तो भारताचा लेफ्टी द्रविड ठरला असता, पण सिलेक्टर्सच्या चुकीमुळे देशासाठी खेळता आलं नाही

सितांशू कोटक. तुम्ही याआधी फारसं नाव ऐकलं असेल. नुकतीच त्याची इंडिया ए टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झालीये. त्याच्याबद्दल सांगताना आकडेवारी सुरुवात करण्यापेक्षा एक किस्सा सांगतो. म्हणजे हा गडी काय ताकदीचा होता, हे लक्षात येईल.

२००८-०९ ची रणजी ट्रॉफी स्पर्धा, प्रचंड कष्ट करुन सौराष्ट्राच्या टीमनं सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. फायनल जिंकण्यापेक्षा मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं, ते म्हणजे सेमीफायनलला मुंबईला हरवणं.

एकतर मुंबई म्हणजे दादा टीम, त्यात सचिन तेंडुलकर, वसीम जाफर, अमोल मुझुमदार, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर अशी बॅटिंग आणि झहीर, आगरकर, रमेश पोवार असली तगडी बॉलिंग. मुंबईनं सौराष्ट्राला तुफान हाणला, जाफर ३०१, सचिन १२२ आणि रहाणे ८५. टोटल स्कोअर झालेला ६३७.

सौराष्ट्राची बॅटिंग सुरुवातीलाच ढेपाळली, मुंबई विषय एन्ड करणार असं वाटत होतं. तेवढ्यात एका प्लेअरनं क्रीझवर पाय रोवले. त्याच्या बॅटमधून रन्स बनत नव्हते, पण त्यानं मुंबईच्या बाप बॉलर्सला वैताग आणला होता. जवळपास ५ तास गडी क्रीझवर होता.

शेवटी सचिन त्याच्या जवळ गेला आणि म्हणला, “कोटक, सब लोग बोलते है कोटक आऊट नहीं होता. आज मैने भी देख लिया तू आऊट नही होता, मार और आऊट होजा.”

कोटक काय हलला नाही, त्यानं २११ बॉल खेळत ८९ रन्स केले, त्याची विकेट काढायला मुंबईच्या बॉलर्सला बराच घाम गाळावा लागला. (हा किस्सा कोटकनं स्वतः ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलाय.)

हे क्रीझवर थांबणं आणि कधी बॉलर्सची, कधी नशिबाची परीक्षा बघणं हे सितांशू कोटकच्या आयुष्याचंच सूत्र होतं. त्याच्या नावावर आज ८ हजार पेक्षा जास्त रन्स आहेत, १५ शतकं आहेत, अगणित मॅच विनिंग परफॉर्मन्स आहेत, फक्त एक गोष्ट नाहीये ती म्हणजे इंडिया कॅप.

जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक संधी हुकली की हताश होणारे आणि दुसरे प्रयत्न करत राहणारे. यातल्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांची टीम बनवली, तर कोटक त्यांचा कॅप्टन बनू शकतोय.

१९७२ मध्ये जन्मलेल्या कोटकनं वयाच्या फक्त २० व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यासाठीही स्ट्रगल होताच. झोनल मॅचेसमध्ये मोजक्याच संधी मिळायच्या, त्यातली प्रत्येक संधी भावानं गाजवली आणि अखेर सौराष्ट्राच्या संघात त्याला जागा मिळाली.

पहिलीच मॅच मुंबईसोबत होती. त्यात डोक्यावर प्रेशर होतं की इकडं परफॉर्मन्स झाला नाही, तर टीममधून बाहेर जावं लागणार. म्हणजे एका मॅचमध्येच विषय कट. पण कोटकनं या सगळ्याचा विचार केला नाही, तो आपला स्कुटरवर किटबॅग टाकून मॅचसाठी आला. दणादणा विकेट्स पडल्यावर क्रीझवरही आला आणि दुसऱ्याच बॉलला सलील अंकोलाला खणखणीत चौका हाणला. पहिल्याच मॅचमध्ये कोटकनं फिफ्टी मारली होती.

हा फिफ्टीचा सिलसिला सलग ७ मॅचेस कायम होता, समोर कुठलीही टीम आली तरी कोटकच्या बॅटमधून एकतरी फिफ्टी फिक्स असायची.

कोटक भारी खेळायचा खरा, पण त्याच्या नावाची फारशी चर्चा व्हायची नाही. त्याचं कारण सिम्पल होतं. कोटकचा स्टान्स दिसायला सुंदर नव्हता, थोडा चंद्रपॉल सारखा उभा राहून तो बॅटिंग करायचा. स्ट्रोक्स पण सुंदर नव्हते, पण गडी खोऱ्यानं रन्स काढायचा. त्याचा स्टान्स तो बदलू शकत नव्हता, अनेक ठिकाणी त्यानं याचं कारण सांगितलेलं की, ‘मला योग्य अशी कोचिंग मिळाली नाही, त्यामुळं स्टान्स चुकत गेला.’ पण या गोष्टीचा कोटकनं कधी बाऊ केला नाही.

आपलं रन्स काढायचं आणि टीमला जिंकवून देण्याचं काम त्यानं कायम ठेवलं होतं.

त्याची कामगिरी बघून सगळीकडून एकच गोष्ट विचारली जात होती, कोटक भारताकडून कधी खेळणार? भारतीय टीममध्ये सचिनचा दबदबा होता, द्रविड, लक्ष्मण आपलं स्थान भक्कम करत होते आणि सितांशू कोटक न थकता सिलेक्शनसाठी प्रयत्न करत होता.

पण संधीच्या ऐवजी त्याच्या आयुष्यात ट्रॅजेडी आली…

१९९८ मध्ये त्याला टीम इंडियामध्ये सिलेक्ट होण्याचा गोल्डन चान्स होता. त्यानं आधी रणजी ट्रॉफी गाजवली, त्यानंतर दुलीप आणि देवधर ट्रॉफीही. इराणी कपसाठी त्याचं सिलेक्शन रेस्ट ऑफ इंडिया टीममध्ये झालं. समोर कर्नाटक आणि त्यातही जवागल श्रीनाथ होता. श्रीनाथनं रेस्ट ऑफ इंडियाच्या बॅटिंगचा बाजार उठवला होता, अपवाद फक्त कोटकचा होता. त्यानं खतरनाक सेंच्युरी मारली, पार श्रीनाथ आणि कुंबळेला चोपकाम दिलं. श्रीनाथनं त्याचं कौतुकही केलं. बीसीसीआयमध्ये सितांशू कोटक या नावाची चर्चा झाली होती.

लवकरच भारताची टीम जाहीर होणार होती, मात्र त्यात सितांशू कोटक हे नावच आलं नाही. कारण सिलेक्शन करणाऱ्या चंदू बोर्डे यांना त्याचं वय ३७ वर्ष वाटलं होतं, जे प्रत्यक्षात फक्त २७ वर्ष होतं.

या एका नजरचुकीमुळे सितांशूचा चान्स गेला, जो परत आलाच नाही. जेव्हा त्याचं वय खरंच तिशीच्या पार गेलं, मात्र तरीही परफॉर्मन्सवर जराही फरक पडला नव्हता. त्यानं रन्स करणं कायम ठेवलं होतं. मात्र आता सौराष्ट्राच्या सिलेक्टर्सनं त्याला वयाचंच कारण देत रणजीच्या पुढं फारसा चान्स दिला नाही.

दुसरीकडे भारतीय टीममध्ये पार्थिव पटेल, महेंद्रसिंह धोनी असे कित्येक ‘सुंदर’ बॅटिंग न करु शकणारे, काहीसे अनऑर्थोडॉक्स प्लेअर आले पण सितांशू कोटक भारतीय टीममध्ये सिलेक्ट झालाच नाही.

पण तरीही सितांशूनं डोमेस्टिक क्रिकेट खेळणं सोडलं नाही. त्याला माहीत होतं की, आपलं नाव आता टीम इंडियाच्या लिस्टमध्ये येणार नाही. त्याला फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची होती की, ‘माझं सिलेक्शन झालं नाही, पण मीही तुमच्याच स्टॅंडर्डचा प्लेअर आहे.’

सितांशू थोडी नाही, तर तब्बल २१ वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिला. सौराष्ट्राच्या टीममध्ये रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे नवखे प्लेअर्स येऊन सेट झाले होते. सितांशूकडेही दुसऱ्या टीम्सकडून खेळण्याचा पर्याय होता, मात्र त्यानं उगाच फेमची हाव धरली नाही आणि सौराष्ट्राकडून रन्स करणंच कायम ठेवलं.

त्यानं डोमेस्टिक क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली ऑक्टोबर २०१३ च्या शेवटी. त्याचवेळी देशात सचिन तेंडुलकरच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू होती, त्यामुळं सितांशू इथंही झाकोळला गेला.

रिटायरमेंटनंतर त्याची नवी इनिंगही भारी ठरली…

त्यानं सौराष्ट्राचा कोच म्हणून काम पाहिलं, टीममध्ये फास्ट बॉलर्सचं नवं कल्चर आणलं आणि दुसऱ्याच सिझनला टीमला फायनलमध्येही नेलं. त्यानंतर त्यानं नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये कोच म्हणून काम पाहिलं, त्यानंतर ‘इंडिया ए’च्या सपोर्ट स्टाफमध्ये, अंडर-१९ टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सितांशू दिसत राहिला.

जेव्हा वयाचा आकडा चुकीचा वाचल्यामुळं त्याची टीम इंडियामधून खेळायची संधी हुकली होती, तेव्हा त्याला इंडिया ए कडून खेळायची संधी मिळाली होती. आता सितांशू त्याच इंडिया ए टीमचा कोच झालाय. चांगलं कोचिंग मिळालं असतं, तर कदाचित सितांशूला फक्त स्टान्समुळं डावलण्यात आलं नसतं, आपल्यासोबत जे झालं ते आता दुसऱ्या प्लेअर्ससोबत होऊ नये यासाठी तो झटतोय.

२०७-०८ मध्ये मुंबईविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये सितांशू कोटक ७९६ मिनिटं क्रीझवर उभा होता, मुंबईच्या विजयाच्या आशा या एकट्या बादशहानं खोडून काढल्या होत्या. त्याच्याकडे टिच्चून खेळायची ताकद होती, स्वतःपेक्षा जास्त टीमचा विचार करायची सवय होती, रिटायरमेंटनंतरही तो प्लेअर्स घडवण्यातच रमला… सेम द्रविड सारखंच!

त्याला भले भारताकडून खेळायची संधी मिळाली नसेल, तो भले द्रविडसारखा लोकप्रिय झाला नसेल,  पण एखादा माणूस आपल्या तत्वांशी, टीमशी आणि या खेळाशी प्रामाणिक राहिला तर किती मोठ्ठा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणून सितांशू कोटक कायम लक्षात राहील, एवढं खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.