डोकं फुटलेल्या ममतांना उपचारासाठी अमेरिकेला पाठवण्याची तयारी राजीव गांधींनी केली होती ..

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलयं. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बाजूनं प्रचाराचा धुरळा उडत आहे. आरोप – प्रत्यारोपांच्या राजकारण सुरु असताना अचानक नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याची बातमी आली. यात त्या जखमी झाल्या असून हॉस्पिटलमध्ये दाखल पण करण्यात आलं होतं.

तिकडं विरोधकांनी मात्र ममतांवरच्या या हल्ल्याला त्यांचाच एक प्रकारचा राजकीय स्टंट म्हणून टीका केली. त्यामुळे आता हा खरचं हल्ला होता कि राजकीय स्टंट होता हे ममतांनाच माहित पण यामुळे त्यांचावर १९९० मध्ये झालेल्या अशाच एका जुन्या हल्ल्याची आठवण ताजी झाली.

आणि विशेष म्हणजे त्यावेळी गंभीर जखमी असलेल्या ममतांवरच्या उपचारावरील मदतसाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी धावून आले होते. 

तसं बघितलं तर बंगालमध्ये निवडणुका असो अगर नसो पण तिथं होणारा हिंसाचार नवीन नाही. ९० च्या दशकात काँग्रेस आणि डाव्यांमध्ये हा हिंसाचार उफाळून यायचा, आणि आता त्यांची जागा तृणमूल काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी घेतली आहे इतकचं.

साधारण १९९० ची गोष्ट. त्यावेळी देखील असाच हिंसाचार उसळून आला होता. ममता बॅनर्जी त्यावेळी काँग्रेसच्या युवा नेत्या होत्या. १९८० च्या दशकात संसदीय राजकारणला सुरुवात करत अवघ्या २९ व्या वर्षी खासदार झाल्यानं त्या राज्यभरात चर्चेचा चेहरा बनल्या होत्या. आंदोलन, निषेध, विरोध यांनी डाव्यांच्या सत्तेला पुरतं जेरीस आणलं होतं.

असचं १९९० मध्ये खाद्य तेलाच्या भेसळीमुळे काही निष्पाप मजुरांचे जीव गेल्याचा आरोप करत काँग्रेस आणि ममतांनी विरोध आंदोलन सुरु केलं. ठीक-ठिकाणी सभा घेऊन आक्रमक वातावरण तयार केलं. यातीलच एका सभेला ममता कार्यकर्त्यांच्या घोषणेत हाजराकडे निघाल्या होत्या. अचानक रॅलीमध्ये गडबड उडाली आणि मकाप – काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 

त्याच वेळी सकाळी साधारण ११ वाजताच्या दरम्यान कम्युनिस्ट पक्षाचा कथित गुंड लालू आजमने एका धारदार हत्याराने ममताच्या डोक्यात मारलं. घाव वर्मी बसल्यानं ममता जागेवरच बसल्या. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा अगदी थोडक्यात वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये हि बातमी प्रकाशित झाल्यानंतर न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

आधी काँग्रेसचाच कार्यकर्ता असलेला लालू आजम १९८० मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी जोडला गेला होता. आपल्या भावासोबत जिल्ह्याच्या राजकारणावर होल्ड ठेऊन असलेल्या आजमला गुन्हा दाखल झाल्यावर मात्र सीपीएमनं कारवाई करत बाहेरचा रास्ता दाखवला.

तिकडं जखमी ममतांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळच्या आठवणी ममता बॅनर्जीनी आपल्या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्या म्हणतात,

त्यावेळच्या माझ्या उपचाराचा सगळा खर्च आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या राजीव गांधी यांनी केला होता. एवढंच नाही तर त्यांनी काही व्यक्तींना माझ्याकडे पाठवून तब्येतीची विचारपूस देखील केली होती. त्याचवेळी राजीव गांधींनी निरोप पाठवला होता की, गरज पडली तर पुढच्या उपचारासाठी तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता, तिथली सगळी व्यवस्था मी करून देतो. 

ममता बॅनर्जी आणि राजीव गांधी यांची पक्षात चांगली ओळख होती. ज्यावेळी १९८६ मध्ये प्रणव मुखर्जींनी काँग्रेसमधून बाहेर काढल्यानंतर राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष बनवला होता. त्यावेळी प्रणव मुखर्जींना पक्षात परत आणण्यासाठी राजीव गांधींना विनंती करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती.

पुढे १९९२ मध्ये ममतांवरच्या हल्ल्याची केस न्यायालयात उभी राहिली. डाव्यांच्या राजकारणामुळे पुढची अनेक वर्ष ही केस न्यायालयात चालली. त्यानंतर तब्बल २९ वर्षानंतर म्हणजे २०१९ साली केसचा निकाल लागला. त्यात न्यायालयानं लालू आजमची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. त्यावर ममतांनी बरीच नाराजी व्यक्त केली, पण आजम निर्दोष सुटला, हे देखील वास्तव होतं.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.