परदेशातले लोकही ज्यांच्याकडून मोटिव्हेशन घेतात ते गौर गोपालदास आपल्या पुण्याचे आहेत

आपला निकाल लागणार असेल तर घरचं वातावरण कसं असतं, ते आठवा. त्यादिवशी अगदी तसंच वातावरण होतं, घरातील मुलाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरचा निकाल लागणार होता. वेळेत रिझल्ट हाती आला देखील मात्र तो बघून मुलगा जोरजोरात रडायला लागला. तो नापास नव्हता झाला तर त्याला पहिला क्रमांक मिळवता आला नाही, म्हणून तो रडत होता. 

पोरगं लहानपणापासून अत्यंत हुशार, फक्त टॉपवरच राहिलेलं. मात्र आज चित्र बदललं होतं आणि त्यामुळे इतका मनस्ताप आणि रडणं सुरु होतं. आपल्या पोराची अवस्था बघून वडिल त्याच्या जवळ आले आणि समजावून सांगितलं…

“काळानुसार कोणालाही रँक आणि नंबर आठवत नाही. चांगलं काम करत राहा, हेच लोकांना आठवतं.” 

काही वर्ष लोटली… अमेरिकेतील ओहायोतील एका घरात एक व्यक्ती फाशी घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. जवळपास गळ्याभोवती त्याने फास आवळालाच होता की अचानक मोबाइलवर एक व्हॉट्सअॅप मेसेज आला.  त्याच्या काय डोक्यात आलं पण त्याने फास काढला आणि मेसेज चेक केला.

मेसेजमध्ये एका व्यक्तीचा व्हिडिओ होता. तो त्याने बघितला आणि पुढचे १५ तास तो यू ट्यूबवर त्याच व्यक्तीचे व्हिडिओ पाहत बसला. अखेर त्याने मरण्याचा विचार सोडून दिला. इतका मोठा बदल घडवून आणण्याची ताकत त्या व्हिडिओतील व्यक्तीच्या शब्दांमध्ये होती.

वरील दोन्ही प्रसंगांमध्ये ज्यांच्याबद्दल बोललं जातंय ती व्यक्ती म्हणजे…

गौर गोपालदास

सोशल मीडिया वापरत असाल आणि ही व्यक्ती तुमच्या परिचयाची नाही, हे अगदी अशक्यच म्हणावं लगेल. माध्यमांमध्ये नेहमीच त्यांच्या बातम्या आणि स्टोऱ्या लागत असतात. इतकंच काय डिजिटल मीडियावर रिल्सच्या स्वरूपात सर्रास त्यांचे व्हिडीओ शेअर झाल्याचं तुम्ही बघितलं असेल. आणि त्यांचे स्पेशल व्हिडीओ तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी गौर गोपालदास यांचं स्वतःचं युट्युब चॅनेल देखील आहे. 

जवळपास ४.४३ मिलियन त्यांचे स्बस्क्राइबर्स आहेत. तर इंस्टाग्रामवर ५.३ मिलियन फॉलोवर्स आहेत आणि ट्विटरवर १ लाख ३० हजार फॉलोवर्स आहेत. सगळीकडे त्यांच्या व्हिडीओजला मिलियन्समध्येच व्यू आहेत. 

पण त्यांचा वेष जर बघितला तर कुणीही काही मिनिटांसाठी बुचकळ्यात पडेल. हे कसं शक्य आहे? असं म्हणतील. कारण त्यांचा वेष पूर्णतः भिक्षुचा आहे. कपाळावर असणारा लांबलचक गंध साधू असल्याचं भासवतो, आवाज ऐकला तर कुणीतरी सुशिक्षित बिजनेसमॅन वाटतो, बोलतो काय? हे ऐकलं तर कुणीतरी लेखक किंवा मोटिव्हेशनल स्पीकर वाटतो. आणि सत्य सांगायचं तर गौर गोपालदास हे सर्व आहेत. 

गौर गोपालदास यांनी त्यांच्या विचारांनी जगभरातील लोकांचं आयुष्य बदललं आहे. छोट्यातील छोट्या समस्येचं त्यांच्याकडे उत्तर आहे. त्यांच्या संदेशांना समोर ठेवून लोक काम करतायेत आणि आपलं आयुष्य सुधारत आहेत.

मात्र हा तोच व्यक्ती आहे जो परीक्षेत पहिला नंबर आला नाही म्हणून रडत बसला होता. 

म्हणून आज कित्येक लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या गौर गोपालदास यांच्या आयुष्यात कसा बदल झाला? हे बघूया… 

गौर गोपालदास हे मारवाडी जैन कुटुंबातील आहेत. २४ डिसेंबर १९७३ रोजी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. वडिलांचं नाव विलासराय सोनी आणि आई आशा सोनी. पुण्याजवळील देहू रोड इथे त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ह्यूलेट पॅकार्ड (HP) कंपनीत काम केलं.

पण त्यांचं मन काही कामात लागायचं नाही. त्यांना अध्यात्माची ओढ लागलेली होती. त्यांच्या डोक्यात चक्र फिरू लागलं… या जगात पैसा कमावणं सोपं असलं तरी लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणं कठीण आहे. मला मशीनसमोर बसून बदल आणायचा नाहीये तर हे यंत्र आणि प्रणाली चालवणाऱ्या लोकांना बदलायचं आहे, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी लाखोंची नोकरी सोडून दिली.

कंपनीतून बाहेर पडून त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) जॉईन करण्याचं ठरवलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना हा विचार सांगितला तेव्हा त्यांनी साफ नकार दिला. त्यांच्या पालकांसाठी हा मोठा घातच होता. मात्र गोपालदासांनी विचार पक्का केला होता आणि त्यानुसार ते १९९६ मध्ये इस्कॉनमध्ये सामील झाले. 

सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला पण कधी दबाव निर्माण केला नाही. हळूहळू त्यांचं काम आणि त्यांच्यातील बदल बघून घरच्यांनीही काही वर्षांनी त्यांना स्वीकारलं.

अशाप्रकारे गौर गोपालदास भिक्षु झाले. मात्र त्यांनी स्वतःला मॉडर्न भिक्षुमध्ये कन्व्हर्ट केलं. कारण तेच ध्येय घेऊन त्यांनी हा मार्ग निवडला होता… त्यांना लोकांचं आयुष्य बदलायचं होतं, त्यांच्या कामी यायचं होतं.

अध्यात्मिक विचारांनी त्यांनी जोड दिली विज्ञानाची. इंजनिअर असल्यामुळे तंत्रज्ञान त्यांना चांगलं अवगत होतं.

गौर गोपालदास यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत जनतेपर्यंत पोहोचणं सुरु केलं आणि त्याचं काय झालं आज आपण पाहतंच आहोत. ते लोकांना मोटिव्हेट करतात. गीतेचा अर्थ समजावून सांगताना वैज्ञानिक दृष्टिकोन देखील लोकांना देतात. आपली भाषणं अधिक समजण्यासारखी व्हावी म्हणून त्यात थोडासा विनोद वापरतात, गोष्टी सांगतात. 

शांत, हसतमुख अशा गौर गोपालदासांची सांगण्याची पद्धतंच माणसाला त्यांचा व्हिडीओ पूर्ण बघण्यासाठी प्रवृत्त करतो. जगात सगळ्यात अवघड काम असतं – ‘सोपं करून सांगणं’ हेच नेमकं त्यांना जमलं आहे. 

त्यांनी आजवर जगभरात अनेक चर्चासत्रं घेतली आहेत, लोकांनी त्यांना स्वतः बोलावून घेतलं आहे. इतकंच काय ब्रिटिश संसदेनेही त्यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. अनेक सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट लीडर्सही त्यांचं मार्गदर्शन घेतात. मॅकइनटॉश, फोर्ड, बँक ऑफ अमेरिका, इन्फोसिस, बार्कलेज, मायक्रोसॉफ्ट अशा जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना ते मार्गदर्शन करतात.

TEDx सारख्या कार्यक्रमांत त्यांना बोलावण्यात आलं आहे. बिअर बायसेप्स, निलेश मिश्रा अशा अनेक इन्फल्युएंझर्सने त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी ‘एबीपी माझा कट्टा’ या कार्यक्रमाला देखील उपस्थिती लावली होती.

अध्यात्म आणि मोटिव्हेशन याचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या गौर गोपालदास यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २०१६ मध्ये रोटरी इंटरनॅशनलचा सुपर अचिव्हर पुरस्कार देण्यात आला होता.

आयुष्य सोपं करण्याचे आणि सकारात्मक जगण्याचे अनेक सिद्धांत त्यांनी मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी ‘लाइफ्ज अमेझिंग सिक्रेट्स : हाऊ टू फाइंडिंग बॅलन्स अँड पर्पज इन युवर लाइफ’ या नावाने एक पुस्तकही लिहिलं आहे. हिंदीतही ते उपलब्ध आहे. 

कित्येकांचं आयुष्य बदलणारे गौर गोपालदास म्हणतात…

“बदल घडवून आणण्यासाठी क्रांतीची गरज नाही… चांगलं काम करणारा व्यक्ती देखील हळूहळू का होईना, वेळ लागला तरी  परिवर्तन घडवून अनु शकतो”

गौर गोपलदासांना ते इंजिनिअरिंगमध्ये टॉप न आल्याने त्यांच्या वडिलांनी जो संदेश दिला होता तो आज किती प्रभावी ठरला आहे, हे सगळं जग बघतंय. संदेश देताना त्यांच्या वडिलांना देखील माहित नव्हतं, आपलं हे एक वाक्य आपल्या मुलाच्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवणार आहे की तो पुढे जाऊन कित्यकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणार आहे!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.