योगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..
गोरखपूरचे गोरखनाथमठ राजकारणात आपले महत्व राखून आहे. आजचे गोरखनाथ मठाचे पीठाधीश योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी नाथसंप्रदायाच्या या मठाचे मुख्य महंत होते योगी अवैद्यनाथ.ते सुद्धा खासदार आणि रामजन्मभूमी आंदोलनातले प्रमुख नेते होते.
जवळपास वीस वर्षं गोरखपूरची लोकसभा सीट गोरखनाथ मठामध्ये होती. फक्त भारतातच नव्हे तर नेपाळच्या गोरखा समाजामध्येही या मठाचा राजकीय प्रभाव आहे.
या गोरखनाथ मठाच्या राजकारणाची पाळेमुळे शोधली तर ती,
योगी दिग्विजयनाथ यांच्यापर्यंत जाऊन पोहचतात.
राजस्थानच्या नन्नूसिंग याला लहानपणीच गोरखपूरला मठात आणण्यात आलं. महंत बनण्यासाठीच्या शिक्षणाबरोबर त्याला इंग्लिश कॉलेजमध्येही पाठवण्यात आले. त्याची नवी ओळख योगी दिग्विजयनाथ अशी होती. योगी दिग्विजय नाथ यांना कॉलेजपेक्षा राजकारणात जास्त रस होता. ब्रिटिशांच्या विरुद्धची स्वातंत्र्याची चळवळ ऐनभरात होती. गांधीजीनी असहकार आंदोलन सुरु केलं होत. दिग्विजयनाथ यांनी कॉलेज सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आंदोलनात उडी घेतली..
५ फेब्रुवारी १९२२,
गोरखपूर जवळच्या चौरीचौरा गावात पोलीस आणि आंदोलनकर्ते एकमेकांसोबत भिडले होते.
पोलिसांनी सत्याग्रहीच्यावर गोळीबार केला. यामुळे खवळलेल्या आंदोलनकर्त्यानी चौरीचौरा पोलीसस्टेशन आणि त्यासोबत २३ पोलीस जाळून खाक केले. यामध्ये आघाडीवर होते २६ वर्षाचे दिग्विजयनाथ. त्यांना अटक झाली. गांधीजी चळवळीच्या सुरवातीपासून अहिंसात्मक सत्याग्रहाचे आग्रही होते. चौरीचौरामधल्या हिंसेमुळे निराश होऊन त्यांनी असहकार आंदोलन मागे घेतले.
दिग्विजयनाथ यांना आपली फसगत झाल्यासारखे वाटले. त्यांनी काँग्रेस सोडली. एव्हाना १९३२साली गोरखनाथ मठाचा उत्तराधिकारी म्हणून बाबा ब्रम्हनाथ यांनी त्यांची निवड केली होती. १९३५ मध्ये ब्रम्हनाथ यांच्या निधनानंतर दिग्विजयनाथ महंत बनले. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांची राजकारणाची खुमखुमी शांत झाली नव्हती.
१९३७ साली त्यांनी नवा पक्ष जॉईन केला “हिंदू महासभा”. अध्यक्ष होते वि.दा.सावरकर.
देशाला स्वातंत्र्य तर मिळेलच पण आधी हिंदुना सन्मान मिळवून देणे आपले प्रमुख उद्देश आहे असा नारा देणारे दिग्विजयनाथ आपली राजकीय दिशा स्पष्ट करत होते. आता कट्टर हिंदूत्ववाद हाच त्यांच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय होता. हिंदुमहासभेचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष झाले. आपल्या महंत म्हणून असणाऱ्या प्रभावाचा खुबीने राजकीय फायदा घेतला. गोरखनाथ मठाचे सुद्धा विस्तारीकरण केले.
इंग्रज ४७ साली देश सोडून गेले, पण जाताना फाळणीचे घाव घालून गेले.
हिंदूमहासभेने फाळणीविरुद्ध रान उठवले. गांधीजींना याचा दोषी मानून त्यांचा खून करण्यात आला. योगी दिग्विजयनाथ यांची अटक करण्यात आली. सरदार पटेलांच्या गृहमंत्रालयाने त्यांच्यावर आरोप ठेवला होता की हत्येच्या आधी ३ दिवसापूर्वी एकेठिकाणी दिग्विजयनाथ गर्दीला गांधीजीच्या हत्येसाठी उकसवत होते. ९ महिने जेल मध्ये काढल्यावर त्यांची सुटका झाली.
दिग्विजयनाथना राजकारणात पुढे येण्यासाठी कार्यक्रम हवा होता.
अयोध्या रामजन्मभूमीच्या रुपात त्यांना तो सापडला.
साल होत १९४९. भगवान श्रीराम या जनतेच्या हळव्या बाजूला हातर घालायचं त्यांनी ठरवलं. अखिल भारतीय रामायण महासभेच्या वतीन महंत दिग्विजयनाथांनी बाबरी मशिदीच्या समोर रामचरितमानसच नऊ दिवसांचे पठन आयोजित केलं.
याच पठणाच्या शेवटच्या दिवशी २२ डिसेंबर १९४९च्या मध्यरात्री अचानक बाबरी मशिदी मध्ये “रामलल्ला प्रगटले”
पुढे अनेक वर्षांनी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये अखिल भारतीय रामानंद संप्रदायचे महंत राम सेवक दास शास्त्री यांनी सांगितलं की, मी स्वतः आपल्या हाताने ही मूर्ती तिथे ठेवली. सोबत अनेक सहकारी देखील होते. भगवान रामाने दृष्टांत दिला ते प्रगट झाले. म्हणून आम्ही त्यांची प्रतिष्ठापना केली.
या सगळ्याचा मुख्यसूत्रधार योगी दिग्विजयनाथ होते हे बोलले गेले. त्यांचे भक्त तर अभिमानाने योगीनी स्वतःच्या हाताने रामसीतेची मूर्ती मशिदी मध्ये स्थापन केली असे सांगत होते.
नेहरूंच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मशिदीतून रामाची मूर्ती हलवण्याचा आदेश दिला पण तेव्हाचे फैझाबादचे जिल्हाधिकारी केके नायर यांनी यावरून हिंसक दंगल होऊ शकते या कारणाने मूर्ती हटवण्यास नकार दिला. पुढे फैझाबादच्या लोकल पोलिसांनी दंगली होऊ नयेत म्हणून मशिदीची दारे बंद केली व कुलूप घातले..
बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर उभे राहिले पाहिजे याचा लढा उभारून स्वामी दिग्विजयनाथ राजकारणात आले.
या मुद्द्यावर त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या. १९५१ मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विरुद्ध फुलपूर लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहिले. जनतेने त्यांना नाकारले. यानंतर गोरखनाथ मठ जिथे आहे त्या गोरखपूर या आपल्या घरच्या मतदारसंघातून तीनचार निवडणुका लढल्या.
अनेकदा पराभव पचवल्यावर अखेर१९६७ साली दिग्विजयनाथ गोरखपुरचे खासदार बनले.पण दोनच वर्षात त्यांचे निधन झाले.ज्या केके नायर यांनी त्या दिवशी रामलल्लाची मूर्ती हटवण्यास नकार दिला होता तेही राजकारणात आले. त्यांनी जनसंघ कडून उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक लढवली व जिंकले देखील.
पुढे गोरखनाथ मठाचे महंत झालेले अवैद्यनाथ आणि त्यानंतरचे आदित्यनाथ यांनी रामजन्मभूमी आंदोलन आणि राजकारण हा दिग्विजयनाथांचा वारसा पुढे नेला.
राम मंदिराच्या शिलान्यासाची पहिली कुदळ अवैद्यनाथ यांच्या हस्ते चालवली गेली होती तर आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना राम मंदिर शक्य झाले.
६ डिसेंबर १९९२रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर जवळपास २७ वर्ष लागली अखेर मागच्या वर्षी या केसचा निकाल लागला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच भूमी पूजन होत आहे.
हे ही वाच भिडू.
- रामजन्मभूमीसाठी बॉम्बस्फोटाचा प्लॅन करणारा तो, आज काय करतोय..?
- ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे योगी आदित्यनाथ कसे झाले ते वाचा !
- अयोध्येत राम मंदिराच्या अगोदर, कोरियाच्या राणीचं स्मारक बांधल जातय !