स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख आभार मानण्यासाठी मातोश्रीवर आले.

सालं होतं. 2007. केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तर डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.  राष्ट्रपती डाॅ. ए,पी. जे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला होता. राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक होणार होती. भाजप आणि एनडीए पक्षाकडून पुन्हा एकदा डाँ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू होती.

मात्र काही कारणास्तव अब्दुल कलामाचं नाव मागं पडलं आणि एनडीए पक्षाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचं नाव आघाडीवर घेतलं.

इकडं काँग्रेस आणि युपीएमध्ये राष्ट्रपती पदासाठी नावाची चाचपणी सुरू होती.

काँग्रेसने गृहमंत्री शिवराज पाटील, जेष्ठ निष्ठावंत काँग्रेस नेते डॉ. करण सिंह याची नावे विचारात घेतली. मात्र या नावावरून युपीएमध्ये सहमती झाली नाही. या नेत्यांच्या नावाला डाव्या पक्षांनी विरोध केला.

त्यानंतर सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी डाव्या नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी बोलवलं. डाव्यांनी मोतीलाल व्होरा आणि अर्जुन सिंग यांची नावं सुचवली. मात्र तब्येतीची कारणं देत काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला. जर पुरूष उमेदवारावर एकमत होत नसेल तर महिला उमेदवाराचं नाव विचारात घ्यावं, असा सल्ला या बैठकीत भाकपचे डी. राजा यांनी दिला.

प्रतिभाताई पाटील त्या वेळी राजस्थानच्या राज्यपाल होत्या.

गांधी घराण्यांच्या निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती. चारवेळा त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. राज्याच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी विविध विभागाच्या मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.

1985 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. राज्यसभेच्या उपसभापतीपदाची महत्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. 2004पासून त्या राजस्थानच्या राज्यपालपदी होत्या. 

पक्षासाठीच त्यांचं योगदान संसदीय कामाचा अनुभव यामुळे काँग्रेसने राष्ट्रपती पदासाठी प्रतिभाताई पाटील याचं नाव निश्चित केलं. युपीएच्या घटकपक्षांनी आणि डाव्यांनीही या नावाला पाठिंबा दिला.

14 जून 2007 रोजी युपीएच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभाताईंचं नाव निश्चित करण्यात आलं. तर एनडीएने उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांची उमेदवारी जाहीर केली.

त्यावेळेस शिवसेना हा भाजपप्रणीत एनडीएचा घटकपक्ष होता. त्यांचा पाठींबा कोणाला असेल याबद्दल उत्सुकता होती.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपच्या भैरोसिंह शेखावत यांच्या ऐवजी प्रतिभाताईंना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले,

“जर मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर विराजमान होत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे आमचा पाठिंबा प्रतिभाताईंना असेल.”

बाळासाहेबांच्या या निर्णयानंतर भाजपचे अनेक दिग्गज नेते बाळासाहेब ठाकरेंना भेटले. अडवाणींच्या पासून गोपीनाथ मुंडेपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आपली भूमिका बदलते की काय याबद्दल चर्चा सुरु होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी एक आक्रीत घडलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. आबा पाटील हे स्वतः बाळासाहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले होते. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन आभार मानल्यामुळे शिवसेना कॉंग्रेसच्या प्रतिभा ताईनांच मतदान करणार यात कोणतीही शंका उरली नाही.

पुढे काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे गुपित उलगडले.

शिवसेनेची मनधरणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे नेते म्हणून विलासराव यांच्याकडेच देण्यात आली होती. स्वतःच्या वैयक्तिक मैत्रीच्या जोरावर विलासरावांनी शिवसेनेला पहिल्यांदाच कॉंग्रेस उमेदवाराला मतदान करायला भाग पाडलं होतं.

1111

शिवाय जेव्हा प्रतिभा ताई पाटील निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या पक्षांच्या पाठींब्यासाठी भेटी घेत होत्या तेव्हा त्यांची शिवसेनाप्रमुखांची भेट घ्यायची इच्छा होती. पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाळासाहेबांची भेट त्यांच्या राहत्या घरी म्हणजे मातोश्रीला जाऊन घ्यावी लागणार होती. कॉंग्रेसच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींना हे योग्य वाटले नाही.

मात्र जर प्रतिभा ताई भेटल्या नाहीत तर शिवसेनाप्रमुखांचा अपमानही झाला असता.

हा सगळा घोळ टाळण्यासाठी विलासराव देशमुख आपल्या उपमुख्यमंत्र्यांना घेऊन शिवसेनाप्रमुखांच्या घरी गेले आणि त्यांचे व्यक्तीशः आभार मानले. विलासराव नसते तर शिवसेनेने कॉंग्रेसला मतदान केलेच नसते.

19 जुलै 2007 रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं.  प्रतिभाताईंना 6 लाख मते मिळाली तर भाजपच्या भैरोसिंह शेखावत यांना 3 लाख मते मिळाली. प्रतिभाताई पाटील यांच्या रुपात पहिली मराठी महिला देशाची राष्ट्रपती बनली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.