पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या प्रणबदांना नरसिंह रावांनी बरोबर कट्ट्यावर बसवलं..

प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं.

यादरम्यान ते देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री बनले. एकूणच राजकारण आणि शासन यांच्यातील उत्तम ताळमेळ बांधत ते सत्तेची एक एक पायरी सर करत गेले. २०१२ साली ते देशाचे १३ वे राष्ट्रपती बनले आणि त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा निरोप घेतला.

आयुष्यभर किंगमेकर ठरलेल्या प्रणबदांना कित्येकदा पंतप्रधान बनायची संधी आलेली पण प्रत्येकवेळी अशा काही घडामोडी घडल्या की त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्याहूनही वरचढ ठरले.

इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणब मुखर्जी या नावाचं वजन प्रचंड वाढलं होतं. देशाचे ते सर्वात तरुण अर्थमंत्री होते. पंतप्रधानांच्या खालोखाल दुसरं स्थान त्यांना होतं. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर तर प्रणब मुखर्जी इंदिरा गांधींचे वारसदार म्हणवले जाऊ लागले.

अशातच आगमन झालं राजीव गांधी यांचं.

राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले राजीव गांधी अनिच्छेनेच काँग्रेसमध्ये आले. पण तरीही प्रणबदांचं महत्व कमी झालं नव्हतं. राजीव यांनी प्रणबदांच्या मार्गदर्शनाखालीच सुरवातीची राजकीय  पावले टाकली.

पण प्रणब मुखर्जींचा वाईट काळ सुरु झाला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर.

असं म्हटलं जातं की इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर प्रणबदांना पंतप्रधान होण्याची इच्छा होती. पण इंदिरा गांधींचे सुपुत्र असल्यामुळे काँग्रेस पक्षात आणि एकूणच भारत भरात राजीव गांधींबद्दल सहानुभूतीची लाट होती. राजीव गांधी पंतप्रधान झाले. प्रणबदांची संधी हुकली. एवढंच नाही तर राजीव गांधींच्या सल्लागारांनी प्रणब मुखर्जींना पक्षातून बाहेर काढायला लावलं.

प्रणब मुखर्जी यांचा पडता काळ सुरु झाला. त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला पण त्यालाही लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. इकडे काँग्रेसची देखील राजीव गांधींच्या चुकीच्या सल्ल्यामुळे दुर्दशा सुरु झाली. बोफोर्स तोफ, रंजन्मभूमीचा प्रश्न, शहाबानो प्रकरण यात राजीव गांधींनी घेतलेल्या भूमिका चुकतच गेल्या.

अखेर १९८९ साली प्रणब मुखर्जींना पुन्हा पक्षात आणण्यात आलं. पण त्यांचा पूर्वीचा रुबाब मात्र कमी झाला होता.

१९९१ सालच्या निवडणुकी दरम्यान राजीव गांधींची हत्या करण्यात आली. काँग्रेसची सत्ता आली पण त्यांच्याकडे नेताच नव्हता. पक्षाची व देशाची कमान सांभाळण्यासाठी शरद पवार, अर्जुन सिंग, माधवराव सिंधिया अशा दिग्गज नेत्यांमध्ये चुरस होती. पण यात जिंकले काँग्रेसचे चाणक्य म्हणवले जाणारे  पी.व्ही.नरसिंहराव.

काँग्रेस पक्षाचे गांधी घराण्याबाहेरचे पहिले पंतप्रधान बनलेले नरसिंहराव हे प्रणब मुखर्जी यांचे चांगले मित्र होते. स्वतः पंतप्रधानपदाचे दावेदार असले तरी सत्ता स्थापनेसाठीचे डावपेच आखण्यासाठी प्रणब मुखर्जी यांनी नरसिंह राव यांना मदत केली होती. 

अगदी मंत्रीमंडळ तयार करताना नरसिंह राव यांनी आपल्या मित्राचा म्हणजेच प्रणबदांचा सल्ला घेतला. सर्वांना प्रणबदा अर्थमंत्री होतील अशी खात्री होती. परंतु अचानक अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव जाहीर झाले. नरसिंहराव यांनी प्रणबदांना योजना आयोगाचे उपाध्यक्ष करण्याचे ठरवले. हे ऐकून प्रणबदांना धक्का बसला. 

प्रणबदा यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांना मी विचार करून सांगतो, असे सांगितले. त्यावर नरसिंहराव म्हणाले की, 

“तुम्हाला जितका वेळ विचार करायचा तेवढा करा, पण सोमवारी कामावर रूजू व्हा”.

नरसिंहराव यांनी प्रणब मुखर्जींना आश्वासन दिलेलं कि तुम्हाला अर्थमंत्री का केलं नाही याच स्पष्टीकरण मी तुम्हाला एक ना एक दिवस नक्की सांगेन.

पण तो दिवस कधी उगवलाच नाही. नरसिंहराव यांनी चाणक्य नीती लढवून आपल्या मित्राला राजकारणाच्या बाहेर बसवलं. त्यांनी प्रणब मुखर्जींना पुढे काही महिन्यांसाठी परराष्ट्र मंत्री बनवलं पण भविष्यात आपल्या खुर्चीला धोका होऊ शकतील अशा सर्व नेत्यांचे पंख छाटण्यात ते आघाडीवर राहिले.

 पुढे प्रणब मुखर्जी देशाचे अर्थमंत्री, संरक्षण मंत्री एवढंच काय तर देशाचे राष्ट्रपती सुद्धा बनले पण त्यांना पंतप्रधान कधी होता आलं नाही. यासाठी आपल्या सख्ख्या मित्राने दिलेला दगा प्रणब मुखर्जी कधीच विसरू शकले नाहीत.

हे हि वाच भिडू

 

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.