ट्विन टॉवर पडलाय पण त्याची नॅशनल न्यूज का झाली ?

काल दिवसभरात दोन बेकायदेशीर बिल्डिंगच्या डिमॉल्युशनची बातमीला काय लेव्हलचा टीआरपी मिळाला असेल सांगायला नको. एक तर भारतात कुतुबमिनार पेक्षाही उंच असलेले हे दोन ३२ मजली टॉवर्सचे डिमॉल्युशन भारतातल्या लोकांनी पहिल्यांदाच पाहिलंय.

त्यात डिमॉल्युशनसाठी वापरली गेलेली टेक्निक, इतके मोठे टॉवर अगदी काही सेकंदात पत्त्यांसारखे खाली कोसळले. या गोष्टींमुळे हा मुद्दा काल दिवभरात बराच गाजला. किंबहुना नॅशनल मीडियाने हा मुद्दा बराच उचलून धरला. 

काल रविवार होता लोकांना सुट्टी होती म्हणून या बातमीला टीआरपी मिळाला असंही काही नाही तर एक-दोन दिवस नाही तर गेल्या आठवड्याभरापासून ट्विन टॉवर पाडणार ही बातमी ट्रेंड करत आहे.

मोठमोठे कॅमेरे लावून मिडीयावाले ठाण मांडून बसलेले. पण खरंच त्या घटनेचं बातमी मूल्य होतं का ? की मीडियाने याला मोठ केलं ? देशात-राज्यात दुसऱ्या बातम्याच नव्हत्या का ?

१) पण याचं बातमी मूल्य काय होतं ?

आता हि घटना साधारण आहे का तर हो आहे कारण असे कितीतरी अनधिकृत बांधकामं पाडली जातात तसंच ट्विन टॉवर देखील पाडण्यात आलं फक्त वेगळेपण हे होतं कि भारतातील सर्वात मोठ्या टॉवरपैकी एक होतं.

त्याला पाडण्याचा गेम फक्त १२ सेकंदांचा होता पण तो पाडण्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून तयारी सुरु होती. हा टॉवर बांधण्यासाठी सुमारे ७०० कोटींचा खर्च आलेला तर पाडायला २० कोटी खर्च झालेले. हे टॉवर नेमके पाडले का ?

सुपरटेक बिल्डरला २००५ मध्ये न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरणाने म्हणजेच NOIDA ने प्रत्येकी नऊ मजले, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि गार्डन एरिया असलेले १४ टॉवर बांधण्यासाठी मंजुरी दिली होती. परंतू २००९ मध्ये सुपरटेकने प्रकल्पाच्या आराखड्यात  सुधारणा करून त्यामध्ये  Apex आणि Ceyane या दोन टॉवरचा समावेश केला. 

NOIDA प्राधिकरणाने हा नवीन आराखडा मंजूर देखील केला. मात्र ज्या एमराल्ड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हे टॉवर बांधण्यात येणार होते तेथील ओनर्स रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशने २०१२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात हे बेकायदेशीर बांधकाम असल्याचा आरोप करत धाव घेतली. २०१४ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने हे टॉवर बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत पाडण्याचे आदेश दिले होते. 

पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा देखील हे टॉवर पाडण्याचाच आदेश कायम ठेवण्यात आला.

सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवरचे बांधकाम करताना इमारतींमधील किमान अंतराच्या आवश्यकतेचे उल्लंघन केले आहे असं म्हटलं. त्याचबरोबर इमारत बांधकामाचे नियम आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करता टॉवर बांधण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले होते. त्याचबरोबर मूळ आराखड्यातील गार्डनच्या जागी इमारतीचं बांधकाम करणं हे रहिवाशांना विचारात नं घेता करण्यात आलं होतं जे बेकायदेशीर होतं.

त्यामुळे अखेरीस कोर्टाने हे बांधकाम पाडण्याचा आणि या बेकायदेशीर आराखड्याला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. थोडक्यात यात बातमी मूल्य हे होत की बांधकाम करताना भ्रष्टाचार झालेला त्यामुळे हे बांधकाम पाडलं परंतू बातमी कशाची झाली तर हा टॉवर कसा पाडणार, कसा पडला याची…बातमी पेक्षा इव्हेंटच जास्त करण्यात आला. 

दुसरा प्रश्न की,

२) देशभरात काल मोठ्या बातम्या कोणत्याच नव्हत्या का ? जर होत्या तर कोणत्या बातम्या होत्या?

एकीकडे ट्विन टॉवर कसं कोसळणार याची चर्चा सुरु होती तर दुसरीकडे दिल्ली सरकार कोसळतं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र त्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलंच नाही. 

दुसरी बातमी होती ते देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल, अनेकदा लांबणीवर गेलेली बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. याचा निर्णय कालच काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. 

तिसरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. त्यात त्यांनी पाणीबचत, कुपोषण निर्मूलन, स्वच्छता, लसीकरण मोहीम, अमृत सरोवर अभियानाचे असे महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

चौथी गंभीर बातमी म्हणजे, देशात आत्महत्येने होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी समोर आली यानुसार, २०२१ मध्ये दर १० लाख लोकांमागे १२० लोकांनी आत्महत्या केल्या, ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे…आणि ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

३) हे झालं राष्ट्रीय स्तरावरचं…पण राज्यात देखील काल मोठ्या बातम्या होत्या का आणि होत्या तर त्या कोण-कोणत्या बातम्या होत्या ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबई-पुणे हायवे नजीक ट्रॅफिक मध्ये अडकला. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील ट्राफिक चा प्रश्न सोडवायचा निर्णय घेतला. हा जरी पुण्यापुरता मुद्दा असला तरी राज्याच्या दृष्टीने का महत्वाचा आहे तर डोंबिवली जवळ रविवारी रात्री आठ वाजता  टुव्हीलरवरुन जाताना एका तरुणाचा खड्डे चुकवित असताना तोल गेला आणि त्याचवेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. 

थोडक्यात काय तर नेतेमंडळी जेंव्हा ट्राफिक मध्ये अडकतात तेव्हाच आपल्या यंत्रणा त्याची दखल घेते मात्र खड्ड्यामुळे रोज कितीतरी बळी जातात त्याची दखल शासनाकडून घेतली जात नाही. 

दुसरी बातमी म्हणजे,  एकीकडे देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळत आहेत.  रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळलेत तर यापैकी एकट्या महाराष्ट्रात 1 हजार 639 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे जे कि अर्थातच चिंताजनक आहे. 

४) मिडीया आणि सोशल मीडियाने ट्विन टॉवरचा कसा इव्हेंट केला ?

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुण्यात झालेल्या सोशल मीडिया संमेलनात हे जाहीररीत्या मान्य केलं कि, २४ तास मीडिया आल्यामुळे टीव्ही चॅनल्स ला काहीना-काही बातम्या हव्या असतात. अन् जर का बातम्या मिळत नसतील तर त्या क्रिएट केल्या जातात. त्याचा इव्हेंट केला जातो. टीआरपी घेतला जातो. 

२ बेकायदेशीर रिकाम्या बिल्डिंग पाडणे देशातील मीडिया आणि लोकांसाठी अत्यंत महत्वाचा इव्हेंट होवू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. 

जाणकार असं म्हणतात की, केवळ माध्यम न‌िरक्षरतेमुळे महत्वाच्या घडामोडींना योग्य प्रस‌िध्द‌ी म‌िळत नाही पण एखादी साधारण घटना फार मोठी घटना असल्यासारखं दाखवलं जातं. 

मीडियाच नाही तर सोशल मीडियावर देखील याचं वारं दिसून आलं. ट्विटर असो वा फेसबुक सगळीकडे असे मेसेज देण्यात आले कि, ३ वर्षात तयार झालेलं टॉवरचं अवघ्या ९ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. काहींनी डिमॉल्युशन सेल्फी पोस्ट करत याचं सेलिब्रेशन केलं.थोडक्यात काय तर जितकी चर्चा टॉवर पाडण्याची त्याच्या प्रोसेसची झाली तितकी भ्रष्टाचाराची झालीच नाही. 

महत्वाची बातमी मागे पडून बाकी गोष्टींचा इव्हेंट झाला हे तर नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.