अगं कुणीतरी माझे आणि माझ्या ताईचे फोटो एडिट केलेत, अगदी घाण पद्धतीने…

कालपासून खूपच ड्रॅमॅटिक घटना घडल्या माझ्यासोबत. त्यातून सुटून कुठे तरी रात्री सव्वा एक दरम्यान झोपायचं म्हणून अंथरुण लावलं तितक्यात मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. इतक्या लेट कोण म्हणून बघितलं तर मैत्रिणीचे मेसेज होते

“उद्या माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येते का? “.

मी म्हटलं हो, येते. मेसेज डिलिव्हर होताच रीड झाला आणि क्षणात त्या मैत्रीणीचा कॉल आला. मग विचारलं

“काय गं, काय झालंय?”

तशी ती म्हणाली…

“अगं कुणीतरी माझे आणि माझ्या ताईचे फोटो एडिट केलेत. अगदी घाण पद्धतीने.

कदाचित अकाऊंट हॅक झालंय. तेव्हा सर्वात आधी सायबर पोलिसात जाऊन तक्रार नोंदवणं गरजेचं आहे”. खूप हिम्मतीने आणि शांतपणे ती सर्व सांगत होती. पण ते फोटो कोणत्या सोशल मीडियावर स्प्रेड तर होणार नाहीत ना? ही भीती तिला आतून खात होती. कॉल ठेवल्यावर तिने फोटो पाठवले. मी बघितले तसं तिची घालमेल अजून समजली.

सकाळी ८ लाच घरून निघालो. पहिले पुण्याचा चत्तुशृंगी ठाण्यात गेलो. त्यांनी सांगितलं ही केस शिवाजी नगरच्या सायबर मुख्यालयात घेतली जाईल. त्यानुसार तिथे गेलो. बाहेरच दोन अधिकारी बसले होते. त्यांनी विचारलं काय काम आहे?

त्यानुसार घडलेला प्रकार सांगितला…

मध्यरात्री १२ नंतर फेसबुकच्या मेसेंजरवर मैत्रिणीच्या ताईला तिच्याच फ्रेंड सर्कलमधील एका मुलीचा मेसेज आला. “अगं तुझे फोटो कुणी तरी घाण एडिट करून वेबसाईटवर टाकले आहेत. ही बघ लिंक. ओपन कर. पण घाबरू नकोस. माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे एक. मी त्यातून डीलिट करू शकते. फक्त त्यासाठी तुझा एखादा फोटो तुला पाठवावा लागेल. सेल्फी असेल तर चांगलं”.

ताईने लिंकवर क्लीक केलं. पण लॉग इन आयडी विचारला तेव्हा ती जरा सर्तक झाली. त्यात परत फोटोची मागणी झाल्याने तिने लगेच बॅक येत फेसबुक लॉगऑऊट केलं आणि भीतीपोटी अकाऊंट डिलीट देखील केलं. 

हकीकत ऐकल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी ‘फोटोज दाखवा’ असं सांगितलं. ताईने अकाउंट डिलीट करण्याआधी चॅटचे स्क्रिनशॉट्स काढलेले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांना आम्ही फोटो दाखवले. फोटोमध्ये फक्त एकटी ताई नव्हती तर माझी मैत्रीण देखील होती. तिने दोघींचा फोटो पोस्ट केला होता त्यातून क्रॉप करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी बघून सांगितलं… 

हा मॉर्फिंगचा प्रकार आहे..!

त्यांना म्हटलं मॉर्फिंग काय असतं?

त्यावर त्यांनी सांगितलं… कंप्युटर ॲनिमेशनच्या आधारे कुणाचेही फोटो अशाप्रकारे एडिट करणं की, त्यात फक्त चेहरा पुढच्या व्यक्तीचा असतो मात्र बाकी शरीर दुसऱ्या कुणाचं तरी असतं. जसे तुम्हाला आले आहेत.

उघडं शरीर दुसऱ्या कुणाचं आहे मात्र चेहरा तुमचा वापरण्यात आलाय. त्यासाठी एखादी लिंक तयार केली जाते आणि ती फॉरवर्ड केली जाते. त्यावर क्लिक करून फोटो बघा असं म्हटलं जातं. मात्र तुम्ही नाही केलं क्लीक, तरी फोटो पाठवलेच जातात ‘चॅट बॉक्समध्ये’.

मग त्यांना आम्ही म्हंटलं, म्हणजे आमच्या ताईचं अकाऊंट हॅक झालं आहे का?

अधिकारी म्हणाले, हॅक होण्याची पद्धत काहीशी अशीच असते. अशा लिंकवर तुम्ही क्लीक करून लॉग इन केलं तर तुमच्या अकाऊंटचा सगळा ऍक्सेस पुढच्या व्यक्तीला जातो. तुमच्या ताईचं अकाउंट हॅक झालंय का बघू. त्यासाठी ताईचा लॉग इन आयडी लागले. आम्ही तसा तो मागवला. ताईने गडबडीत अकाउंट डिलीट केलं होतं म्हणून पासवर्ड चेंज करून आम्ही सेटिंग्स बघितल्या.

त्यांनी त्या लिंकवर जात आम्हाला दाखवलं… अशा लिंकवर तुम्ही काहीही टाकलं तरी एका पेजवर तुम्ही जातात… लॉग इन केलं तरच डेटा जातो, मात्र तरी असं करणं सेफ नाही. त्यांनी मग सगळ्या सेटिंग आणि डेटा चेक केला. ती लिंक ताईच्या अकाउंटवरून कुठे फॉरवर्ड झालीये का? कोणतं अकाउंट आहे, किती डिव्हाइसेसला लॉगिन आहे, लॉग इनचे ip ऍड्रेस बघितले. 

सगळा रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह आला तेव्हा ते म्हणे अकाऊंट सेफ आहे आणि आता डिलीट करण्याची गरज नाही. वापरू शकतात. हॅक झालं असेल तर अशा अनेकांना लिंक पाठवल्या गेल्या असत्या.

यावर आम्ही म्हटलं, मात्र परत असं झालं तर? 

तेव्हा ते म्हणाले, कोणताही सोशल प्लॅटफॉर्म आपण स्वतःहून एखादा ‘कोड’ शेअर करत ऍक्सेस दिल्याशिवाय हॅक होऊ शकत नाही. मात्र जेव्हा तुम्ही एखादं माध्यम वापरत असता तेव्हा त्याची सिक्युरिटी माहित असणं गरजेचं असतं. फेसबुकसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घेतलं तर तुम्ही किंवा अन्य कुणी तुमचं अकाउंट लॉग इन करण्याआधी तुम्हाला मेसेज येतो आणि कोड विचारला जातो. ज्यावरून तुम्ही सतर्क होऊ शकतात.

पासवर्ड अँड सिक्युरिटी या सेक्शनमध्ये जाऊन आधी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप अशा सगळ्या माध्यमांची सेक्युरिटी करून घ्या.

आता विचारला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न…

अकाउंट हॅक नाही झालंय. मात्र फोटो मॉर्फ झालेत. ते कुठे पुढे स्प्रेड झाले असतील का?

यावर अधिकारी म्हणाले, शक्यता नाही. कारण असे फोटोज तिथेच एडिट करून पाठवले जातात. अशा घटना सध्या खूप घडत आहेत. त्या लोकांची चेन आहे. कालच एका लेडीजसोबत सेम हाच प्रकार झाला, हीच लिंक पाठवण्यात आली होती. मात्र फोटो कुठे जात नाही. हे ऐकून जीव जरा भांड्यात पडला आमचा.

मग विचारलं, FIR करायची गरज आहे का ?

त्यावर ते म्हणाले, अशी गरज नाही कारण अकाउंट हॅक नाहीये. तेव्हा काही मिळणार नाही अकाउंट मधून. तरी सेफसाईड तुमची इच्छा असेल तर करू शकतात.

आम्ही विचारलं प्रोसेस काय आहे?

ते म्हणाले, कंप्लेंट फॉर्म घ्या… त्यावरची माहिती भरा आणि सोबत सगळ्या चॅटच्या, फोटोच्या स्क्रिनशॉट्सची प्रिंट जोडा. आधार कार्ड जोडा. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून तुम्हाला हे मेसेज आलेत त्यांच्या अकाउंटची लिंक असलेली प्रिंट जोडा म्हणजे पुढची कारवाई आम्हाला करता येईल.

मी म्हटलं पुढची कारवाई काय केली जाते?

त्यांनी सांगितलं, मॉर्फिंगच्या केसमध्ये तसं लवकर ठावठिकाणा लागणं थोडंसं अवघड असतं. कारण तुमच्या सारख्या केसमध्ये लिंक ओपन न करता ऍक्सेस न दिल्याने दुसऱ्या लॉग इन डिव्हाईसचा ip ऍड्रेस सापडत नाही. त्यात साखळीपद्धत असेल तर वेळ जातोच. अशावेळी ज्या व्यक्तीकडून तुम्हाला लिंक आली आहे, त्याच्या अकाऊंटच्या लिंकचा वापर करून मागोवा काढावा लागतो. म्हणून तुम्हाला आम्ही त्या संबंधित व्यक्तीचं अकाउंटची लिंक मागितली बघा.

अशाप्रकारे लिंक लावत, चेन जुळवत जावं लागतं. मुख्य डिव्हाईस सापडलं की आरोपीच्या मुसक्या अवळता येतात.

इतकं बोलून त्यांचे आभार आम्ही मानले. जाताना त्यांनी सांगितलं. तुमचं अकाउंट सेफ आहे मात्र तरीही एक पोस्ट टाका. आणि प्रकार कळवा. शिवाय ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला लिंक आली आहे त्याला सतर्क करा आणि तक्रार नोंदवायला सांगा.

कारण त्या व्यक्तीचं अकाउंट हॅक झालंच आहे.

FIR करून आम्ही परत निघालो. तेव्हा अजून एक जण अशीच तक्रार घेऊन आलं होतं. म्हणून हा किती गंभीर प्रकार आहे हे जाणवलं. थोडक्यात माझी मैत्रीण आणि ताई वाचली. मात्र असं किती जणांसोबत घडत असेल, तेव्हा आपल्या भिडूंना हे सांगायचं ठरवलं. विचार सुरू असताना बाजूने बस निघाली आणि मी थांबवा, थांबवा म्हणत पळत बस पकडली.

कंडक्टर काका म्हणाले, काय दमलात का? आणि नकळत मी समाधानाने स्माईल दिली.

तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली का? वाटली असेल तर नक्की शेअर करा. कारण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आणि असा प्रकार काही घडला असेल तर लगेच पोलिसात जा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.