महाराष्ट्र केसरीची गदा कोणता भिडू जिंकणार…?

महाराष्ट्राच्या रांगड्या नादा पैकी एक म्हणजे कुस्ती. या कुस्ती क्षेत्रात ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची समजली जाणारी स्पर्धा. आपल्या घरात एखादा तरी महाराष्ट्र केसरी तयार व्हावा या उद्देशाने ग्रामिण भागात अनेकांनी आपल्या पोराला तालमीत धाडलेलं असतच. हीच कुस्ती स्पर्धा दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सातारा मुक्कामी पार पडतेय.

महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटील व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मांडवे गावचा पण मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व करणारा मल्ल विशाल उर्फ प्रकाश बनकर यांच्यात रंगणार आहे.

आता या दोन पैलवान भिडूंपैकी महाराष्ट्र केसरीची गदा कोण खांद्यावर घेतो?

याची उत्सुकता महाराष्ट्राला लागुन राहिली आहे. पृथ्वीराज हा वयाने कोवळा. वय वर्ष अवघं बाविस. पण भल्या भल्यांना यांने आस्मान दाखवलंय. धिप्पाड शरीरयष्टीचा, अंगात हत्तीचं बळ असणारा, बुद्धीने चपळ असा पृथ्वीराज. नुकताच तो जागतिक विजेता देखील ठरलाय. कोल्हापुर नजिकच्या शिंगणापूर येथील शाहू आखाड्यात तो जालिंदर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. त्याच्या कामगिरीसाठी इंडियन आर्मीने त्याला नोकरी सुद्धा दिली आहे.

सध्या तो भारतीय सैन्यदलाचा मल्ल आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक तगड्या मल्लांना पराभूत करून त्याने मॅट विभागातून अंतिम फेरी गाठली आहे. अनुभवी मल्ल अक्षय शिंदे, माऊली कोकाटे यांना सहजतेने हरवत पृथ्वीराज अंतिम फेरीत दाखल झाला. आता त्याच्यासमोर पै.विशालचे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जात अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवत कोल्हापुरसाठी पृथ्वीराज महाराष्ट्र केसरीचा बहूमान मिळवून देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

पै.पृथ्वीराज पाटीलची कुस्तीतील बलस्थाने…

पृथ्वीराज हा सामना प्लेअर म्हणुन ओळखला जातो. मॅटवर तांत्रिकदृष्टया लढण्याचे कौशल्य त्याने चांगलेच अंगीकारले आहे. या तंत्राच्या जोरावर त्याने सिनिअर नॅशनल तसेच जागतिक स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. बॅक थ्रो, दुहेरी पट काढने, भारंदाज मारने असे त्याचे हुकमी डाव आहेत. कोणती ही घाई न करता प्रतिस्पर्धी मल्लाचा अंदाज घेत तो खेळी करतो.

मॅट वर आपला पवित्रा भक्कम ठेवत तो लढतो. सुरवातीला बचावात्मक आणि समोरच्या मल्लाचा अंदाज घेत तो आक्रमक होतो. शांत, संयमाने खेळ करत तो डावबाजी करतो व प्रतिस्पर्धी मल्लाच्या डावबाजीची तोड लगेच करत स्वतःचा बचाव करत गुण हासिल करण्यात त्याचा हातखंडा आहे.

आता पै. विशाल बनकर या पैलवान भिडू बद्दल आपण बोलू….

विशालला प्रकाश या नावानेही ओळखले जाते. त्याच्या घरात त्याचे चुलते तानाजी बनकर हे महाराष्ट्र केसरीचे मानकरी. उंचपुरा, चपळ, आक्रमक असा विशाल. विशाल हा कोल्हापुरच्या गंगावेश तालमीत वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. माती विभागातून महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख अशा अनेक तगड्या आणि अनुभवी मल्लांवर विजय मिळवत त्याने महाराष्ट्र केसरी ची अंतिम फेरी गाठली आहे.

काही महिन्यापूर्वी विशालने एका स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी वर धक्कादायक विजय मिळवला होता. कोणत्याही क्षणी निकाल बदलवणारा मल्ल म्हणुन तो ओळखला जातो. गंगावेश तालमीचा महाराष्ट्र केसरी किताबाचा अनेक वर्षांपासून दुष्काळा तो यंदा संपवणार का? तसेच बनकर कुटूंबात दुसरा महाराष्ट्र केसरी होणार का ? याकडे कुस्तीशौकीनांचे लक्ष लागले आहे.

पै. विशाल बनकरची कुस्तीतील बलस्थाने…

विशाल हा मातीत लढणारा मल्ल आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत ही मॅटवर खेळवली जाते. यामुळे विशालला ही लढत जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पृथ्वीराजपेक्षा विशालला कुस्तीत ला अनुभव अधिक आहे. सलामी झडताच आक्रमक खेळी करण्यात तो तरबेज आहे.

मोळी, छडी टांग, एकेरी पट असे डाव मारण्यात तो पटाईत आहे. पृथ्वीराजपेक्षा विशाल वजनाने थोडा हकला असला तरी अंगातील चपळतेच्या जोरावर तो आपला खेळ साध्य करु शकतो. आक्रमण करत अंगावर आलेल्या मल्लास लगेच छडी टांग लावण्यात तो माहिर आहे.

आज रात्री होणाऱ्या या लढतीत नेमकं कोणाच्या खांद्यावर ही गदा विराजमान होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिले आहे.

( लेखक : मतीन शेख हे पैलवान व पत्रकार आहेत. मो.नं. 9730121246 )

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.