक्ताची गरज होती. पण कोविड महामारीमुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला. मध्यंतरी डॉक्टरांनी त्यांना हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी औषधे देखील दिलं होतं.

हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं असलं तरी रुग्ण शस्त्रक्रिया करण्याच्या स्थितीत नव्हता, त्यामुळे पुन्हा डॉक्टरांनी ऑपरेशन पुढे ढकललं. दरम्यान त्या अजोबांना देखील कोविडची लागण झाली. आणि आता महिन्याभरापूर्वी त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, असं अहमदाबादच्या प्रथमा प्रयोगशाळेतील वैद्यकीय संचालक रिपाल शाह यांनी सांगितलं आहे.

अजून असे कोणते दुर्मिळ रक्तगट आहेत?

जगातील सगळ्यात दुर्मिळ रक्तगट मानला जातो गोल्डन रक्तगट. आरएच नल (Rh null) असं त्याला वैद्यानिक भाषेत संबोधलं जातं. गोल्डन नाव असलं तरी त्यांचा रंग काही गोल्डन नसतो. तो सामान्यच असतो. या प्रकारच्या लोकांच्या आरबीसीमध्ये आरएच अँटीजेन नसतात.

फक्त ४३ लोकांमध्ये हा रक्तगट आढळतो. या रक्तप्रकारातील लोकांना रक्ताची गरज भासली तर खूप कठीण जातं कारण जगभरात या रक्तगटाच्या लोकांना शोधणंच खूप कठीण होतं. सगळ्यात पहिले या रक्तगटाचा व्यक्ती ऑस्ट्रेलियामध्ये आढळला होता, जो आदिवासी होता. 

या प्रकारातले लोक रक्तदान सुद्धा करू शकतात. हे युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखले जातात आणि आरएच सिस्टीमच्या कोणत्याही लोकांना हे कमी येऊ शकतं.

तर फक्त भारतात आढळणारा एक इंटरेस्टिंग दुर्मिळ ब्लडग्रुप म्हणजे बॉम्बे ब्लडग्रुप. 

भारतातील सुमारे १७९ व्यक्तींमध्ये प्रत्येक १० हजारांपैकी १ अशी व्यक्ती बॉम्बे ब्लड ग्रुपची आढळते, असं एका संशोधन अहवालात म्हटलं आहे. अशाप्रकारच्या लोकांच्या रेड सेल्सवर एच अँटीजेन नसतात आणि सीरममध्ये अँटी-एच असतात. १९५२ साली सगळ्यात पहिले मुंबईमध्ये या रक्तगटाचा व्यक्ती आढळला होता. 

तेव्हा मुंबईचं नाव बॉम्बे होतं. म्हणून त्याचं नाव ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ पडलं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.