लेजंड्सच्या गिणतीत कधी आला नसला, तरी तातैंदा तैबू लेजंड्सपेक्षा भारी होता…

काय बोलतोय भिडू? तातैंदा तैबू लेजंड्सपेक्षा भारी? म्हणजे सचिन, वॉर्न, द्रविड यांच्यापेक्षा भारी? शक्य तरी आहे का? असा प्रश्न तुम्हाला फिक्स विचारावा वाटत असणार. आता आकडेवारी, विजतेपदं या बाजूनं विचार करणार असाल, तर तो भारी नसेलही. पण भारी असणं हे नेहमी आकड्यात नसतं मोजायचं.

तैबू भारी का आहे याचा एक किस्सा सांगतो…

आम्हा भिडू लोकांचा एक दोस्त आहे, ज्याला क्रिकेटबद्दल जराही आवड नाही. सचिन शंभर करायचा तेव्हाही त्याला लय आनंद व्हायचा नाही आणि आता विराट शून्यावर आऊट झाला तरी त्याला लय दुःख होत नाही. एखाद्या प्लेअरचं नाव विचारलं की तो म्हणतो, ”हा, माहितीये की.” असंच एकदा त्याला तातैंदा तैबूबद्दल विचारलं, भावानं विकेटकिपिंगची ऍक्शन करुन दाखवली, वर म्हणला ”बुटकं होतं पण भारी खेळायचं.”

एखाद्या क्रिकेट न बघणाऱ्या, फारसं न आवडणाऱ्या माणसालाही तैबू लक्षात राहतो, तेही तैबूनं रिटायरमेंट घेतल्याच्या १० वर्षानंतर. म्हणून तो भारीये.

२००० सालातली गोष्ट आहे, क्रिकेटची आवड असणाऱ्या, शाळेकडून-क्लबकडून क्रिकेट खेळणाऱ्या १६ वर्षांच्या पोराला थेट झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाकडून बोलावणं आलं. त्याचं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पणही झालं नव्हतं. पण साडेपाच फूट उंचीच्या, बारकी पोरं असतात तशा चपळतेच्या त्या प्लेअरमध्ये झिम्बाम्ब्वेला भविष्य दिसलं होतं.

त्यांच्या टीमला मोठा वारसा लाभलेला, ते भले ऑस्ट्रेलियासारखे खुंखार नसतील पण अँडी फ्लॉवर, ग्रँट फ्लॉवर आणि हीथ स्ट्रीक सारख्या प्लेअर्समुळं त्यांचीही हवा होती. तैबू आला तोच अँडी फ्लॉवरच्या जागी. त्यानं २००१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आधी टेस्ट आणि मग वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

वयाच्या १९ व्या वर्षी तैबू वर्ल्डकपमध्ये खेळत होता, त्याआधी अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. चाहत्यांना वाटत होतं, की झिम्बाब्वे आणि तैबू दोघांचं फ्युचर प्रचंड ब्राईट आहे. कारण स्टम्पमागे असल्यावर त्याचे हात, पाय आणि मेंदू सुपरफास्ट काम करायचे. कधी कॅचेस सोडायचा नाही आणि स्टंपिंगचा तर नाद नाही.

बॅटींगला आल्यावरही फेल जाईल असं नाही. आता तैबूची बॅटिंग सचिनसारखी सुंदर किंवा धोनीसारखी स्फोटक नव्हती पण भारी होती एवढं फिक्स.

२००४ मध्ये एक लय भारी गोष्ट घडली. तातैंदा तैबू वयाच्या विसाव्या वर्षी झिम्बाब्वेचा कॅप्टन झाला. त्याचं झालेलं असं की, क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या राड्यामुळं ग्रॅण्ट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक यांच्यासकट १३ प्लेअर्सना टीमबाहेर ठेवलेलं.

अगदी नवखी टीम घेऊन तैबू श्रीलंकेविरुद्ध खेळायला उतरला. दोन्ही ओपनर्स शून्यावर आऊट झाले आणि तैबू क्रीझवर आला. एका बाजूनं दणादणा विकेट्स जात होत्या पण तैबूनं दुसरी बाजू लाऊन धरली आणि शेवट्पर्यंत टिकून राहत नॉटआऊट ९६ रन्स केले. 

शेवटच्या ओव्हरला त्याला फक्त दोनच बॉल खेळायला मिळाले, नायतर कॅप्टन्सीच्या पदार्पणातच सेंच्युरी फिक्स होती. पुढं झिम्बाब्वेनं मॅच जिंकली आणि कॅप्टन तैबू प्लेअर ऑफ द मॅच ठरला.

अगदी लहान वयात कॅप्टन झाल्यावर कुणाचेही पाय हवेत जातील, पण तैबूचे जमिनीवरच राहिले. अशातच २००५ च्या जानेवारीमध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट मॅचमध्ये त्यानं पहिल्या इनिंगला ८५ आणि दुसऱ्या इनिंगला १५३ रन्स मारले. झिम्बाब्वेचे अच्छे दिन आलेले, मोठमोठी नावं नसली तरी साडेपाच फुटी कॅप्टन त्यांना पुढे नेत होता.

नोव्हेंबर २००५ मध्ये त्यानं अचानक कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याचं जाहीर केलं. कारण होतं झिम्बाब्वे क्रिकेटची परिस्थिती आणि अंतर्गत वाद. रिटायरमेंटनंतर तैबूनं मोठा डाव खेळायचं ठरवलं. तो साऊथ आफ्रिकेकडून खेळायचे प्रयत्न करू लागला, पण नियम आणि अटी कठोर होत्या. त्यामुळं हे गणित काय जमून आलं नाही आणि तैबूनं २००७ मध्ये पुन्हा झिम्बाब्वेची वाट धरली.

२००८ मध्ये तैबू कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळला, पण इथं ३ मॅचेसमध्ये खेळताना त्याला विशेष छाप पाडता आली नाही. झिम्बाब्वेच्या टीममध्ये तो पुन्हा रेग्युलर झाला होता. मात्र २००९ मध्ये पुन्हा त्याचे बोर्डासोबत वाद झाले. क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यासोबत त्याची मारामारी झाल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. झालं १० मॅचेसचा बॅन बसला.

पुढं २०११ मध्ये तैबू झिम्बाब्वेकडून वर्ल्डकप खेळला. त्याचवर्षी झिम्बाब्वेनं टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, मॅच सुरू व्हायच्या आधी तैबूनं झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची मापं काढली. पुढं ११ महिनेच झाले असतील, बऱ्यापैकी खेळणाऱ्या तैबूनं अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. कारण त्याला चर्चच्या कामासाठी स्वतःला वाहून घ्यायचं होतं.

२०१६ मध्ये तो लिव्हरपूलमधल्या जिल्ह्याच्या क्रिकेट टीमकडून खेळू लागला, मग पुन्हा झिम्बाब्वेमध्ये सिलेक्टर म्हणून आला. नंतर श्रीलंकेला क्रिकेट खेळायला गेला आणि सध्या इंग्लंडमध्ये निवांत वेळ घालवतोय.

तैबू क्रिकेटमधून रिटायर झाला, तेव्हा त्याचं वय फक्त २९ वर्ष होतं. कित्येक प्लेअर्स ज्या वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करतात, आपल्या करिअरच्या शिखरावर असतात, त्या वयात तैबू रिटायर झाला. 

तो अशा देशातून पुढं आला होता, जिथं क्रिकेट खेळण्यासाठीच्या फारशा सुविधा नव्हत्या. जिथं तुम्ही किती रन्स करताय यापेक्षा मोठी लढाई, जगण्याच्या हक्काची होती. 

ती लढल्यानंतर मग क्रिकेटच्या मैदानात उतरणं शक्य होतं. तिथंही राजकारण होतं, वर्णभेद होता, ज्यामुळं त्याच करिअर खऱ्या अर्थानं बहरुच शकलं नाही. 

काही चुकल्यावर आपल्या कोचचा आणि वडिलांचा मार खाणारा तातैंदा तैबू सगळ्या अडचणींवर मात करुन मैदानात टिकून राहिला. सुर्दैवानं त्याची एंट्री लवकर झाली आणि दुर्दैवानं एक्झिटही. त्यानं १५० वनडे मॅचेस खेळल्या, २८ टेस्ट, १७ वनडेही. टीमला गरज असेल, तेव्हा किपींग सोडून बॉलिंग केली, खोऱ्यानं रन्स केले, कॅचेस पकडले. 

जेवढं खेळला, भारी खेळला… म्हणून तर तैबूला कुणीच विसरू शकलेलं नाही. ना एखादा क्रिकेट एक्सपर्ट आणि ना क्रिकेट ‘न बघणारा’ आमचा दोस्त…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.