त्याच्या आईनं धक्का देऊन ढकललं, पण रेखानं शेवटपर्यंत विनोद मेहराची साथ सोडली नाही…

हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते 

वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते…

हे लिहिलंय गुलजार साहेबांनी. आणि हे आठवण्याचं कारण म्हणजे रेखा. पहिल्या मिनिटालाच काळजाचा ठोका चुकवणारी दोन नावं. गुलजार साहेबांच्या कविता असतील किंवा गाणी आपण त्यामुळे कित्येक रात्री जागलो. रेखाचं तर फक्त दिसणंच खुप होतं.

तिचं आणि अमिताभचं अफेअर होतं का? रेखानी लग्न नाय केलं तर ती सिंदूर का लावते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले. ज्याची ऊत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न केला नाय, आपण पाहिलं की रेखा अजूनही सुंदर दिसते… विषय संपला.

दुसऱ्या बाजूचा कार्यकर्ता म्हणजे विनोद मेहरा. पिक्चरमध्ये हिरोचा भाऊ, हिरोचा मित्र असे लई कार्यकर्ते असतात, पण आपल्या लक्षात हीरोच राहतो. पण काही काही अभिनेते असे असतात, जे भले हिरोच्या मित्राच्या भूमिकेत असले, तरी आपल्या लक्षात राहतात.

विनोद मेहरा असाच कार्यकर्ता, दुसऱ्या बाजूचा. भावाला मुख्य अभिनेता म्हणून संधी तशी अभावानंच मिळाली. बालकलाकार म्हणून वयाच्या १३ व्या वर्षीच रागिणी नावाच्या पिक्चरमधून मेहरानं चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यानं जानी दुश्मन, नागिन, घर, स्वर्ग-नर्क, साजन बिना सुहागन, अमर दीप अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

अभिनेता म्हणून तर मेहरा भारी होता, पण कधी कधी कसं होतं आपल्याला भाजीपेक्षा लोणचं जास्त आवडतंय. मेहराचंही तसंच झालं, त्याच्या अभिनयापेक्षा जास्त चर्चा त्याच्या खासगी आयुष्याची आणि लग्नांची झाली.

त्यानं पहिलं लग्न केलं अभिनेत्री मीना ब्रोकासोबत. मात्र मेहराला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्याची तब्येत आणि ब्रोकासोबतचं नातं दोन्ही गोष्टी खराब होत गेल्या. पुढं त्यांचं लग्न मोडलं आणि मेहराच्या आयुष्यात आली बिंदिया गोस्वामी. त्यांनी लग्न केल्याच्या भरपूर चर्चा झाल्या, पण पुढं बिंदियानी जेपी दत्ता सोबत लग्न केलं.

बिंदियाच्या नंतर मेहराच्या आयुष्यात आली स्वप्नसुंदरी… रेखा. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्यांच्या अफेअरची चर्चा सगळ्या बॉलिवूडमध्ये होती. असं म्हणलं जातं की प्रेमात बुडालेल्या या दोन जीवांनी कोलकात्यात लग्नही केलं. मेहरा नव्या नवरीला घेऊन आपल्या घरी आला. मेहराच्या आईला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. तिनं आपल्या पाया पडणाऱ्या रेखाला लांब ढकललं आणि या जोडीला बाहेर काढलं. साहजिकच रेखा आणि मेहराचं लग्न मोडलं. पण प्रेम नाही…

मेहरानं यानंतर किरण मेहरासोबत लग्न केलं. पण दोनच वर्षांनी मेहराला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याची जीवनयात्रा अवघ्या ४५ व्या वर्षी संपली. किरण मेहरा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत, रेखा आणि विनोदच्या नात्याबद्दल खुल्या दिलानं सांगितलं.

त्या म्हणाल्या, “विनोदच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत कुणी त्याच्या सोबत असेल, तर रेखा.  रेखा अत्यंत प्रेमळ आहे. तिनं आमच्या लग्नालाही हजेरी लावली होती. आजही आमचे घरगुती संबंध आहेत.”

कित्येक अडचणी आल्या, अपमान सहन करावे लागले…  पण रेखाचं प्रेम थांबलं नाही… अगदी विनोद मेहराच्या अंतिम क्षणांपर्यंत..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.