प्रेमम, दृश्यम, चार्ली… हे १० मल्याळम सिनेमे पाहायलाच लागतायत भिडू

तुम्ही मल्याळम सिनेमांचे दर्दी आहात का? मल्याळम सिनेमे म्हणजे प्रॉपर मल्याळमच हा… कारण कसय, काही भिडू तेलगु, तमिळ सिनेमांनाही मल्याळमच म्हणतात. पण तसं नसतं, तेलगुमध्ये जरा जास्तच भडक मसाला असतो. पुष्पा टाईप.. तमिळमध्ये मसाला असतो पण स्टोरी लाईन देखील खास असते. असुरन किंवा 96 सारखा सिनेमा.

पण यापेक्षा वेगळं असतय ते मल्याळम.. मल्याळम सिनेमात स्टोरीलाईन जास्तच भारी असते. सिनेमॅटोग्राफी, साऊंड तिथली संस्कृती आणि साध्या पण बाप वाटणाऱ्या स्टोरीज् असतात. थोडक्यात, तुम्हाला एकदाका मल्याळम सिनेमे पहायचं व्यसन लागलं तर ते सुटू शकत नाही. म्हणूनच आम्ही घेवून आलोय टॉप 10 मल्याळम सिनेमांची यादी. बर ही यादी कुठल्या संस्थेनं, संघटनेनं केलेली नाहीये. तर आम्ही खास मल्याळम सिनेमांच्या दर्दी लोकांना विचारून ही यादी तयार केलीय. त्यामुळं कमेंटबॉक्समध्ये तुम्ही देखील तुमच्या आवडत्या मल्याळम सिनेमांची नावं सांगून यादीत हातभार लावू शकता. 

तर या यादीत पहिला सिनेमा आहे तो म्हणजे, 

महेशइन्टे प्रथिकारम

mahesh

५ फेब्रुवारी २०१६ साली आलेला हा सिनेमा डीरेक्ट केला होता दिलीश पोथान यांनी. फहाद फासिल सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. एक छोटसं गाव आणि या गावात फोटोस्टुडिओ असणारा महेश अर्थात फहाद फासिल. त्याचं प्रेम आणि त्याची बदला घेण्याची गोष्ट म्हणजे हा सिनेमा.

गॅंग ऑफ वासेपूरमध्ये फैजल खानही बदला घेतो. पण तसा बदला आपल्याला घेता येत नाही, आपल्या गोष्टी साध्या असतात. एखाद्याचा बदला देखील किती साधा आणि महत्वाचा असू शकतो हे या सिनेमात दिसतं. हा सिनेमा तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता.

दूसरा सिनेमा आहे प्रेमम

premam

प्रेमम, मलर.. जॉर्ज. याचा कल्ट आपल्या मराठीतही आहे. साई पल्लवी मलर नावानेच ओळखली जाते. हा सिनेमा २०१५ साली आलेला. नवीन पॉली आणि त्याची तीन टप्प्यात घडणारी लव्हस्टोरी.

कॉलेज, दुनियादारी, प्रेम, मित्र या सर्व गोष्टी पहायच्या असतील तर प्रेमम नक्की पाहण्यासारखा सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला हॉटस्टारवर पहायला मिळेल.

तिसरा सिनेमा आहे दृष्यम

drishyam

हिंदीत अजय देवगणचा रिमेक अनेकांनी पाहिला असेल पण दृष्यम वन आणि दृष्यम टू हे दोन्ही सिनेमे मल्याळम मध्येच पाहण्यासारखे आहेत.

मोहनलालची जबदरस्त एक्टिंग, आपल्या कुटूंबासाठी उभं राहणं त्यातून निर्माण झालेला सस्पेन्स. म्हणजे हा सिनेमा. या सिनेमाचं डायरेक्शन केलंय जीथू जोसेफ यांनी आणि या सिनेमाचे दोन्ही भाग तुम्हाला हॉटस्टारवर बघायला मिळतील.

चौथा आहे बँगलोर डेज

banglore

 

एक हिरोईन आणि तीचे दोन मित्र. एक आहे नवीन पॉली आणि दूसरा दूलकर सलमान. दोन्ही भारी हिरो, आणि यात हिरोईनचा नवरा म्हणजे फहाद फासील. आणि आता हिरोईन कोन तर आपली नझरिया नझिम. तशी ही तीन मित्रांची गोष्ट. जे केरळातून बंगलोरला रहायला आलेले असतात. हिरोईनचं लग्न होतं आणि त्यानंतर सिनेमा घडत जातो.

डोकं शांत ठेवून अगदीच भारी एन्जॉय करायचं असेल तर या सिनेमाला नक्कीच वरचा क्रम द्या. हा सिनेमा २०१४ साली रिलीज झालेला, आणि हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

पाचवा आहे टेक ऑफ

take off

 

तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल तर हा सिनेमा पहाच, डिप्रेशनमध्ये जरी नसलात, सगळं छान छान चालू असेल तरी पाहू शकता पण टेन्शन असेल तर हा सिनेमा नक्कीच पाहा. माणसानं कसं उभं रहायचं असतं हे सांगणारी गोष्ट म्हणजे टेक ऑफ सिनेमा.

या सिनेमात मल्याळम इंडस्ट्रीची मिसेस परफेक्शनीस्ट पार्वती आहे. सिनेमा २०१७ साली रिलीज झालेला आणि हा सिनेमा सुद्धा हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

सहावा सिनेमा आहे कुंबलंगी नाईट्स

kumbalang

 

चार भावांची ही गोष्ट. प्रत्येक मल्याळम् सिनेमासारखी अगदी साधी पण तितकीच भारी. चार भावांसोबत घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, एकमेकांबाबत असणारा राग. त्यांची लव्ह स्टोरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं घर.

बाकी या सिनेमातला व्हिलन काय ताकदीचा आहे हे सिनेमा पाहतानाच कळेल कारण आत्ताच सांगितलं तर तो स्पॉईलर ठरेल. हा सिनेमा तुम्हाला ॲमेझॉन प्राईम आणि अॅपल टीव्हीवर पाहता येईल. 

सातवा सिनेमा आहे अंगमली डायरीज

diaries

अंगमली म्हणजे केरळातलं एक छोटसं गांव. आणि या गावातल्या तरूणांवर आधारित ही सिनेमाची स्टोरी. सहा यंग डॅशिंग तरुणांची गॅंग एका बिझनेसमध्ये उतरते आणि मग त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं हे सिनेमातच पहा. या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमात तुम्हाला बरेच नवीन चेहरे पाहायला मिळतील. पण ॲक्टिंग क्षेत्रात नवीन असलेल्या या कार्यकर्त्यांनी बाप काम केलंय एवढं नक्की.

३ मार्च २०१७ साली आलेल्या या सिनेमाचे डीरेक्टर आहेत लिजो जोस पेलीसेरी. आणि हा सिनेमा तुम्हाला नेटफ्लिक्स पाहता येईल.

आठवा आहे हलाल लव्ह स्टोरी

love

तसं, सिनेमाचं मेकिंग दाखवणारा सिनेमा या विषयावर अनेक सिनेमे आले. पण तितकं भारी कोणाल जमलं नाही. हलाल लव्ह स्टोरीमध्ये मात्र हे परफेक्ट जमलय. या सिनेमातले कार्यकर्ते मुस्लीम कायद्यानुसार लव्हस्टोरी असणारा सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न करत असतात.

या सिनेमात सोबिन साहीर आहे, त्यानं तर मस्तच काम केलय. हा सिनेमा १५ ऑक्टोबर २०२० मध्ये आलाय. आणि हा सिनेमा तुम्ही पाहू शकताय ॲमेझॉन प्राईमवर.  

नववा सिनेमा आहे उस्ताद हॉटेल

ustad

हा सिनेमा जेवण करून बघायचा. रिकाम्या पोटी सिनेमा बघण्याचं चुकूनही धाडस करू नका. ही विशेष सुचना मी का सांगितली हे तुम्हाला सिनेमा पाहतानाच कळून जाईल. यात सिनेमात आहे आजोबा आणि नातवाचं नातं. उस्ताद हॉटेलची गाणी आणि होणारा शेवट हे सगळंच भारीये. सिनेमात दूलकर सलमान आहे. आजोबांची लव्हस्टोरी तर खासच आहे. विशेष म्हणजे त्यावेळी मागे वाजणारं म्युझिक.

२९ जून २०१२ साली आलेल्या उस्ताद हॉटेलचे डीरेक्टर आहेत अन्वर रशीद आणि आता हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. 

 

दहावा सिनेमा आहे चार्ली

charlie

तुम्हाला भारी सिनेमेटोग्राफी बघायची असेल तर चार्ली बघा, सिनेमातले सीन, सिनेमातली गाणी सगळंच कसं लाजवाब आहे. चार्ली आणि टेस्साची लव्हस्टोरी तुम्हाला सिनेमात पहायला मिळेल. बाकी सिनेमा पाहताना जी गाणी येतील ती भाषेची बंधनं सोडून तूम्ही गुणगुणाल हे नक्की.

हा सिनेमा तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर पहायला मिळेल. 

आणि जाता जाता बोनस म्हणून अकरावा सिनेमा..

हा सिनेमा आहे थोंडीमुथालम द्रिकसाक्षीयम

thondi

दोन प्रेमी पळून जावून लग्न करण्याच्या तयारीत असतात. अशावेळी एक चोर हिरोईनच्या गळ्यातली सोन्याची साखळी चोरतो. पोलीस स्टेशनमध्ये होणारा ड्रामा म्हणजे हा सिनेमा.

हा सिनेमाही पाहण्यासारखाच आहे. तो तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता.

तर हे होते १० अधिक १ असे मल्याळम मधले ११ भारी सिनेमे. जर तुम्ही हे सिनेमे पाहिले नसतील तर बघून घ्या भिडूनो, तसंही विकएंड आहे. नंतर आम्हाला धन्यवाद नक्की म्हणाल.

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Mukesh G Bhoir says

    nice thank most of these are very recent movies
    pkease also give
    1 all time Malayalam hits
    2 recent and all time hits in Tamil, Kannada and Telagu

Leave A Reply

Your email address will not be published.