एकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड मार्केटमधून गायब करणार आहे
‘धूम्रपान करना मना है’ ही जाहिरात आपण टीव्हीवर किंवा थेटरमध्ये पिक्चर सुरु होण्याआधी हमखास पाहतोच. पण दोन बोटातल्या तो तंबाकूचा छोटा रोल पकडून आपण धुराचे लोट ओढतच असतो. ते पण त्याचा परिमाण माहित असताना. आजकाल तर लोक एक ‘रिच स्टाईल’ म्ह्णून सिगरेट फुकट बसतात.
घरच्यांचं ओरडून झालं, त्या आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयाचं ओरडून झालं, अनेक मोहीमा राबवल्या झाल्या, पण आमच्यावर मात्र काडीचा फरक पडत नाही, अशी भूमिका जणू या सिगरेट पिण्याऱ्यांनी घेतलीये. आता या धूम्रपान विरोधी मोहिमेत थेट सिगरेट बनवणाऱ्या कंपन्याच उतरल्यात.
आता तुम्ही म्हणाल काय पण फेकतात? पण हेच खरं आहे भिडू.
जगातली सगळ्यात मोठी सिगरेट कंपनीचं सिगरेट विकणं बंद करणारे. ही कंपनी म्हणजे फिलिप मॉरिस. जी मार्लबोरो नावाची आपली वर्ल्ड फेमस सिगरेट बाजारात विकते.
एकेकाळी जेव्हा जगभरात सिगरेट बंदीच वारं वाहत होतं. त्यावेळी कंपनी या बंदीच्या विरोधात जात लोकांना सिगरेट ओढायला प्रोत्साहित करत होत, सिगरेटच्या नवनवीन स्टाईल शिकवत होतं. पण आता हीच कंपनी सिगरेट पिण्याच्या विरोधात असणाऱ्या मोहिमेत सामील होत ब्रिटनमध्ये सिगरेट विकणं बंद करणार असल्याचं म्हंटल जातंय.
आता कंपनी हे का करतेय ते तर आपण जाणून घेऊच, पण त्याआधी या ब्रँड कंपनीबद्दल थोडी माहिती घेऊ.
तर १८४६ चा तो काळ.
फिलिप मॉरिस नावाच्या एका ब्रिटिश व्यक्तीनं लंडनच्या बाँड स्ट्रीटवर तंबाकू आणि गुंडाळलेल्या सिगारेटचं दुकान टाकलं. पुढं १८७३ मध्ये कॅन्सरनं त्याचा मृत्यू झाला. ज्यांनंतर त्याचा भाऊ लिओपोल्डनं हा व्यवसाय चालू ठेवला, तो वाढवला आणि लंडनच्या ग्रेट मार्लबरो स्ट्रीटवर कारखाना उघडला.
त्यावेळी ती कंपनी Phillip Morris Companies Inc. म्हणून ओळखली जायची, नंतर त्याच्या मालकांनी या कंपनीसाठी एक साधं नाव निवडलं, ते म्हणजे ‘मार्लबोरो’
कंपनीनं आपल्या सिगरेट ब्रॅण्डची विक्री वाढवण्यासाठी १९०२ मध्ये न्यूयॉर्कमध्ये आणखी एक कंपनी उघडली. यांनतर १९०८ ला अमेरिकेत ‘मार्लबोरो’ नावं कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं, दरम्यान १९२३ पर्यंत या नावाने सिगरेट बाजारात विकली जात नव्हती. मात्र, १९२४ ला हा ब्रँड लॉन्च झाला, ते ‘अमेरिकेची लक्झरी सिगरेट’ म्ह्णून.
१९३० च्या आसपास “Mild As May” या स्लोगनच्या आधारावर महिलांची सिगरेट म्हणून त्याची जाहिरात केली गेली. हे नाव लंडनमधल्या एका रस्त्यावरून घेतलं गेलं होत, जिथं कंपनीचा कारखाना होता.
कंपनी फिल्टर सिगरेट म्हणून त्याची विक्री करू लागली, कारण फिल्टर सिगरेट अनफिल्टर सिगरेटपेक्षा जास्त सेफ होती. त्यामुळे पुरुषांबरोर महिला ग्राहकांची संख्याही वाढली. पुढे त्यात अनेक बदल केले गेले. नवनवीन स्टाईल्स विकसित केल्या गेल्या. जेणेकरून सिगरेटच्या खपात वाढ होईल. ज्यात, फ्लेवर्ड, लाईट, अल्ट्रा लाईट, मिडीयम, माईल्ड, आईस ब्लास्ट सारख्या पॅकचा समावेश केला गेला.
दरम्यान, १९६० नंतर सिगरेट ओढल्याने कॅन्सर सारखा आजार होतो, यावर संशोधन झालं. ज्यामुळे अर्थातच कंपनीवर परिणाम झाला. पण कंपनीने आपली मोहीम आखली, आणि जाहिरातींमधून सिगरेटच्या वेगवेगळ्या स्टाईल सांगितल्या.
मात्र, आता कंपनीचं सिगरेटच्या विरोधात बोलायला लागलीये. त्यामागं कारण म्हणजे सिगरेट विरोधात जगभरात तयार झालेलं जनमत. बऱ्याच देशांत तर या सिगरेट ओढणाऱ्यांची संख्यादेखील कमी झालीये. तर काही देशांमध्ये तर तंबाकू आणि सिगरेटवर बंदी आणलीये. जगभरात या उत्पादनांवरचा कर देखील वाढवला जातोय. जी परिस्थिती भारतात सुद्धा आहे. ज्याचा परिणाम अर्थातच उत्पादनाच्या किमतीवर झालाय. यामुळे सिगरेट बनवणाऱ्या कंपन्या भिकेला लागल्यात.
आता या सगळ्या दबावामुळंच सिगरेट कंपन्यांनी सुद्धा सिगरेटच्या विरोधात बडगा उचललाय. जवळपास सगळ्या कंपन्या आपल्या उत्पादनावर त्याच्या हानीकारण परिणामांविषयी माहिती द्यायला लागलेत. ‘क्विट ऑर्डिनेरी स्मोकिंग’ अशी संकल्पना देखील कंपन्यांनी सुरु केलीये.
स्मोकिंग प्रॉडक्ट बंद करायचीय
याच साखळीत आता फिलिप मॉरिस कंपनीचे सीईओ जेसेक ओल्जाकने थेट घोषणा करत म्हंटल कि,
ब्रिटनमध्ये लोकांची सिगरेट पिण्याची लत संपवण्याच्या अभियाना अंतर्गत कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. येणाऱ्या १० वर्षात मार्लबोरो हा सिगरेट ब्रँड मार्केटमधून गायब होईल.
जेसेक ओल्जाकने पुढे म्हंटल कि, तरीही ज्या लोकांना स्मोकिंग सुरु ठेवायचीये त्यांना ई- सिगरेट किंवा गरम तंबाकू उपकरणं सारख्या आधुनिक पर्यायांवर स्विच करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. कंपनीनं २००८ पासून या ‘स्मोक फ्री’ प्राॅडक्ट्सवर काम करायला सुरुवात केलीये. ज्यासाठी आठ बिलिअन डॉलर्स एवढा खर्चही त्यांनी केलाय.
कंपनी तोटयात जातेय, पण भविष्यासाठीची तयारी म्हणा किंवा लोकांच्या मनातली जागा टिकून ठेवण्यासाठी कंपनी ही धडपड करतेय. कारण कंपनीला ऑर्डीनरी सिगरेटमधून शंभर टक्के व्यवसाय व्हायचा. पण आता स्मोक फ्री उत्पादनामुळे हा व्यवसाय तीस टक्क्यांवर येऊन पोहोचलाय. मात्र पुढच्या ४-५ वर्षात हा व्यवसाय ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.
तस पाहायचं झालं तर, फिलिप मॉरिस इंटरनॅशनलचा हा निर्णय ब्रिटनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण १०० पेक्षा जास्त वर्षापासुन ही सिगारेट कंपनी ब्रिटनमधील लोकांची पहिली पसंती राहिली आहे.
दरम्यान, ब्रिटन सरकारने २०३० पर्यंत देशाला ‘धूम्रपान मुक्त’ करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केलीये, ज्यात वेगवेगळ्या वयोगटा दरम्यान सिगारेटचे पिण्याचं प्रमाण कमी करण्याच्या योजनेचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत ब्रिटनमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविण्याची योजना आहे.
ब्रिटनच्या आधी भूतान हा जगातील पहिला देश आहे ज्याने तंबाकू आणि सिगरेटच्या उत्पादनावर बंदी घातलीये. यासोबतच कॅनडा, कोस्टा रिका, कोलंबिया, मलेशिया सारख्या देशांनी सिगरेट बंदी मोहीम लागू केलीये.
आता जगभरातील या देशांमध्ये सुरु असलेल्या या मोहिमेमुळे अनेक सिगरेट कंपन्यांवर टाळ ठोकायची वेळ येणार एवढं मात्र नक्की!
हे ही वाच भिडू :
- लस घेतल्यानंतर मावा खाल्ला तर चालतो का ; गायछाप, सिगरेट, दारूचं काय वाचा..
- जेव्हा नेहरूंचं सिगरेटचं पाकिटं आणण्यासाठी स्पेशल विमान पाठवलं होतं
- ई सिगरेट काय भानगड असते, सरकार त्यावर बंदी का आणतय..?