त्या घटनेमुळे इरफान खानने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं…

बॉलिवुड म्हणजे एक मायाजाल आहे. जिथं तुम्हाला तुम्ही काय चीज आहात हे दाखवून द्यावं लागतं ,तुमचं नाणं जर इंडस्ट्रीत खणखणीत वाजलं तर तुम्ही लवकर लवकर काम मिळवू शकता आणि जर का गेम उलटा पडला तर तुम्हाला कायम म्हणजे बराच काळ स्ट्रगल करत बसावा लागतो. आजही बॉलिवूडमध्ये आत्ता काही वर्षात अशा स्ट्रगल करून आलेल्या अभिनेत्यांना काम मिळाली आणि प्रेक्षकांडून शाबासकी मिळाली. बी टाऊनमध्ये तुमच्या घरचं बॅकग्राऊंड मजबूत असेल म्हणजे जर तुमचं जवळच कोणी इंडस्ट्रीत काम करत असेल तर तुमचं लवकर काम होऊ शकतं असं म्हणतात नाहीतर स्ट्रगल अटळ आहे.

पण काहीजण असतातच लढण्यासाठी आणि ते विजेते सुद्धा बनतात. अशातलाच एक हिरा म्हणजे इरफान खान. ज्याच्या डोळ्यात कायम एक गूढ जाणवत राहिलं ,डोळ्यातून अभिनय करणारा आणि एक सगळ्यांना आवडणारा अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफान आज आपल्यात नसला तरी तो प्रत्येकाच्या आत आहे. अजुनही त्याचा सिनेमा टीव्हीवर दिसला तर कट्टर इरफान फॅन थोडावेळ थांबून का होईना सिनेमा पाहतो. पण इरफान खानसुद्धा बराच स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये आला. टीव्ही सिरीयल, छोट्या पडद्यावरून इरफानने आपली इनिंग सुरू केली होती.

आजचा किस्सा आहे अशा एका घटनेचा ज्याच्या धसक्याने इरफान खान बरेच दिवस त्याच्या बेडरूममधून बाहेर निघाला नव्हता. जेव्हा एखाद्या अभिनेत्याला काम मिळत नाही तेव्हा तो वैफल्यग्रस्त असतो, काय करावं त्याला सुचत नाही आणि अशाच काळात एखादं काम मिळालं तर तो लय जीव लावून काम करतो कारण त्याला माहिती असतं की हे काम वाजलं तरच आपल्याला पुढची कामं मिळतील. इरफान त्या काळात सिरीयल करत होता. छोट्या पडद्यावर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असायचा. दिवसरात्र काम करून स्ट्रगल करत होता. इतकी काम तो करायचा की स्वतःची काळजी वैगरे हे सगळं त्याच्या लक्षातून गेलं होतं.

असाच एकदा तो शूट उशिरा पॅकअप झालं म्हणून प्रोडक्शनची कार घेऊन रूमवर निघाला. तो इतका बेक्कार थकलेला होता की त्याला कळत नव्हतं आपण काय करतोय. डोळ्यावर झोपेची झापड होती. हा थकवा इतका झाला की ड्राइव्ह करत असताना भर रस्त्यात इरफान खानला स्टेरिंग व्हीलवर झोप लागली. भर रस्त्यात गाडी लावून कोण झोपलंय म्हणून गाडीभोवती लोकांची गर्दी होती. सकाळ झाली आणि इरफान उठून डोळे चोळत आजूबाजूला बघू लागला.

या घटनेबद्दल इरफान सांगतो की,

मला माहिती नव्हत मी किती वेळ झोपलो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ऊन पडलेलं होत, लोकांची गर्दी होती.

घरी आल्यावर इरफान या घटनेने घाबरून गेला की इतकं काम का करतोय आपण आणि जीवाला का जाळून घेतोय. या घटनेचा त्याला प्रचंड धक्का बसला. तो इतक्या दिवसांचा थकवा त्याला आला होता की त्या थकव्याच्या धसक्याने आणि कामाच्या धास्तीने इरफान जे त्याच्या खोलीत गेला ते थेट काही दिवसांनी बाहेर आला. या दिवसांमध्ये त्याने बराच विचार केला की काय करावं.

त्या काळात त्याने निर्णय घेतला की भविष्यात जे काही झालं तरी चालेल, सिनेमा मिळो अथवा न मिळो पण परत छोट्या पडद्यावर काम करायचं नाही. असा हा इरफान पुढे सतत काम करत राहिला आणि चांगलं काम करत राहिला. बॉलिवूडचा सगळ्यात चांगला अभिनेता म्हणून इरफानचा उल्लेख करावाच लागतो हे ही तितकंच महत्वाचं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.