याच काळात मागच्या वर्षी आपण ऑक्सिजन बेडसाठी भांडत होतो, यावर्षी भोंग्यावरून भांडतोय..
२ एप्रिल ते २१ एप्रिल. तारीख जरा नीटच बघा. हा तोच काळ आहे ज्यात देशाचं वातावरण पूर्णपणे धार्मिक आणि जातीय राजकारणानेच भरलेलं दिसतंय. सगळीकडे तेच मुद्दे आणि त्यावरचेच दंगे सुरु आहेत. मात्र याच काळात जरा मागे वळून बघा. जास्त दूर नाही हो..
मागच्या वर्षी, २०२१ ला.
काय आठवतंय?
सगळं असं आठवत नाही, मात्र दुसरं लॉकडाऊन होतं… असं म्हणताय का?
मग जरा थांबा… इतकंच नव्हतं. आम्ही सांगतो नक्की कसं होतं.
२ एप्रिल २०२१. अनेक वृत्तपत्रांची पहिल्या पानाची बातमी होती –
पुणे जिल्ह्यात परिस्थिती जास्त गंभीर असल्याने रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत होतं. देशभरात आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी, असं आवाहन सरकार करत होतं.
लॉकडाऊन नकोची मागणी सामान्य करत होते. मास्क, होम क्वारंटाईन बंधनकारक झालं होतं.
३ एप्रिल २०२१
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. कोरोनाची दुसरी लाट सक्रिय होतेय. जर परिस्थिती अशीच राहिली तर ते लॉकडाऊन करण्यास नकार देऊ शकत नाहीत. लवकरच निर्णय जाहीर केला जाईल…
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र असल्याने देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. मुंबई कोरोनाच्या रुग्णशय्येवर होती. पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्येही बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती.
देशभरात रुग्णांची संख्या ८१ हजार पार गेली होती. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड मिळत नव्हते. सगळेच राज्य केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी करत होते.
५ एप्रिल २०२१.
स्थिती विदारक बनत चालली होती. ब्राझील, अमेरिका, फ्रान्सनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. कठोर निर्बंधांसहित विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन झालं होतं.
जायच्या यायच्या सुविधा ठप्प झाल्या होत्या. पहिली ते आठवी परीक्षा रद्द झाल्या होत्या. जगातील सर्वात जास्त रुग्ण भारतात होते. देशात ४.५ % लोकांना दुसऱ्यांदा कोरोना झाला होता. दिल्लीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता.
१५ एप्रिल २०२१.
या दिवसापर्यंत काय काय झालं होतं?
देशात ऑक्सिजन सहित रेमडीसीव्हरचा तुटवडा झाला होता. त्याचे पैसे वाढवले होते. महाराष्ट्रात हॉस्पिटल कमी पडत होते. ॲम्ब्युलन्स चालकांनी दर वाढवले होते. रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान बनलं होतं.
विशेषतः महाराष्ट्रात, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती.
पुण्याच्या ससून रुग्णालयात बेड मिळत नव्हते. एका बेडवर ३ रुग्ण झोपत होते. एकाच सिस्टीममधून तीन जणांना ऑक्सिजन पुरवला जात होता. हॉस्पिटलच्या फरशीवर आणि बाहेर पायऱ्यांवर रुग्ण विना ट्रीटमेंट पडून होते.
मालेगावात फक्त एक दिवस पुरेल इतकं ऑक्सिजन होतं. रोज किमान २०० सिलेंडर हवे होते. लोक सिलेंडर असं सोबत घेऊन फिरत होते जणू सोनं आहे. ज्यांना सिलेंडर मिळालं होतं त्यांना दुसरे मागत जीव सोडत होते.
मात्र निर्दयी बनून सर्व जण आपल्याकडील सिलेंडर देत नव्हते, देऊ शकत नव्हते.
१९ एप्रिल २०२१.
दिवसाला ९५० ते १००० टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात होता. मुख्यमंत्र्यांनी हवाई मार्गे केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. मात्र ते शक्य होत नव्हतं.
एकाच सरणावर ८-८ अग्निडाग दिले जात होते.
फोन आला की जीव धास्तावत होता. वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने गोंदियाच्या सरकारी रुग्णालयात एका दिवसात १५ जण मेले होते.
वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारं यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करा. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोवीड सेंटर्स सुरू आहे त्यांना ही प्रणाली बसवणं बंधनकारक करण्यात यां, अशा ठोस सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.
२४ तासांत मुख्यमंत्र्यानी ३ वेळा मोदींना फोन केला होता. छत्तीसगढ, तेलंगण, कर्नाटक, ओडिसा या राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ऑक्सिजन रेल्वे मार्फत सगळ्या राज्यांना पुरवठा सुरु झाला होता, मात्र तरीही महाराष्ट्राला मिळण्यासाठी ५ दिवस होते.
२१ एप्रिल २०२१.
लातूरमध्ये ऑक्सिजन आणि बेड तुटवड्यामुळे आणीबाणी झाली होती. डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर आले होते. पुण्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड अभावी मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. घाटकोपरमध्ये ६१ जणांचे जीव टांगले गेले होते. तेवढ्यात आली राज्य हादरवून सोडणारी घटना…
नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार समोर आला. या घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे ऑक्सिजन टँकर थांबले जात होते. काळाबाजार करण्यावर सामान्य माणूस देखील उतरू झाला होता. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले होते, राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायला तयार आहे, फक्त ऑक्सिजन पुरवठा करा.
तर राजधानी दिल्लीतून आवाज येत होता…
‘औषधं आणि बेड देऊ शकत नसाल, तर निदान मरायला तरी थोडी जागा द्या’
दिल्लीच्या काही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. शांती मुकंद हॉस्पिटलमध्ये तर काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याने चक्क हॉस्पिटलच्या सीईओंना रडू कोसळलं होतं.
#WATCH | Sunil Saggar, CEO, Shanti Mukand Hospital, Delhi breaks down as he speaks about Oxygen crisis at hospital. Says "…We're hardly left with any oxygen. We've requested doctors to discharge patients, whoever can be discharged…It (Oxygen) may last for 2 hrs or something." pic.twitter.com/U7IDvW4tMG
— ANI (@ANI) April 22, 2021
देशासमोर तेव्हा सगळ्यात मोठं संकट होतं ते कोरोना आणि ऑक्सिजन तुटवडा. जीवन मरणाचा प्रश्न होता. सरकारवर सामान्यांनकडून फक्त ‘श्वासाची’ मागणी होती. आम्हाला जगायचंय हे म्हणणं होते. आजचा दिवस सगळे जण काढत होते कारण…
उद्याचं कुणी बघितलं होतं? काही दिसतंच नव्हतं…
सगळा काळोख होता…
प्रत्येक जण यातून बाहेर येण्याची वाट बघत होता. आणि तो क्षण आलाच. आता मास्क, क्वारंटाईन अशातून आलो आपण सगळे बाहेर. मात्र त्याकाळात केलेले काही वक्तव्य कदाचित स्वतःच विसरलोय.
“वाचलो तर एक चांगला व्यक्ती घडू” असं अनेक जण म्हणत होते. त्याला किती जण जागलेत? ते आता बघूया..
२ एप्रिल ते २१ एप्रिल २०२२ ची स्थिती
हलाल मटण प्रकरण
देशात तसं हिजाब प्रकरणावरून वातावरण दूषित होण्याची ठिणगी पडलीच होती. त्यात भर पडली हलाल मटण प्रकरणाची. ज्या कर्नाटकात हिजाबचं प्रकरण झालं त्याच कर्नाटकात आता हिंदुत्ववादी संघटनांनी ‘मुस्लिम विकत असलेल्या हलाल मटणावर बहिष्कार टाका’ असा फर्मान काढला.
हलाल मटणाचा वादग्रस्त विषय खाण्यावरून धार्मिकतेकडे आणि धार्मिकतेकडून राजकीय बनत गेला. कारण असल्या कट्टर मागणीला राज्यातील भाजपच्या मातब्बर नेत्यांनी देखील सपोर्ट करत याची मागणी केली. दिल्ली महानगरपालिका, झोमॅटो आणि कृषी व खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा या वादात ओढलं गेलं होतं.
मग आली रामनवमी.
या दिवशी देशात अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. अनेक राज्यांमध्ये हिंसाचार, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांत धार्मिक आणि जातीय तणाव दिसून आला. या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाल्याच्या बातम्या आल्या.
जेएनयूमध्ये देखील रामनवमीला नॉनव्हेजवरून वाद झाले होते. १० एप्रिलची ही घटना. जेएनयुच्या कॅम्पसमध्ये एबीव्हीपी आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या गटात संघर्ष झाला. एबीव्हीपी आरोप केला की, रामनवमी निमित्त युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पूजेत व्यत्यय आणला.
डाव्या संघटनानी केलेल्या आरोपानुसार, हॉस्टेलच्या मेसमध्ये नॉनव्हेज जेवण तयार केले जात होते. त्याला एबीव्हीपीने विरोध केला होता. या दोन्ही गटात हाणामारी झाली त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. जेएनयूच्या या घटनेचे पडसाद देशभरात दिसले.
बुलडोजर प्रकरण
रामनवमीच्याच दिवशी मध्यप्रदेशमध्ये धार्मिक दंगली उसळल्या आणि घरांवर बुलडोझर चालवण्यात आले. राम नवमीच्या दिवशी मध्यप्रदेशात हिंसाचार उसळला. धार्मिक दंगली उसळल्या. त्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले, ज्या ज्या घरावरून दगड आले ती घरे बुलडोजर लावून पाडण्यात येतील आणि तसंच करण्यात आलं. एकूण ४५ घरं पाडण्यात आली.
मटणाचा वाद थांबलाच नाही त्यात महाराष्ट्रात मशिदीवरच्या ‘भोंग्यांचा’ वाद सुरु झाला…
मनसे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलले. भोंगे काढा नाहीतर मशिदीसमोर मोठ्याने हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला. ‘उत्तर’ सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३ मे रोजी ईदची डेडलाईन दिली.
मशिदीवरच्या अजानवरून प्रत्येक पक्ष स्वतःचा धार्मिक आणि राजकीय अजेंडा चालवताना सध्या दिसतोय.
त्यात भर पडली हनुमान जयंती.
घटना घडली देशाच्या राजधानी दिल्लीत. दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. जहांगीरपुरीमधील बजरंगबलीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर दोन्ही समाजांमध्ये हिंसाचार सुरु झाला.
ही पारंपरिक मिरवणूक होती आणि सुरक्षाव्यवस्थेत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, तरीही परिस्थितीने अचानक पेट घेतला. थांबवण्याच्या प्रयत्नात घटनास्थळी उपस्थित पोलीस जखमी झाले. समाजाच्या दोन घटकांमध्ये कशाप्रकारे सध्या कटुता निर्माण करण्यात आली आहे, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे.
ज्यांच्याशी वैर होतं त्यांनाही ‘एक’ करणारा काळ होता तो कोरोना लॉकडाऊनचा. तर नको नको ते वैर मुद्दामून तयार केला जाणारा सध्याचा काळ आहे.
एकाच तारखांच्या दरम्यानची २ वर्षांची चित्रं तुमच्या समोर मांडली आहेत…
जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न होता तेव्हा आरोग्यावर सरकारने लक्ष द्यावं, असं आपण म्हणत होतो आणि आता सर्व नीट झालं तर परत धर्मावर आलोय…
अहो, जातोय कुठे आपण? हे विचार करण्याची खरंच गरज आहे.
राजकारण्यांच्या फालतू गोष्टींना भुलायचं आहे, की ‘बेरोजगारी’ सारखे वास्तविक प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. स्वतःच्याच शब्दांना जागायची वेळ आहे ही की, उगाच देशाला नव्या अंधारात ढकलण्याची आहे, ज्यातून बाहेर येण्याचा रास्ता देखील नाही.
या फोटोत पोलिसाच्या जागी स्वतःला (देशाच्या नागरिकाला) ठेवून बघा आणि त्या हातातील बाळाच्या ठिकाणी देशाला, त्याच्या भविष्याला… लेखाचा आशय आणि अट्टहास लगेच क्लीअर होईल.
विचार करा, ठरवा आणि पटत असेल तर शेअर करा.
हे ही वाच भिडू :
- हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचं स्वागत मुस्लिमांनी ‘फुलं’ उधळून केलं
- हिंदु-मुस्लीम : गेल्या दोन महिन्यातल्या या घटना देशातलं वातावरण सांगण्यासाठी बास आहेत
- हिंदु-मुस्लीम अन् भोंग्याच्या राड्यात “बेरोजगारीच्या” आकड्यावर नजर मारा, भोंगा वाजेल..!