१ लाख रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या चहाच्या पानांमध्ये असं काय खास आहे?

भारताने जगाला काय दिलं? असा प्रश्न जर विचारला तर भली मोठी यादी समोर येईल, अर्थात इंडिया ‘इज आलवेज ग्रेट’. पण यात डोळे झाकून नाव घेतलं जाईल ते म्हणजे चहाचं. इथं घराघरात चहाप्रेमी सापडतील. अगदी दिवसाची सुरुवात करण्यापासून ते पार बेडवर जाईपर्यंत, काम करून कंटाळा आला असेल, किंवा कुणी खास भेटायला आला असेल चहा पिऊन आणि पाजून तृप्त व्हायचं ही भारतीयांची सवय. एकूण काय चहाला वेळ नसली पण वेळेला चहा हा लागतोच.

एका सर्वेनुसार फक्त भारताचं सांगायचं झालं तर इथली ७० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या चहा पिते. आता आपली हीच सवय भारतीयांनी परदेशी लोकांना सुद्धा लावलीये. म्हणजे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना सुद्धा भारताने चहा प्यायची तलप लावलीये. असं म्हणतात कि ब्रिटनची महाराणी सुद्धा आपल्या भारताच्या चहाची दिवाणी आहे. 

असो… आपलं चहा पुराण काय संपता संपणार नाही, पण आता विषय निघालाय कारण गेल्या दोन दिवसांपासून एक बातमी लय व्हायरल होतेय कि आसाम मधली चहाची पानं १ लाख रुपये किलोला विकली जातायेत. अर्थातचं डोळे मोठे होण्यासारखी गोष्ट आहे. कारण चहावर नितांत प्रेम आहे, चहापिल्याशिवाय दिवस उगवत नाही हे सगळं ठीक आहे, पण त्यासाठी १ लाख रुपये ते पण किलोमागे कोण मोजणार?

पण  भिडू या १ लाख रुपयांना विकल्या जाणाऱ्या आसामच्या चहाच्या पानांची बात काही और आहे. तसं आसामचा हा सगळ्या जगात फेमस आहे. इथून फक्त भारताचं नाही तर अख्ख्या जगात चहाची निर्यात होते. वेगवगेळ्या प्रकारच्या चहाच्या पानांची मागणी इथं असते, ज्याच्या किमती एका किलोमागे हजारोंच्या घरात असतात. यात करोडो रुपयांची उलाढाल सुद्धा पाहायला मिळते.

आता सुद्धा आसामचा गोल्डन पर्ल चहा चर्चेत आलाय तो आपल्या किमतीमुळे. जी साधी सुधी नाही तर १ किलोमागे ९९,९९९ रुपये आहे. होय… आसाममधील गुवाहाटी इथल्या टी ऑक्शन सेंटरमध्ये (GTAC) व्यापाऱ्यांनी डिब्रुगढमधील या खास गोल्डन पर्ल चहाच्या पानाच्या एक किलोच्या पॅकसाठी ९९,९९९ रुपयांची बोली लावली. 

अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा एका कंपनीची एक किलो चहाची पाने ९९,९९९ रुपयांना विकत घेतली गेली. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये गोल्डन बटरफ्लाय टी लीफ म्हणजे मनोहरी गोल्ड टी देखील याच दराने खरेदी करण्यात आली होती. आत्तापर्यंत देशातील कोणत्याही चहाच्या पानासाठी ९९,९९९ रुपयांची ही बोली सर्वाधिक आहे.

माहितीनुसार गोल्डन पर्ल चहा आसाममधील दिब्रुगढ जिल्ह्यातील नाहोरचुकबारी कारखान्यात तयार करण्यात आलाय. गुवाहाटी येथे झालेल्या लिलावात अनेक मोठ्या चहा कंपन्यांनी भाग घेतला होता, यात गोल्डन पर्ल टी सर्वोत्तम मानला गेला आणि खरेदीदारांनी त्यासाठी सर्वाधिक बोली लावली. ‘गोल्डन पर्ल’ला आसाम टी ट्रेडर्सने विकत घेतलाय.

गोल्डन पर्ल टीचे उत्पादन करणारी एएफटी टेक्नो ट्रेड कंपनी २०१८ मध्ये सुरू झाली. नूर आलम खान, इम्रान खान आणि अस्लम खान यांनी ही कंपनी स्थापन केली. त्याचे मालक मुळात सोन्याचे व्यापारी आहेत. त्यामुळे त्यांनी या चहाच्या पानांना गोल्डन पर्ल असं नाव दिल. असं म्हणतात की ही कंपनी आसामच्या अगदी लहान चहा उत्पादकांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. कंपनी २०० शेतकऱ्यांकडून त्यांची पिके खरेदी करते.

या ‘गोल्डन पर्ल’ ला एवढी बोली लागलीये कारण, बाजारात अश्या प्रकारच्या क्लासी स्पेशल कॅरेक्टर चहाला जास्त मागणी आहे. प्रीमियम ग्राहकांना लक्षात घेऊन व्यापारी याची मागणी करतात, जे नेहमी क्वालिटीकडे लक्ष देत असतात. महत्वाचं म्हणजे या चहाच्या पानांचा वास आणि चव यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो. तसेच त्याच्या आयुर्वेदिक बाबींकडे सुद्धा लक्ष दिल जात.

आता एवढी महागडी बोली लागल्यावर तुम्हाला वाटत असेल कि, गोल्डन पर्ल टी त्याच किमतीला विकला जाईल. पण तसं नाहीये. प्रत्यक्षात ही बोली फक्त एक किलो या चहासाठी लागली होती. हे गोल्डन पर्ल विकत घेणारे आसाम टी ट्रेडर्स हे आसाममधील हाय स्पेशालिटी चहाचे सर्वात मोठे खरेदीदार म्हणून ओळखले जातात.

चहाच्या पानांची बोली लावली जाते जेणेकरून हाय क्वालिटी  चहाची पाने योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचू शकतील. यासाठी जगभरात टी ऑक्शन सेंटर  उघडण्यात आलीत, जिथे कंपन्या स्वतःच्या चहाच्या पानांचे सॅम्पल पाठवतात. सर्व कंपन्यांचे सॅम्पल समान तापमान, प्रमाणाच्या आधारे तपासले जातात आणि त्यानंतर सर्वोत्तम चहा घोषित केला जातो, ज्यासाठी मूळ किंमतीवर बोली लावली जाते.

आता या लाखो रुपयांच्या चहाचं तर आपल्याला माहित नाही तर, पण भिडूसाठी कुठलाही चहा लाखमोलाचा आहे. आपलं कस तलप झाली कि, मिळेल तो चहा सुर्रकन प्यायचा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.