संजय राऊत म्हणतायेत महाराष्ट्रात “सत्ताबदल” होणार…पण कोणत्या आधारावर ?

गेल्या आठवडा भरातल्या राजकीय घडामोडी पाहिल्यास समजून येईल कि, विरोधी पक्षातील नेते एक स्टेटमेन्ट दाव्यानिशी करतायत ते म्हणजे…”महाराष्ट्रात लवकरच सत्तापरिवर्तन होणार”.

राजकीय नेत्यांची विधानं ही फक्त बोलण्यापूरती असतात असंही आपल्याला वाटू शकतं.. पूर्वी भाजपचे नेतेही म्हणायचे  ‘महाविकास आघाडी सरकार पडणार’..खरंच महाविकास आघाडी सरकार पडलं.

आता महाविकास आघाडीचे नेते म्हणतायेत शिंदे सरकार पडणार. मागेच शरद पवार म्हणालेले शिंदे सरकार पडणार, मध्यावधी निवडणूका लागणार.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले कि महाराष्ट्रात लवकरच ‘सत्ताबदल’ होणार…शरद पवारांनीही मध्यावधी निवडणूकांचं भाकीत वर्तवलेलं..पण हे नेते कोणत्या आधारावर अशी विधानं करतायेत ??? खरंच शिंदे सरकार अस्थिर होईल का ? आणि झालं तरी कोणते मुद्दे कारणीभूत ठरणार तेच बघूया..

१. सुप्रीम कोर्टाचा निर्णय.

१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं त्यावर शिवसेनेचे काही बंडखोर आमदार शिवसेनेत परत यायला तयार होतील का हे कळेल कारण जर का शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होईल आणि त्यांची आमदारकी धोक्यात येईल.

या भीतीपोटी शिंदे गटात असणाऱ्या एकूण ४० आमदारांपैकी, किमान ३ ते ५ आमदार जरी शिवसेनेत माघारी फिरले तरीही बाकीच्यांचं अवघड होऊन बसणार.  दुसरा पर्याय जो आहे तो म्हणजे विलीनीकरण. शिंदे गटाला सत्तेत राहण्यासाठी आणि कारवाईपासून बचाव करण्यासाठी प्रहार, मनसे किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल.

आता ज्या प्रकारे शिंदे गटातील आमदार स्वतःला ठासून शिवसैनिक म्हणवतात ते पाहता दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार होतील याबद्दल शंका आहे. म्हणूनच सद्या जे बंडखोर आमदार आहेत किंव्हा स्थानिक नेते आहेत ते कोर्टाच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झालेली तेंव्हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयानंतर साडेचार महिन्यांनी नव्याने स्थापन झालेलं सरकार कोसळलं होत..तशीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा निर्माण होण्याची शक्यता  व्यक्त केली जातेय.

२. मंत्रीमंडळ विस्तार.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अजूनही लागलेला नाहीये. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली, त्याला जवळपास महिना पूर्ण होतोय. या महिन्याभारत एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीत जाऊन आलेत, तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये.  

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोनच जणांचं मंत्रिमंडळ राज्यात अस्तित्वात आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीत बंडखोर आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार हटणार का हे कळेल मग त्यानंतर मंत्रिपदं नेमकी कुणाला द्यायची यावरून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. 

पण मंत्री मंडळाला होणारा विलंब हा बंडखोर आमदारांच्या अस्थिरतेंचं महत्वाचं कारण ठरू शकतं.

आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. 

कारण जर मंत्रीमंडळाला उशीर झाला तर शिवसेनेचे बंडखोर आमदार अस्वस्थ होऊन घरवापसी करू शकतात. आणि जरी मंत्रिमंडळ विस्तार झालाच, अन काही आमदारांना मंत्रिपदं नाही मिळाली तर ते नाराज होऊन शिंदे गटातून बाहेर पडू शकतात.

३. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे दौरे यांना मिळणारा प्रतिसाद.

शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय.  उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावलाय, अलीकडेच त्यांनी थेट रस्त्यावर उतरून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं घोषित केलंय, या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून होणारे. 

प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.  उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याने शिवसेनेला पुन्हा उभारी मिळेल, शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले कार्यकर्ते पुन्हा मूळ पक्षात परततील असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जातोय.

तर आदित्य ठाकरे देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. 

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी निष्ठा यात्रा सुरू केलेली. या निष्ठा यात्रेत शिवसेनेच्या २३६ शाखांना भेट देण्याचं सत्र सुरु केलं. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या शाखांना भेटी देतायेत, जागोजागी गर्दी केलेल्या शिवसैनिकांमध्ये जाऊन बंडखोरांवर टीका करतायेत.

शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी या यात्रा काढल्या जातायेत ज्याला लोकांची आणि शिवसैनिकांची चांगलीच गर्दी तर होतेच आहे शिवाय ठाकरेंना जनतेत सहानुभूती मिळत असल्याचं दिसून येतंय. 

पक्षाच्या उभारणीसोबतच, महानगरपालिका निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी या दौऱ्यात प्रयत्न होत आहेत.

४. मतदार संघाचे राजकारण जिथे बंडखोर आमदारांना कट्टर शिवसैनिकांचा विरोध होतोय.

बंडखोरांना शिव्या-शाप देत सुरुवातीला रडणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी बहुमताच्या ऐनदिवशी शिंदे गटात एंट्री मारली. त्यानंतर संतोष बांगर यांच्या विरोधात गद्दार असा ट्रेंड सुरु झालेला. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक ठिकठिकाणी बांगरांच्या विरोधात आक्रमक झालेले. 

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तरांच्या विरोधात शिर्डीमध्ये मुस्लिम शिवसैनिकांनी भव्य मोर्चा काढत, जाहीर केलेलं कि, “त्यांनी एक अब्दुल सत्तार नेला पण आम्ही हजारो मुस्लिम शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत”. तेच दुसरीकडे संतप्त शिवसैनिकांनी तानाजी सावंतांचे कार्यालय फोडल्याचं आपण पाहिलंय.

तर अलीकडेच शिवसैनिकांनी आमदार सुहास कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोलनाक्यावर अडवला होता. शिंदे गटात जाऊन मातोश्रीला सवाल करणारे आणि थेट आदित्य ठाकरेंशी नडणारे सुहास कांदे गद्दार आहेत अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्या अडवल्या होत्या.

अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्याही विरोधात आक्रमक शिवसैनिकानीं शहरात  ‘होय मी गद्दार आहे’ असे पोस्टर लावून विरोध केलेला. ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या बॅनरला, फोटोना काळं फासलं तर काहींचे पुतळे जाळले. 

तर खासदारांच्या बंडानंतर देखील शिवसैनिकांमध्ये हीच आक्रमता दिसून आली. त्याचं उदाहरण म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसैनिकांनी हिंमत असेल तर निवडणुकीत पुन्हा निवडून दाखवण्याचं आव्हान दिलंय.

५. राजकीय संघर्षात काही बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असाचं करतायेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा ‘पक्षप्रमुख’ हा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आणि माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला, एकनाथ शिंदेच नाही तर संजय शिरसाट, शंभूराज देसाई, उदय सामंत, संदिपान भूमरे यांनी देखील माजी मुख्यमंत्री असाच उल्लेख केलाय. 

असं असलं तरी शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे मोठे नेते रामदास कदम असतील, गुलाबराव पाटील, तसेच आमदार योगेश कदम, यामिनी जाधव आणि इतरही काही आमदारांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असाच केला आहे.

त्यामुळे आजही अनेक बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरें पक्षप्रमुख म्हणून  हवेत तर एकनाथ शिंदे विधीमंडळनेते म्हणून हवेत हे स्पष्ट होतय. 

तेच अलीकडे संजय राऊत म्हणालेले की, “भावनेच्या भरात, काहींना फसवून शिंदे गटात सामील केलं गेलंय. त्यातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल” आता हा दावा खरा की खोटा हे येणारा काळ ठरवेलचं..  

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.