भारतासाठी वर्ल्डकप खेळणारी फुटबॉलर आता फूड डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करते…

खेळ म्हणलं की भारतीयांच्या डोक्यात सगळ्यात आधी येतं ते क्रिकेट. आपल्याकडं क्रिकेटला खेळ म्हणून कमी आणि धर्म म्हणून जास्त बघितलं जातं. त्यामुळे, क्रिकेटर्सना देण्यात येणारं मानधनही प्रचंड मोठं असतं. अगदी इतकं मोठं की, जगातल्या सगळ्यात श्रीमंत खेळाडूंच्या यादीतही भारतीय क्रिकेटर्स असतात.

त्यामानाने भारतात फूटबॉल मात्र बऱ्यापैकी दुर्लक्षितच आहे. नाही म्हणायला अलीकडे भारतात फूटबॉलचंही वेड हळूहळू पसरायला लागलंय. ते पण फक्त फिफा वर्ल्ड कप आला की पोरांच्या तोंडात मेस्सी, रोनाल्डो, नेमार, एम्बाप्पे या खेळाडूंची नावं असतात आणि मग एक प्रश्न विचारला जातो की, भारताची फूटबॉल टीम कुठाय?

भारताची टीम फार कुठं दिसत नाही हे बोलतानाच भारतातल्या फूटबॉलर्सची अवस्था कशी आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. हीच अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओत एक २४ वर्षांची मुलगी झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करण्याचं काम करताना दिसतेय. ही फूड डिलीव्हरी करणारी मुलगी आहे, पोलामी अधिकारी. ती डिलीव्हरी एजंट होण्याआधी इंटरनॅशनल फूटबॉल प्लेयर होती.

कोलकात्यातला हा व्हिडीओ संजुक्ता चौधरी यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय. व्हिडीओमध्ये त्यांनी पोलामीसोबत संवादही साधलाय. या व्हिडओमध्ये पोलामी म्हणतेय,

“राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फुटबॉल खेळूनही काहीही निष्पन्न झालं नाही, तेव्हा मला माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी फूड डिलीव्हरी एजंट म्हणून काम करावे लागतंय.”

पोलामी आंतरराष्ट्रीय पातळीवर फूटबॉल खेळली आहे.

 

२०१२ साली झालेल्या अंडर १६ एशियन फूटबॉल कॉन्फिडरेशनमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर २०१६ साली ग्लासगो, स्कॉटलंड येथे होमलेस विश्वचषक स्पर्धेतही तिने देशाचं प्रतिनिधित्व केलंय.

आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलामी हिची बऱ्याच मीडिया एजन्सीजने मुलाखत घेतली. या मुलाखतींमध्ये तिने फूटबॉल सोडण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.

तिचं असं म्हणणं आहे की, “माझं फुटबॉल थांबावं असं मला कधीच वाटलं नाही, पण आर्थिक परिस्थितीमुळे मला हे काम सुरू करावं लागलं.”

“साधे ५०० रुपये किमतीचे बूट घेण्यासाठी मला माझ्या वडिलांना विचारावं लागायचं. ते नक्कीच पैश्यांची व्यवस्था करतील हे ही मला माहिती होतं. परंतु मला माहित आहे की त्या ५०० रुपयांसाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “वडिलांनी माझ्यासाठी जे काही करता येईल ते केलं पण माझ्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मी डिलिव्हरी एजंट बनण्याचा निर्णय घेतला.”

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फूटबॉल खेळलेली पोलामीचं शिक्षणही सुरू आहे. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार पोलामी ही सध्या चारुचंद्र कॉलेजमध्ये बी ए च्या फायनल ईयरमध्ये शिकतेय.

पण कठीण वेळ आली असली तरी, तिने फूटबॉल अजूनही सोडलेलं नाही.

सध्या ती फूड डिलीव्हरी एजंट म्हणून काम करतेय. सोबतच तिचं शिक्षणही सुरू आहे. दिवसातील जवळपास १२ तास फूड डिलीव्हरी केल्यानंतर ती दररोज किमान २ तास तरी फूटबॉल प्रॅक्टीस करते. त्यामुळे, पोलामी मध्ये एक फूटबॉलर होण्याची इच्छा आजही कायम आहे, एवढं नक्की.

आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक गोष्ट चांगली घडली आहे. तिला फुटबॉल फेडरेशनकडून फोन आला असल्याचंही तिने एका मुलाखतीत सांगितलंय. आता तिला आलेला हा फोन तिच्या फूटबॉलमधल्या करीअर पुन्हा एकदा स्पीडअप करू शकतो का याकडे भारतातल्या मोजक्याच असल्या तरी फूटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.