प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदूत्वाला समर्थन देण्यामागे ही कारणे आहेत

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकला चलो रे ची भूमिका स्वीकारू शकतात. शिवसेनेचं हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही. त्यामुळे ते हिंदूत्व आम्हाला मान्य आहे अस वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केल्याची बातमी आली.

प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना समर्थन करण्याची ही पहिली वेळ नाही. कॉंग्रेस व सेनेसोबत जाण्याची भूमिका त्यांनी अनेकदा घेतलेली आहे. मात्र राष्ट्रवादीबाबतची त्यांची भूमिका विरोधाची राहिलेली आहे.

पण मुद्दा येतो तो शिवसेनेसोबत जात असताना सेनेच्या हिंदूत्ववादी भूमिकेचा. कधीकाळी नामांतर चळवळीला विरोध करणारे बाळासाहेब ठाकरेंच हिंदूत्व प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे का असा प्रश्न पडतो. प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ठाकरे आणि आंबेडकर कुटूंबाचे तीन पिढ्यांपासून संबंध आहेत हे स्पष्ट केले आहे.

सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार यांच्या नात्याचे संदर्भ दिले आहेत. शिवसेनेने कधीही मनुस्मृतीचे समर्थन केले नाही म्हणून सेनेचे हिंदूत्व मान्य आहे असा रोख प्रकाश आंबेडकरांचा असलेला दिसून येतो.

वास्तविक उद्धव ठाकरेंच हिंदूत्व आत्ता प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदूत्वासोबत जात असल्याचं दिसून येतं. ते समजून घेण्यासाठी प्रबोधनकारांच हिंदुत्व समजून घ्यावं लागतं..

प्रबोधनकार ठाकरेंचं बहुजनवादी हिंदुत्व. 

गेल्या काही वर्षांपासून म्हणजे २०१४ नंतर भाजपाशी बिनसायला सुरवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांपासून भाजपशी असलेल्या युतीचा पुनर्विचार करण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांना नवीन मित्रपक्ष शोधण्याबरोबरच त्यांची विचारधारा देखील भाजपापेक्षा वेगळी असल्याचं दाखवणं आवश्यक होतं. मात्र भाजप आणि शिवसेना हे इतके दिवस हिंदुत्वाच्या विचारधारेच्या आधारावर नैसर्गिक युतीच्या नावाखाली एकत्र होते.

अशावेळी भाजपापासून दूर जाताना सेनेला त्यांचं हिंदुत्व देखील वेगळं आहेव असं दाखवण्याची गरज निर्माण झाली असं जाणकार सांगतात.

आणि हे परिस्तिथी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनच हिंदुत्व म्हणजेच प्रबोधकरांचं बहुजनवादी हिंदुत्वाची अशी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवल्याचे बोललं जातंय आणि ह्याच स्कीममध्ये परफेक्ट बसतात सुषमा अंधारे.

महाप्रबोधन यात्रा आणि सुषमा अंधारे यांचं महाप्रबोधन यात्रेत प्रकर्षाने पुढं येणं. ही स्कीम अजून डिटेलमध्ये समजवून घेण्यासाठी आधी आपल्याला  प्रबोधनकारांच हिंदूत्व, बाळासाहेबांच हिंदूत्व आणि उद्धव ठाकरे यांच हिंदूत्व यामधील बेसिक फरक समजून घ्यायला पाहिजे.

तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते.

ते गजाननराव वैद्य यांच्या ‘हिंदू मिशनरी सोसायटी’चे ते एक प्रमुख नेते होते. मात्र ते ब्राह्मण्यवादाच्या बहुजनांवरील सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधात देखील होते. ब्राह्मणेतर चळवळीच्या विचारांचाही त्यांच्यावर मोठा पगडा होता. “आजचा धर्म हा हिंदूधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे’ अशा शब्दात हिंदू धर्माची त्यांनी चिकित्सा केली होती.

बहुजनांनी ब्राह्मण्यवादाच्या विरोधात उभा राहवं हा देखील प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा एक महत्वाचा भाग होता.

थोडक्यात हिंदुत्वाच्या नावाने बहुजनांचं शोषण करणाऱ्या ब्राम्हणी पुरोहितशाहीच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे होते. विशेषतः हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनांच्या वळचणीला कधीही न जात प्रबोधनकार या संघटनांचे टीकाकारच राहिले.

बाळासाहेबांच्या हिंदूत्वाबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी देखील हीच लाइन पुढे करत जरी भाजपशी युती केली असली तरी त्यांची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व मात्र त्यांनी कधी मान्य केलं नाही. आज भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर आमचं शेंडी जाणव्याचं हिंदूत्व नाही असं जे उद्धव ठाकरे म्हणत आहेत ही ओरिजनल लाइन बाळासाहेब ठाकरेंची होती आणि याच विचारात त्यांनी आपल्या कार्यकाळात संघाच्या हिंदुत्वाला त्यांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वावर वरचढ होऊ दिलं नव्हतं.  

पण इथे प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या कामात एक महत्वाचा फरक होता तो म्हणजे प्रबोधनकार हे सामाजिक क्षेत्रात काम करत होते तर बाळासाहेब ठाकरे यांना एक राजकीय संघटना चालवायची होती. 

त्यामुळे मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववाद हे प्रबोधनकरांची राजकारणात फायद्याची ठरू शकणारी तत्त्व बाळासाहेब ठाकरे यांनी सहजपणे उचलली. मात्र राजकीयदृष्ट्या त्यांचा बहुजनवाद मात्र बाळसाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणला नाही. राजकारणात म्हणण्यापेक्षा भाषणात आणला नाही असं म्हणणं योग्य ठरेल कारण सत्ता मराठा समाजाच्या हातात एकवटलेली असताना बाळासाहेबांनी अनेकदा मराठेतर बहुजन समाजातून आलेले नेते शिवसेनेच्या माध्यमातून उभे केले.

त्याचवेळी अनेकदा बाळासाहेबांनी दलितविरोधी भूमिका घेतल्यांचा त्यांच्यावर आरोप झाला. मग ते वरळीतली दंगलीतील सवर्णांच्या बाजूने भाग घेतल्याचा आरोप असू दे की सेनेने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध असू दे.  त्यातच बाळासाहेबांनी स्विकारलेलं हिंदुत्व अतिशय आक्रमक देखील होतं. १९८५ च्या निवडणुकीत गर्व से कहो हम हिंदू है चा नारा देत बाळासाहेबांनी कट्टर हिंदुत्वाच्या दिशेनं प्रवास चालू केला होता.

बाळासाहेबांच्या या स्टॅंडमुळे त्यांनी प्रबोधनकरांचा सुधारणावादी आणि पुरोगामी वारसा सोडल्याचा आरोपही झाला.

विशेषतः १९९०च्या दशकात राम मंदिराचा मुद्दा फॉर्मात येत असताना बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व अजूनच कट्टर आणि आक्रमक होत गेलं. या काळात त्यांनी अल्पसंख्यकांच्या विरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती.’आम्हाला नथुराम गोडसेचा अभिमान आहे, बाबरी मस्जिद शिवसैनिकांनीच पाडली ही बाळासाहेबांची वक्तव्य याच काळातील होती. पण त्या नंतरच्या काळात जस जशी भाजप देशातला एक प्रमुख पक्ष म्हणून उदयास येऊ लागली तस तसं भाजपचं हिंदुत्व सेनेच्या हिंदुत्वावर वरचढ ठरू लागलं.

कधीकाळी महाराष्ट्रात जनता दलाशी युती आणि वाजपेयींच्या गांधीयन सोशलीजम ही प्रमुख विचारधारा असणाऱ्या भाजपने सेनेमुळे आक्रमक हिंदुत्वाची लाइन धरली होती.

मात्र युतीत भाजप मोठा भाऊ झाल्यानंतर सेनेच्या हिंदुत्वावर संघाच्या हिंदुत्वाचा प्रभाव वाढला होता. बाळासाहेब ठाकरेंनी संघाच्या आणि इतर हिंदुत्ववादी विचारांच्या माणसांना शिवसेनेपासून दूर ठेवलं होतं. मात्र नंतरच्या काळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत शिवसेनेचं चिंतन शिबीर झालं, भिडे गुरुजी अनेकदा शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिसले. त्यामुळे सेनेला आता भाजपपासून आपल्या वेगळ्या हिंदुत्वाची ओळख जपण्याची गरज निर्माण झाली होती. आणि हि जबाबदारी आता आली होती उद्धव ठाकरे यांच्यावर. 

२०१३ मध्ये बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा झालेला प्रयोग याची सुरवात होती असं जाणकारांचं मत होतं.

बाळासाहेबांच्या शेवटच्या वर्षात झालेला हा प्रयोग त्यांच्या संमतीने असाल तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मवाळ आणि सुधारणावादी रूप देत त्यांच्या हिंदुत्वाला भाजपच्या हिंदुत्वापासून वेगळे ठेवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा एका पत्रकाराने त्यांना सेनेनं हिंदुत्व सोडल्याच्या आरोपाबद्दलचा प्रश्न विचारला.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले हिंदूत्व म्हणजे काय? जे राज्यघटनेने दिले आहे तेच ना ? मग हे सरकार राज्यघटनेनेच चालेल…..

उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सेनेच्या हिंदुत्वात झालेला महत्वाचा बदल म्हणजे मुस्लिमांवर सरसकट टीका या काळात सेनेकडून झाली नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर देशभर कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असताना उद्धव ठाकरे सर्वसमावेशक हिंदुत्वाची भाषा बोलू लागले होते. बाळासाहेबांची आमचं शेंडी जाणव्याचं हिंदूत्व नाही ही लाइन रिपीट करून मुखात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व असल्याची व्याख्या उद्धव ठाकरेंनी केली होती.

करोना काळात मंदिर बंद ठेवण्यावरून झालेली टीका असू दे किंवा मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न असू दे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टोकाची भूमिका घेतली नाही.

प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांच्या हिंदुत्वाना जोडणारा दुवा कोणता आहे याबद्दल माहिती घेण्यासाठी बोल भिडूने पत्रकार सचिन परब यांच्याशी चर्चा केली. सचिन परब सांगतात कि,” ठाकरे घराण्याचं राजकारण हे नेहमी प्रस्थापितांच्या विरोधातील राहिलं आहे आणि त्यामुळे तिघांच्याही भूमिकेतील जो फरक आहे तो तत्कालीन राजकीय परिस्थितीला धरून झाला आहे.

त्यामुळे तिघांनीही एकमेकांची विचारधारा काळानुरूप बदल करून स्वीकारली: असं मत परब यांनी व्यक्त केलं….उद्धव ठाकरे यांच्या ‘सॉफ्ट’ हिंदुत्वामागे राजकीय गणित असल्याचंही काही जाणकार सांगतात.

एक बाजूला भाजपाने हार्डकोअर हिंदूत्व स्वीकारल्याचा आरोप होत आहे तर दुसऱ्या बाजूला सततच्या आरोपांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मुस्लीम धार्जिणे असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे.

मात्र या दोघांच्यामध्ये जी ‘लिबरल’ हिंदू वोटेबँक आहे तिला आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मवाळ भूमिका असू शकते असं बोललं जातंय. यासाठी दसरा मेळाव्यातील भाषणाचं एक उदाहरण घेता येइल.

गुजरात दंग्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर याबद्दल मत-मतांतर असतील मात्र बिल्किस बानो बलात्कारच्या आरोपींना जेलमधून सोडून देउन त्यांचा सत्कार केला गेला यावर बहुसंख्य हिंदू सहमत नव्हते आणि उद्धव ठाकरेंनी नेमका हाच मुद्दा पकडत दसरा मेळव्याचा भाषणात हा मुद्दा उपस्थित केला होता.

मधल्या काळात आधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपाचा हिंदुत्व यामुळे दूर गेलेला दलित आणि बहुजन मतदारसुद्धा सेनेला पुन्हा मिळवायचा आहे त्यातूनच सुषमा अंधारेंकडे महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आत्ता प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे हिंदूत्व मान्य होण्याचं कारण देखील हेच आहे..

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.