मार्च एन्ड आलाय, पोलीस मामांनी धरलं, तर काय करायचं…? वाचून घ्या..

किस्सा तसा पर्सनल ए, पण तुम्हाला सांगायला काय हरकत नाय. एक मैत्रीण ए (सध्या नुसती मैत्रीण ए, कारण आपले प्रयत्न सुरू आहेत) ती म्हणली डेटवर जाऊ. आपल्या मनात लाडू फुटले, आवरुन सवरुन तयार होईपर्यंत पोरगी पीक करायला आली.

पहिल्यांदाच वाटलं मेरा देश बदल रहा है. हॉटेल-बिटेल तिनंच ठरवलेलं, मस्त गाडीवरचा प्रवास, तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस, परफ्युमचा मंद वास, सगळं एकदम फिल्मी सुरु होतं आणि तेवढ्यात पोलिस मामांनी गाडी अडवली.

मग काय लायसन्स ए का? या प्रश्नापासून सुरू झालेला पेपर सोडवता सोडवता दीड तास गेला. मामांनी लय प्रश्न विचारले, त्यात पोरीच्या गाडीवर फाईन पण मजबूत, त्यामुळं लवकर सुट्टी मिळाली नाय आणि शेवटी तिचा मूड ऑफ झाल्यानं डेटचा प्लॅन गंडला. घरी गेल्यावर तिचा मेसेज पण आला नाय…

मग आपल्या रिकाम्या डोक्यात विचार आला, की पोलिस मामा आपली गाडी डायरेक्ट साईडला घेतात, कधीकधी चावी काढतात, फाईन मारायची म्हणलं तर सुट्टीच नाही. त्यात सध्या आहे मार्च एन्ड, मग म्हणलं सगळी माहिती काढावी आणि भिडू लोकांना पण सांगावी, उगं त्यांची डेट खराब व्हायला नको.

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिक पोलिस आपली गाडी अडवू शकतात का?

तर उत्तर आहे हो. ट्रॅफिक पोलिसांचं काम असतं की, रस्त्याची सुरक्षा राखली जाईल. त्यामुळं ते नियम मोडल्याच्या, नियमांचं पालन न केल्याच्या किंवा इतर संशयावरुन तुमची गाडी अडवू शकतात.

आता गाडी अडवल्यावर चावी काढून घेऊ शकतात का?

तर मोटार व्हेईकल्स ॲक्ट १९३२ नुसार, ट्रॅफिक पोलिसांनाच नाही, तर कुठल्याही पोलिस अधिकाऱ्यांना जबरदस्ती आपल्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नसतो. समजा कुठल्या पोलिसांनी तसं केलंच तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करु शकता.

पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आपल्याला अडवणारे ट्रॅफिक पोलिस नेमकं काय काय करु शकतात?

ट्रॅफिक पोलिस तुम्हाला गाडी साईडला घ्यायला सांगू शकतात. तुमचं लायसन्स, गाडीचा इन्शुरन्स या गोष्टी चेक करु शकतात. जर तुम्ही सिग्नल तोडला असेल, ट्रिपल सीट उंडारत असाल तर पोलिस तुमचं लायसन्स जप्त करु शकतात. समजा तुम्ही दारू किंवा इतर कुठलीही नशा केली असेल, तर पोलिसांना तुमचं लायसन्स जप्त करण्याचा, तुमच्यावर खटला भरण्याचा आणि प्रकरण गंभीर असेल, तर तुम्हाला अटक करण्याचा आणि गाडी जप्त करण्याचाही अधिकार आहे.

गाडी चालवताना आपल्याकडे कुठली कागदपत्रं असायला हवीत?

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आरसी बुक तुमच्याकडे असायला हवं, पहिला प्रश्न लायसन्सचा येतो, त्यामुळं तेही पाहिजे. सोबतच गाडीच्या इन्शुरन्सचे कागदपत्र आणि पीयूसीही. समजा तुमच्या बाईकला पंधरा वर्ष होऊन गेली असतील, तर गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट पण जवळ बाळगत चला.

आता समजा आपल्याकडे कागदपत्रं नसतील, तर काय कारवाई होऊ शकते?

कारवाईचा मुद्दा आलाच आहे, तर एक एक करुन सगळ्याचेच फाईन बघू. लायसन्स शिवाय गाडी चालवताना सापडलात की, ५००० रुपयांची पावती. लायसन्स रद्द झालेलं असताना गाडी चालवली, तर डायरेक्ट १० हजार दंड. गाडी चालवताना फोनवर बोलताना दिसलात, तर टू व्हीलर वाल्यांना १००० रुपये, फोर व्हीलर २ हजार, जड वाहन ४ हजार आणि जर दुसऱ्यांदा फोनवर बोलताना सापडला तर १० हजारांना चुना लागलाच म्हणून समजा. 

बाईकवर ट्रिपलसीट फिरलात तर हजार गेले. डोक्यावर हेल्मेट नसेल तर ५०० रुपयाची पावती होणार, वर तुमचं लायसन्सही रद्द होऊ शकतंय. तुमचं मानेपासून वरती कुठल्याही अवयवाचं ऑपरेशन झालं असेल किंवा तुम्ही शीख समुदायाचे असाल, तर तुम्ही हेल्मेट नाय घातलं तरी चालू शकतंय.   

आता हा नियम अगदी कान देऊन ऐका महत्त्वाचाय,

समजा तुम्ही दारू किंवा कुठल्याही नशेत गाडी चालवताना सापडलात, तर पहिल्यांदा तुम्हाला ६ महिन्यांचा तुरुंगवास किंवा १० हजार रुपये फाईन किंवा दोन्ही होऊ शकतंय. पुढच्या वेळी सापडलात, तर २ वर्ष आत किंवा २० हजार रुपये फाईन किंवा दोन्हीचा ऑप्शन आहेच. 

हवा करायला फॅन्सी नंबरप्लेट लावली, तर हजार रुपये वर काढूनच ठेवा. 

साहेब माझ्याकडे लायसन्स आहे, फक्त आत्ता जवळ ठेवायचं विसरलो हा डायलॉग तर आपण हजार टक्के वापरतो. काही काही वेळा लायसन्सचा फोटो आपल्याकडे असतो, पण पोलिस म्हणतात फोटो नाय चालणार पावती फाड. तर नियमानुसार खरंच लायसन्सचा फोटो चालत नाय, तरी तुम्हाला लायसन्स जवळ बाळगायचं असेलच, तर डीजीलॉकरमध्ये ठेवू शकता. फक्त लायसन्सच नाही, इतरही कागदपत्रं तुम्ही डीजीलॉकरमध्ये ठेवली असतील, तर ती ग्राह्य धरली जातात. मोबाईलमध्ये नसलं तर तेवढं करुन घ्या.

तुमची पावती झालीच, तर त्याचेही तीन प्रकार असतात. 

पहिलं म्हणजे पोलीस तुमच्याकडून डायरेक्ट दंडाचे पैसे घेतात. दुसरा प्रकार म्हणजे सीसीटीव्हीमधला किंवा पोलिसांनी काढलेला फोटो पावतीसकट घरी येतो आणि तिसरा म्हणजे तुम्ही जर गंभीर गुन्हा केला असेल, तर दंड भरायला थेट कोर्टात जावं लागतं.

 या सगळ्यात आणखी एक कुठंच न लिहिलेला नियम लक्षात ठेवा, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर थांबलेले असतात, त्यामुळं त्यांच्याशी बोलताना, वागताना जरा निवांतच घ्या. आणि मेन म्हणजे जर तुम्ही सगळे नियम पाळले आणि कागदपत्रं जवळ ठेवलीत, तर पोलिस मामा जी भारी स्माईल देतात त्याला जगात तोड नाही. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.