फॉर्म, टॅलेंट की राजकारण… संजू सॅमसनचं दरवेळी गंडतं कुठं..?

२०१९ चा डिसेंबर महिना, भारताची वेस्ट इंडिजसोबत टी२०सिरीज सुरू होती. सिरीजची दुसरी मॅच होती, केरळच्या तिरुवनंतपुरमला. टॉसच्या आधी कोच रवी शास्त्री आणि इतर सगळे प्लेअर्स ग्राउंडवर आले. इतर ठिकाणी विराट कोहली ग्राऊंडमध्ये दिसला की लोकं कल्ला करायची, पण फॅन्सनं खच्चून भरलेलं तिरुवनंतपुरमचं स्टेडियम कोहली दिसला तेव्हा शांत होतं. तिकडं कल्ला सुरू झाला तो संजू सॅमसन दिसल्यावर.

संजू… संजू

हा आवाज सगळ्या स्टेडियममध्ये घुमू लागला. हा सपोर्ट इतका मोठा होता की रवी शास्त्रीनंही सॅमसनला चिअर केलं. सगळं तिरुवनंतपुरम सॅमसनला आपल्या घरच्या मैदानावर खेळताना पाहायला उत्सुक होतं. त्यानंतर टॉस पडला, टीम जाहीर झाली.. पण संजू सॅमसनचं नाव त्यात नव्हतं.

आपल्या घरच्या मैदानावर खेळायची संधी सॅमसनला मिळाली नाही.

२०२२ चा सप्टेंबर महिना, टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती. अनेकांनी अंदाज लावले, ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला, टीम जाहीर झाली… पण संजू सॅमसनचं नाव त्यात नव्हतं.

सध्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान टी २० सिरीज सुरु आहे.  श्रेयश अय्यर, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली. मंगळवारी झालेल्या सामन्यात अंतिम ११ मध्ये संजू सॅमसनला चान्स देण्यात आला  नाही. त्यामुळे परत एकदा भारतीय क्रिकेट चाहते चिडले आहे.

वर्ष बदलली, ठिकाणं आणि स्पर्धा बदलली, पण संजू सॅमसनचं नशीब काही बदललं नाही. भारतीय टीम जाहीर होण्याआधी सॅमसनला चान्स मिळणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षात त्याचं नाव लिस्टमध्ये येत नाही. यांची नेमकी कारणं काय ?

कारणं समजून घेण्याच्या आधी थोडी आकडेवारी बघुयात…

संजू सॅमसननं भारताकडून टी२० मध्ये पदार्पण केलं ते जुलै २०१५ मध्ये. आजपर्यंत त्याच्या नावावर फक्त १६ टी२० मॅचेस आहेत. म्हणजे पोरं वर्षभरात जेवढ्या मॅचेस खेळतात, तेवढ्या हा सात वर्षात खेळलाय. विशेष म्हणजे पहिल्या टी२० नंतर दुसरी टी२० मॅच खेळायला त्याला २०१५ ते २०२० अशी ५ वर्ष वाट पाहावी लागली होती. वनडेमध्ये सॅमसनचं पदार्पण झालं, तेच २०२१ मध्ये. तेही श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दुसऱ्या फळीच्या टीम इंडियामधून.

त्यामुळं करिअर दिसायला ७ वर्ष जुनं दिसत असलं, तरी सॅमसनला म्हणावी तितकी संधी मिळाली नाही, हे नाकारुन चालत नाही.

आता वळूयात कारणांकडे 

पहिलं कारण म्हणजे सातत्य

संजू सॅमसनकडे टॅलेंट आहे का ? तर भरपूर आहे. त्याच्याकडे चांगलं शॉट सिलेक्शन आहे, प्रेशर सिच्युएशन्स हॅन्डल करायला थंड डोकं आहे, टेक्निकच्या बाबतीतही सॅमसन अनेकांपेक्षा उजवा ठरतो, पण विषय गंडतो तो सातत्यात. एखाद्या सिरीजमध्ये संधी मिळाल्यावर सलग मोठे स्कोअर लावले, तर सहसा संघातलं स्थान जात नाही. मात्र सॅमसनचं घोडं इथंच अडतं.

डिसेंबर २०२० मध्ये इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जुलै २०२१ मध्ये इंडिया विरुद्ध श्रीलंका आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा इंडिया विरुद्ध श्रीलंका, सॅमसननं या तिन्ही दौऱ्यात एकूण ८ इनिंग्स खेळल्या. मात्र यातल्या एकदा पण त्याला फिफ्टी मारता आली नाही. त्याचा टॉप स्कोअर राहिला ३९ रन्स. साहजिकच आकड्यांचं पाठबळ नसल्यानं त्याला मिळणाऱ्या संधीत अंतर पडत गेलं आणि जेव्हा टी२० वर्ल्डकप किंवा एशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांची वेळ आली तेव्हा सॅमसनचं नाव रेसमधून बाहेर पडलं.

टीम इंडियामध्ये असलेली स्पर्धा बघता, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करणं गरजेचं झालंय. सॅमसन शेठ इथंच गंडतात.

दुसरं कारण म्हणजे बॅकिंग

आता पहिल्या कारणावरुन तुम्ही सॅमसनची मापं काढली असतील, तर दुसरं कारण जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सॅमसन तसा ओपनिंग बॅट्समन. त्यानं भारताकडून ओपनिंग केलीये फक्त ४ वेळा. या इनिंगमध्ये त्यानं आपली एकमेव फिफ्टी मारत १०५ रन्स केलेत. तर ७ वेळा चौथ्या नंबरवर खेळत १०९ रन्स केलेत. ओपनिंगला खेळताना सॅमसनचा स्ट्राईक रेट १६४.०६ आहे, तर चौथ्या नंबरला खेळताना १२६.७४.

टी२० क्रिकेटमध्ये ओपनिंगला येणारा प्लेअर अँकरची भूमिका निभावू शकतो, चौथ्या नंबरवर खेळणाऱ्याकडून बऱ्याचदा मोठ्या शॉट्सची अपेक्षा असते. आता मोठे शॉट्स खेळताना साहजिकच रिस्कही मोठी असते. ही रिस्क घेताना अपयश येऊ शकतं, अशावेळी प्लेअरला जास्तीत जास्त संधी मिळायला पाहिजे, पण सॅमसनला ती मिळत नाही आणि रिस्क घेऊन खेळण्यात आलेलं अपयशच डोळ्यावर येतं.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं सॅमसनकडे असलेल्या शॉट्सचं कौतुक केलं होतं. तेव्हा रोहित असंही म्हणाला होता की, ‘टी२० वर्ल्डकपसाठी जेव्हा ऑस्ट्रेलियाला जाल, तेव्हा असे शॉट्स खेळण्याची ताकद असणं गरजेचं आहे.’ 

तेव्हा सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजसाठी चान्स मिळाला होता, जिथं त्यानं ३९ आणि १८ असे स्कोअर केले. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध त्यानं एकाच इनिंगमध्ये ७७ रन्स केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन इनिंग्समध्ये मिळून ३० रन्स केले. पण यानंतरही त्याचा टी२० वर्ल्डकपसाठी विचार झाला नाही. कारण काही अपयशानंतरही टीममध्ये राहण्यासाठी आवश्यक असणारा पाठिंबा त्याला मिळाला नाही, असं क्रिकेट वर्तुळात बोललं जातं.

तिसरं कारण म्हणजे, केरळ लॉबीचं नसलेलं अस्तित्व

आजवर भारताकडून किती केरळचे प्लेअर्स खेळले ? एक आठवतो एस श्रीशांत आणि दुसरा ? टिनू योहानन. श्रीशांत फिक्सिंगच्या राड्यात घावला, तर योहाननला फक्त ६ मॅचेसमध्ये संधी मिळाली. श्रीशांत तर प्रचंड टॅलेंट असूनही चुकीत घावला, तर योहाननमध्ये गुणवत्ता असूनही त्याच्यासाठी शब्द टाकणारं, बीसीसीआयमध्ये वजन टाकणारं फार कुणी नव्हतं. एमआरएफ पेस फाऊंडेशनचा विद्यार्थी असणारा योहानन स्पर्धेत टिकू शकला नाही.

आपल्या खेळाडूंसाठी बोलायला, त्यांची बाजू लाऊन धरायला केरळमध्ये प्रशासनात वजन असलेले माजी खेळाडूच नाहीत. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते सातत्यानं चांगली कामगिरी करत असले, तरी त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाईल असा वाढीव परफॉर्मन्स त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळं केरळच्या टीमचं आणि प्लेअरचं नाव चर्चेत येतं पण या चर्चांचा कालावधी कमी असतो.

संजू सॅमसनला अगदी अंडर-१३ कॅम्पपासून राजकारणाचा फटका बसला होता. त्यामुळंच त्याच्या वडिलांनी दिल्ली सोडून, केरळमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. केरळमध्ये सॅमसनला संधी मिळाली, त्यानं ती गाजवली ही. २०१७ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत मारलेल्या सलग तीन सेंच्युरीजमुळं त्याची हवा झाली होती. 

मात्र त्याला खऱ्या अर्थानं बूस्टर दिला तो आयपीएलनं.

दिल्ली डेअरडेव्हील्सकडून खेळताना मारलेली सेंच्युरी असेल किंवा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत दुसऱ्याच सिझनला टीमला आयपीएल फायनलपर्यंत पोहोचवणं असेल, सॅमसननं आयपीएल गाजवली. इथं त्याच्या खेळात सातत्य होतं, मात्र मोक्याच्या क्षणी मोठ्या इनिंग खेळण्यात आलेलं अपयश त्याला भोवलं, संजू सॅमसन आयपीएल स्टार झाला, पण इंटरनॅशनल स्टार होणं मात्र त्याला जमलं नाही.

दिनेश कार्तिक कनेक्शन

सॅमसनच्या जागी वर्ल्डकपसाठी दिनेश कार्तिकची निवड झालीये. सॅमसननं वयाच्या १९-२० व्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं होतं आणि डीकेनंही. जेव्हा कार्तिकला संधी मिळायला हवी होती, तेव्हा धोनी पुढं आला. २००७ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये कार्तिक खेळला होता, त्यानंतर त्याला थेट वयाच्या ३७ व्या वर्षी भारताकडून टी२० वर्ल्डकप खेळायची संधी मिळालीये.

हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे, सॅमसनला संधी मिळायला हवी होती, तेव्हा पंत, ईशान किशन अशी नावं चर्चेत आली. जे डीकेसोबत झालं तेच सॅमसनसोबत. पण डीकेनं वय वैगेरे गोष्टी मागे टाकत आपल्या खेळाचं रुप बदललं आणि पुन्हा संघात जागा मिळवली.

सॅमसनकडून आता हीच अपेक्षा आहे, फक्त सगळ्यांचं नशीब सारखं नसतं हे विसरुन चालत नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.