कुठलाही पिक्चर शुक्रवारी रिलीज होण्यामागे फक्त ‘वीकेंड’ हे कारण नाहीये…
आठवड्यातला शुक्रवार हा वार आपल्याला प्रेयसीइतका प्रिय असतोय. कसंय वीकेंड आलेला असतो, ऑफिसमधला आठवड्याभराचा ताण जरा कमी झालेला असतो. लोकांचे ओले सुखे प्लॅन्स बनत असतात आणि बऱ्याच जणांना दुसऱ्यादिवशी सुट्ट्याही लागलेल्या असतात.
पण अजून एक गोष्ट या वाराचं महत्व वाढवत असते ते म्हणजे या दिवशी रिलीज होणारे पिक्चर.
आता कुठलाही पिक्चर शुक्रवारीच रिलीज होण्यामागे, वीकेंडचा वार आणि लोकांचे मूड ही दोन कारणं तर आहेतच, पण हे एवढंच नाहीये. बरेचसे पिक्चर शुक्रवारी रिलीज होण्याला याहूनही काही वाढीव कारणं आहेत.
खरं सांगायचं म्हणजे, हॉलीवुडवाल्यांची गाणी, त्यांच्या गाण्याच्या चाली, त्यांचं कल्चर, त्यांची भाषा आणि बोली या सगळ्यासोबतच बॉलीवुडवाल्यांनी पिक्चर रिलीज करण्याचा वारही त्यांच्याकडूनच घेतलाय असं आपण म्हणू शकतोय.
१५ डिसेंबर १९३९ साली हॉलीवुडमध्ये ‘गॉन विथ द विंड’ नावाचा पहिला पिक्चर रिलीज झाला. आणि त्या दिवशी शुक्रवारच होता. हा पिक्चरच मग पुढे ट्रेंड सेटर ठरला आणि त्यानंतर हॉलीवुडचा येणारा प्रत्येक पिक्चर शुक्रवारीच रिलीज व्हायला लागला.
पण हा ट्रेंड त्याकाळी आपल्या बॉलीवुडपर्यंत पोहोचला नव्हता. बॉलीवुडमध्ये शुक्रवारी पिक्चर रिलीज करण्याचा ट्रेंड सेटर बादशाह ठरला के. आसिफ यांचा ‘मुगले आजम’ हा पिक्चर.
मुगले आजमने त्याकाळी इंडस्ट्रीत हवा केलेली. या पिक्चरमध्ये दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर यांच्यासारखे एक सो एक कलाकार भरलेले होते.
मुगले आझम हा बॉलीवुड मधला पहिला पिक्चर होता जो ठरवून शुक्रवारी रिलीज केला गेला. त्याआधी इकडले पिक्चर कधीही आणि कुठल्याही दिवशी रिलीज होत असत. पण मुगले आजम सिनेमाचे प्रोड्यूसर के. आसिफ यांनी ठरवलंच होतं की हा सिनेमा काय पण होऊदे, शुक्रवारीच रिलीज करायचा.
झालं, सिनेमा ५ ऑगस्ट १९६० साली, शुक्रवारच्या दिवशी रिलीज झाला आणि तूफान गाजला, वाजला, हिट झाला आणि त्यामुळेच भारतातला ट्रेंड सेटर ठरला. या पिक्चरने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली.
मुगले आजमचं यश बघून सगळे डायरेक्टर्स आणि प्रोड्यूसर्स आपापले सगळे सिनेमे शुक्रवारच्या दिवशीच रिलीज करायला लागले. आणि मग हाच ट्रेंड पुढे फॉलो केला प्रादेशिक भाषांमधल्या सिनेमांनी सुद्धा. मराठी, तमिळ, तेलगू, गुजराती, बंगाली, मल्याळम, पंजाबी सगळ्याच भाषांमधले सिनेमे शुक्रवारीच रिलीज होऊ लागले.
ह्यातला महत्वाचा फॅक्टर असा होता की त्याकाळी, मुंबईतल्या छोट्या छोट्या कंपन्यांना हाफ डे असायचा. त्यात त्यावेळी कलर टीव्ही सुद्धा आलेले नव्हते. मग लोकांना हा मिळालेला हाफ डे मनासारखा एंजॉय करता यावा म्हणून पिक्चर्स शुक्रवारीच रिलीज करण्याची प्रथा पडली. आणि लोकांनी पण हा पॅटर्न उचलून धरला. लोकं सुद्धा शुक्रवारचा दिवस खास सिनेमासाठी राखीव ठेवायला लागले.
अजून एक भन्नाट कारण सांगायचं म्हणजे, भारतात शुक्रवार हा वार लक्ष्मीचा मानला जातो. आता पिक्चर काढल्यावर तो पिक्चर किती कमावतोय हे पहाव लागतंच. आणि पिक्चरने चांगला गल्ला जमवावा यासाठी लक्ष्मी देवी प्रसन्न व्हायला नको का. मग तिला इम्प्रेस करायला म्हणून शुक्रवारी पिक्चरचा रिलीज ठेवला जाई.
मुहूर्त काढून, नारळ फोडून, देवीची आणि सगळ्या देव देवतांची विधिवत पूजा करून मग पिक्चर रिलीज करायची प्रथा पडली ती आज तागायत सुरू आहे.
अध्यात्मिक कारण झालं, शिवाय.. शुक्रवारच्या दिवशी पिक्चर रिलीज करण्यामागे एक कमर्शियल कारण सुद्धा आहे. ते म्हणजे, इतर दिवसांच्या तुलनेत, मल्टीप्लेक्सच्या मालकाला पिक्चरच्या स्क्रीनिंगसाठी काही विशिष्ठ अमाऊंट द्यावी लागते जी कमी असते म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी स्क्रीनिंग रेट खूप कमी असतात.
आणि सिनेमाच्या प्रोड्यूसरला बजेटचं गणित सांभाळायचं असतं त्यामुळे जिथं खर्च वाचवता येईल तिथं तो वाचवणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं. यामुळेच जवळ जवळ सगळ्याच सिनेमांच्या निर्मात्यांचा, सगळे सिनेमे शुक्रवारीच रिलीज करण्याकडे जास्त कल असतोय.
आता नियमांना सुद्धा अपवाद असतातच. मुळात सिनेमा शुक्रवारीच रिलीज करायला पाहिजे असा काय नियम नाहीचे. शेवटी ते सिनेमाच्या प्रोड्यूसरवर अवलंबून असतं.
एक सिनेमा होता जो वार पाहून नाही तर तारीख पाहून रिलीज केला गेला होता, तो म्हणजे ‘रंग दे बसंती’ या सिनेमाची संपूर्ण स्टोरीलाइन देशभक्तीशी निगडीत असल्याने हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज करण्यात आला होता.
शिवाय २०१६ सालादरम्यान, सिनेमा शुक्रवारी सोडून गुरवारी रिलीज करण्याचाही ट्रेंड येऊन गेला होता. इरू मुगन आणि वाईमाई नावाचे दोन तामीळ सिनेमे हे त्या साली गुरवारी रिलीज झाले होते.
आता पुन्हा कुठल्याही शुक्रवारी, कुठल्याही सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलात आणि तुमच्या आजू बाजूच्यांना सुद्धा जर हे वाराचं कोडं पडलं असेल तर त्यांना हा लेख दाखवायला विसरू नका..
हे ही वाच भिडू:
- या पाच भारतीय सिनेमांचं नाव गिनीज बुकात आहे, पण कारणं मात्र साधी नाहीत
- हिंदी असो वा मराठी सगळ्या सिनेमांच्या मेकअपचा बादशाह विक्रम गायकवाड आहे