कॉलेजच्या पोरांपासून थेट अतिरेक्यांपर्यंत भुरळ पाडणारे पिकअप ट्रक भारतात फेल झालेत

तुम्ही कधी अमेरिकन पाय सारखे अमेरिकन कॉलेज दुनियेचा ‘कूल’ अंदाज दाखवणारे पिक्चर पहिले असतील तर त्यात ती पोरं कॉलेजमध्ये आपल्यासारखी सायकल किंवा बाईक घेऊन ना येता पीक-अप घेऊन येत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. ती गोरी पोरं दफ्तर मस्त गाडीच्या ट्रालीत टाकायची आणि फुल्ल हवा करत कॉलेजमध्ये येयचीतेव्हापासून ती गाडी डोळ्यात भरलेली. 

हॉलिवूडमध्ये असा पिक्चर शोधून सापडणार नाही ज्यात पिक-अप ट्रक्स दिसत नाहीत. पण भारतात तशा गाड्या जास्त  दिसत नाहीत.आता आपल्याकडं ज्या दुधाची कॅन, भाजीपाल्याची वाहतूक करायला ज्या पीक-अप्स आहेत त्यापेक्षा हे मॉडेल्स थोडी वेगळी आहेत.

पिकअप ट्रकची संकल्पना सोपी आहे. प्रवाशांसाठी  लक्झरीयस केबिन आणि सामानासाठी मागे कार्गो बेड. 

पिकअप ट्रक मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी वाहने म्हणून वापरले जात होते परंतु, आता जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये पिक-अप ट्रक लाईफस्टाईलचा भाग झाल्या आहेत.

यूएस आणि कॅनडामध्ये सर्वाधिक विक्री होणारी वाहने पिक-अप ट्रक आहेत. 

अमेरिकन ट्रिनिटी – फोर्ड, डॉज आणि शेवरलेट दरवर्षी पिक-अप ट्रकच्या सगळ्यात जास्त विक्रीकरतात. पिक-अप ट्रक बनवणारे बाकीचे ब्रँड टोयोटा, इसुझू, निसान, माझदा ही जोरात चालतात. 

इसिसचे अतिरेकी तर ऑफिशिअल गाडी असल्यासारखी टोयोटाचे पिक-अप ट्रक वापरात होते.

 मोठ्या आणि शक्तिशाली इंजिनसह येणारे पिकअप ट्रक त्यांच्या मजबूत बेल्ट आणि कडक सस्पेंशनमुळे ते जिथं रस्ते कच्चे आहेत किंवा रस्ते नसतील तिथंही पळवता येतात. मात्र तरीही हे ‘लिट्ल बिस्ट’ भारतात चालली नाहीये.

तर बघावं म्हंटलं की अमेरिकेतील तरुणाई ते इसिसचे अतिरेकी यांना वेड लावणारी हि वाहनं भारतात का चालली नाहीत.

१)गाडी घ्यायची तर शेजराच्यापेक्षा महाग आणि भारी 

भारतात गाडी घेणं हे सोयीपेक्षा दिखाव्याचा भाग जास्त असतो. आणि याच स्टेटस सिम्बॉलमध्ये कार परफेक्ट बसते. त्यामुळं SUV च्या मागे लाखो उधळणारे आपले लोक पिकअप ट्रकच्या नादाला लागत नाही आणि मग आपले शेजारीपण नाहीत.

२)सरकारी धोरण 

पिक-अप ट्रक लोकप्रिय न होण्यामागे भारतीय सरकारचे पिकअप ट्रकबद्दलच धोरण हे आणखी एक प्रमुख कारण आहे. भारतातील पिकअप ट्रकची नोंदणी इतर प्रवासी वाहनांसारखी नाही. म्हणजे आपली पर्सनल वापरसाठी घेतलेल्या कारच्या नोंदणीचे पैसे भरल्यानंतर, त्याला पांढरी नोंदणी प्लेट मिळते. मग चालकाकडे LMV परवाना असला तरी तेव्हा प्रवासी वाहने देशात कुठेही चालवता येतात.

दुसरीकडे, पिकअप ट्रकची भारतात व्यावसायिक वाहन(Commercial vehicle) म्हणून पिवळ्या नोंदणी प्लेटसह नोंदणी केली जाते आणि चालकाकडे व्यावसायिक वाहन परवाना असणे आवश्यक आहे.तसेच, व्यावसायिक वाहन म्हणून वर्गीकृत केल्यामुळे जर त्याला राज्यांमध्ये फिरायचे असेल पिकअप ट्रकच्या मालकाला राष्ट्रीय परमिट घेणे आवश्यक आहे.

३) कितना देती है

पिक-अप ट्रकच्या पावरफुल इंजिनामुळं या गाड्यांचं मायलेज कमी असतं. त्यामुळं भारतीयांच्या कितना देती है या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर या गाड्या मार खातात. दिवेसंदिवस वाढणाऱ्या इंधनांच्या दरामुळ जास्त पेट्रोल-डिझेल खाणाऱ्या गाड्या लोकांना नको असतात.

भारतातले लोक सध्यातरी पिचरमध्येच या गाड्या ठीक आहेत असं म्हणतायत. बाकी मिरवणुकीला, वरातीला या गाड्या साजेशा आहेत पण तेव्हा एक दोन दिवसासाठी भाड्यानं घेता येतातच की. त्यामुळं सध्यातरी आपली लोकं घर जाळून कोळशाचा व्यापार नको म्हणतायत असंच दिसतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.