वकिलीची सनद खोटी होती पण पठ्याची बॉटनीची डिग्री खरीय

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ह्या वाक्प्रचाराचं उत्तम उदाहरण कुठल्याही सो कॉल्ड चंदेरी दुनियेत सापडणं तसं दुर्मिळ असतय. इकडे उलटाच कारभार असतो. लोकांची रहाणी उच्च आणि विचारसरणी फारच साधी असते. असो… पण नियमांसोबत अपवादही येतात तसंच याही नियमाला एक अपवाद आहे.

आणि ह्या अपवादाचं नाव आहे सुपरस्टार मकरंद अनासपुरे.

आपण सगळेच मकरंद अनासपुरे यांचा अभिनय गेली अनेक वर्ष पहात आलोय. टिपिकल मराठवाडी भाषेचा ठसका, विनोदाचं लय भारी टायमिंग, खुंखार अभिनय आणि चेहऱ्यावरचा बावळटपणा ह्या सगळ्या महत्त्वाच्या आणि युनिक क्वालिटीजमुळे, हा सुपरस्टार प्रत्येक भूमिकेचं सोनं करतो. 

आणि त्यांच्या कामाचं वेगळेपण तर इतकं की, त्यांच्या बोलण्यापासून हसण्यापर्यंत, स्क्रीनवर दिसणारं प्रत्येक इमोशन दंगा घालणारं आणि लक्षात राहणारं असतं.

बरं, भूमिका कुठली पण असो. म्हणजे वकिलीची सनद न घेतलेला वकील असो किंवा पोरीची स्वप्न पूर्ण करायला तिला मुंबईला घेऊन जाणारा दवणीय बाप.

तो भूमिकेत घुसतो, शिरतो किंवा काय पण म्हणा पण तो हे सगळं फार सहजतेने करतो आणि म्हणूनच सुपरस्टार ठरतो.

इतकं सहज तर आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पण वावरत नसू जेवढं मकरंद अनासपुरे पडद्यावर वावरतात.

पण त्यांच्या ह्या खुबीमुळे झालंय काय, तर लोक त्यांना बरेचदा खरंच येड्यात काढतात. आजकालच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या भाषेवरून त्यांना, ‘जज’ करून मोकळी होतात.

पण आता लोकांना काय ठाऊक की, पिक्चरमध्ये त्यांची वकिलीची सनद खोटी होती पण खऱ्या आयुष्यात त्यांनी, बॉटनीची खरी खुरी डिग्री घेतलीये.

ऐकून विश्वास बसला नसेल तर एक किस्सा सांगते. किस्सा आहे, हापूस सिनेमातला. 

२०१० साली आलेल्या हापूस ह्या सिनेमाचं डिरेक्शन केलेलं अभिजीत साटम यांनी. सिनेमाची स्टारकास्ट तगडी होती. शिवाजी साटम, मकरंद अनासपूरे, सुबोध भावे, सुलभा देशपांडे, विद्याधर जोशी, मधुरा वेलणकर अशी अभिनय क्षेत्रात पार मुरलेली मंडळी होती.

तर ह्या सिनेमात सुबोध भावे यांनी सायंटिस्टची भूमिका केलीये आणि मकरंद अनासपुरे यांनी दिगंबर काळेची भूमिका साकारलीये. सिनेमातल्या एका सीनसाठी, आर्ट डायरेक्टर सायंटिस्टची रूम सेट करत होते.

आता साधारण शाळेत, आपली सायन्स लॅब रूम जशी दिसते, तशीच काहीशी ही दिसत असणार. म्हणजे लहान मोठ्या तोंडाच्या काचेच्या नळकांडया, त्यात वेगवेगळ्या रंगाचं पाणी, मोठा फळा, त्यावर विद्यानाची भाषा वगेरे वगेरे. 

सेटअप तयार होत होता आणि अनासपुरे सगळं ऑब्जर्व करत होते. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की पिक्चर आंब्याचा आहे, सुबोध सायंटिस्ट आहे, म्हणजे आंब्याचं सायंटिफिक नाव तिथे आलं पाहिजे. 

त्यांनी आर्ट डायरेक्टरला म्हटलं, की त्या आंब्याचं Mangifera indica (MI) असं एक बॉटनिकल नाव आहे. ते आपण फ्रेममध्ये दाखवू शकतो.

हे ऐकल्यावर सुबोध भावे यांना आश्चर्याचा धक्काच बसला, त्यांनी कुतुहलाने अनासपुरेंना विचारलं, की आंब्याचं बॉटनिकल नाव तुला माहीत असण्याचं काय कारण?

तेव्हा मकरंद अनासपुरे सुबोध भावेंना म्हणाले, की मी बॉटनी घेऊन बीएससी झालोय. 

मकरंद अनासपुरेंनी हे सांगेपर्यंत त्यांचं शिक्षण एवढं झालं असल्याची कोणाला साधी कल्पनाही नव्हती इनफॅक्ट, एका मुलाखतीत मकरंद अनासपुरे सांगतात, की त्यांच्या शिक्षणाबद्दल आधी इंडस्ट्रीत फार कोणाला महितच नव्हतं. आणि त्यांनीही कधी ह्या गोष्टीचा गाजावाजा केला नाही, आवर्जून जाऊन कोणाला सांगितलं नाही किंवा कधीच कुठे आपल्या झालेल्या शिक्षणाविषयी वाच्यताही केली नाही. 

बरं इंडस्ट्रीत अशी बरीच उदाहरणं आहेत, जे कलाकार खूप शिकले सवरलेले असूनही अभिनयाचं क्षेत्र निवडतात, पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवतात आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे मकरंद अनासपूरे. 

मकरंद अनासपुरे आपल्या शिक्षणाच्या जोरावर मुंबईत येऊन सहज एखादी नोकरी मिळवू शकले असते पण त्यांनी तसं न करता आपल्या आयुष्यातली तब्बल १२ वर्ष स्ट्रगल करण्यात घालवली.

सुपरस्टार बनायला तुमचं रंग, रूप आणि भाषा नाही तर तुमचा अभिनय, तुमची स्वत:ची अभिनयातली शैली आणि मेहनत करण्याची तयारी गरजेची असते हे मकरंद अनासपुरे यांनी दाखवून दिलं. 

तात्पर्य काय तर, ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं..’ त्यामुळे गड्यांनो बोली भाषेवरून आणि लोकांच्या राहणीमानावरून त्यांची मापं काढणं आता तरी सोडा. तुमचे विचार उच्च ठेवा, आयुष्यात लय पुढे जाल, फिक्स.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.