कॉम्रेड कृष्णा देसाई हत्या प्रकरण ज्याचा आरोप थेट बाळासाहेब ठाकरेंवर झाला होता

रात्र होती ५ जून १९७० ची. मुंबईचा लालबाग परिसर. तावरी पाड्याच्या एका मिलमध्ये बसून एक नेता आपल्या कामगारांच्या सहलीचं आयोजन करत होता. त्यांचं नेहमीच बसायचं ठिकाण किंवा अड्डा असणाऱ्या मिलमध्ये आपल्या कामगार मित्रांसह बसून ते चर्चा करत होते, इतक्यात काही माणसं आत आली आणि त्यांना बाहेर बोलवलंय असं सांगितलं. बाहेर वीज नव्हती त्यामुळे होता तो मिट्ट काळोख. 

काही क्षणांचा अवधीही गेला नाही आणि त्या माणसावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर गुप्तीने घाव घालण्यात आले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत तो पुढे चालला पण काही पावलं चालत गेल्यावर तो जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांची झालेली अमानुष हत्या फक्त कामगारांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकणारी एक घटना होती.

कोण होतं हे व्यक्तिमत्त्व? हे होते कामगार चळवळीचे नेते आणि परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई.

या घटनेचे पडसाद एवढे उमटले त्यांच्या खुनाचा आरोप थेट बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा झाला. ज्यांच्या खुनाचा थेट बाळासाहेबांवर आरोप झाला असे कृष्णा देसाई कोण होते?कॉ. कृष्णा देसाई हे कामगार चळवळीतलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा जन्म संगमेशवर तालुक्यतल्या कुणगुस या गावात झाला. 

नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुळातच त्यांना राजकारणात रस होता. १९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. १९४५ साली आजाद हिंद सेनेतील सुभेदार शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर लालबागच्या तावरी पाड्यात भूमिगत असलेल्या तरुणांना लष्करी प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. 

त्यांनी क्रांतिकारी समाजवादी पक्षात काम करायला सुरुवात केली. तो काळच होता कामगार चळवळींचा. त्यांचे पक्षात काही मतभेद झाले आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे आणि गिरणी कामगार युनियनचं काम बघायला सुरुवात केली. 

कॉ. कृष्णा देसाई जेलमध्ये असताना त्यांना नागरिकांनी महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं.

 तसंच यांना यावेळीही गिरणी कामगारांनी एकदा नगरसेक आणि १९६७ साली विधानसभेचे आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभाग होता. यावेळी ते अनेकदा जखमी झाले, त्यांना मारहाण करण्यात आली पण ते कधीच खचले नाहीत. 

या सगळ्या प्रकरणात शिवसेनेचं नाव वारंवार घेतलं गेलं. साहजिक होतं कारण शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांचं कधी सख्य नव्हतं. थोडं मागे जाऊया. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाला तेव्हा तरी उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटलं जायचं. बाळासाहेबांच्या जन्माआधीच प्रबोधनकार ठाकरेंनी मराठी माणूस, भूमिपुत्रांचे हक्क याबद्दलचे मुद्दे हाती घेतले.

बाळासाहेबांकडे वडिलांकडून आपसूकच जशा चित्रकला, पत्रकारिता आणि वक्तृत्व हे संस्कार आले तसेच मराठी बाणा आणि हिंदुत्व हे मुद्दे सुद्धा आले होते.

१९६० मध्ये म्हणजे शिवसेना स्थापन व्हायच्या सहा वर्ष आधी मार्मिक नावाचं साप्ताहिक ठाकरेंनी आपले बंधू श्रीकांत ठाकरे यांच्यासह सुरु केलं. यामध्ये पहिल्याच वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना निशाणा बनवत त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. ‘प्रजासमाजवादी पक्षाचा व्यभिचार’ अशा नावाचा लेख मार्मिकमध्ये प्रसिद्ध झाला ज्यात एस एम जोशींपासून अन्य नेत्यांवरही टीका झाली. 

एकीकडे कॉ. कृष्णा देसाई हे क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होते. 

शिवसेनेने नेहमीच त्यांच्या पक्षाला ‘गुंडगिरी’ च्या नावाखाली बोल लावले होते. तसं पाहिलं तर शिवसेना आणि कम्युनिस्ट दोन्ही आक्रमक पक्ष होते. कम्युनिस्ट हा तेव्हा कामगार आणि कष्टकरी यांच्या हक्कांसाठी लढायचा. कृष्णा देसाई गिरणी कामगार युनियनचे उपाध्यक्ष असताना कम्युनिस्टांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबईत संप, आंदोलनं करत कामगारांना योग्य वेतन, महागाई भत्ता, कामाचे आठ तास, आजारपणात सुट्टी, बोनस असे अनेक हक्क मिळवून दिले होते. 

शिवसेनेच्या स्थापनेआधी मुंबईवर कामगार चळवळींचा प्रभाव होता.

कम्युनिस्टांच सामान्य लोकांशी असलेलं नातं, आणि कष्टकरी समाजासाठी हिरीरीने झटण्याची वृत्ती यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढत चालली होती. शिवसेनेच्या स्थापनेआधी मुंबईत कामगार संघटनांचा मोठा प्रभाव होता. तेव्हा कामगार संघटना कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या. त्यामुळेच मुंबईवरील वर्चस्वाच्या लढाईत शिवसेना कम्युनिस्ट यांच्यात संघर्ष झाला. 

शिवसेनेची स्थापना झाल्यावरही कम्युनिस्ट आणि शिवसैनिक यांच्यात नेहमीच संघर्ष झाल्याचं दिसून आलंय. प्रकाश अकोलकर यांच्या ‘जय महाराष्ट्र’ पुस्तकात याबद्दलचे संदर्भ आहेत. शिवसेना आपल्या ताकदीच्या जोरावर त्यावेळी अनेक गोष्टी करत होती. सेनाप्रमुख सुद्धा त्यांची ही कृत्य अभिमानाने सांगत असत आणि शिवसैनिकांची बाजू घेत असत. 

त्यावेळी १९६७ साली शिवसैनिकांनी कम्युनिस्टांची कचेरी असलेली परळची दळवी बिल्डिंग उद्धवस्त केली.

त्यावेळी हे कृत्य शिवसैनिकांचं असल्याचंच ठाकरे यांनी कबूल केलं होतं. शिवाय ‘आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायचीच होती पण तिथले इतर भाडेकरू हे आमचे मतदार असल्याने पोरांना रोखावे लागलं. पण त्यांनी नासधूस केली, टाईपरायटर फेकला हे खरय.’ असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. 

कृष्णा देसाईंच्या मृत्यूनंतर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये झालेल्या मेळाव्यात, संबंधित कृत्य करणाऱ्या शिवसैनिकांच ठाकरेंनी अभिनंदन केल्याची बातमी एका सायंदैनिकाने दिली होती. आता शिवसेना प्रमुखांवर थेट आरोप करणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती. त्याचा पहिला उल्लेख कॉ. देसाईंच्या अंतयात्रेत यशवंतराव चव्हाण यांनी केला. 

आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ वृत्तपत्रात ‘कॉ. कृष्णा देसाईचे खरे खुनी शिवसेना व वसंतराव नाईक’ अशी हेडलाईन सुद्धा छापून आली होती.

 हत्येनंतर बाळ ठाकरे यांनी एक पत्रक जारी करत या हत्येचा निषेध केला आणि असे प्रकार घातक असल्याचं म्हटलं. तसंच शिवसेनेचा या हत्येशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि होणारे आरोप फेटाळून लावले. कॉ. देसाईंच्या मृत्यूनंतर शिवसेनेच्या सभांना चांगलाच जोर आला होता. त्यांच्या भाषणात कम्युनिस्टांवर ‘लाल माकडं’ अशा शब्दात टीका व्हायची. त्यांना अर्वाच्य भाषेत बोललं जायचं, शिवीगाळ व्हायचा. 

आता कॉ. देसाईंच्या मृत्यूनंतर लालबल-परळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली. यासाठी डाव्या गटासह १३ पक्षांनी कॉ. देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई यांचं नाव पुढे केलं आणि शिवसेनेकडून उभे राहिले वामनराव महाडिक. लालबाग-परळ विभागात शिवसेनेचं काम बघणारे हे नेते बाळासाहेबांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. त्या निवडणुकीत केवळ १६७९ मतांच्या फरकाने महाडिक जिंकून आले आणि शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विधानसभेवर गेले. 

कामगार चळवळीचा एक नेता जिथून अक्षरशः राज्य करायचा तिथूनच शिवसेनेचा पहिला आमदार निवडला गेला. 

शिवसेनेचं हे यश कायम देसाईंच्या भयानक हत्येच्या संदभार्तच समोर येत. आता या प्रकरणाचं पुढे काय झालं? तर या प्रकरणात ३ संशयितांना पकडलं त्यांच्यावर खटला चालला आणि त्यांचा गुन्हा सुद्धा सिद्ध झाला. दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे यांना चौदा वर्षांची शिक्षा झाली पण त्यांचं तुरुंगातलं वर्तन बघून त्यांची शिक्षा सात वर्षांनी माफ करण्यात आली.

आपली शिक्षा भोगून बाहेर आल्यावर यातील विश्वनाथ खटाटे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहेब अशा नावाने एक उल्लेख केला होता.

 ‘त्यांना जर आम्ही मारलं नसतं तर त्यांनी साहेबांना मारलं असतं.’ 

असं त्यांनी सांगितलं. तर यातले ‘साहेब’ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. 

अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार कृष्णा देसाई यांच्या खूनाचा त्यांच्यावर होणारा आरोप फेटाळून लावला पण निखिल वागळे  यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत कॉ. देसाई त्यांच्या खूनाचा कट रचत होते असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. ‘कृष्णा देसाई मला ठार करायला निघाला होता. आमचे पिटीचे नाईक मास्टर त्याने मारले. तो खुनी होता.” असं बाळासाहेब ठाकरे म्हटले होते. सध्या या घटनेची आठवण व्हायचं कारण म्हणजे नुकतीच आलेली बातमी. सध्या मुंबईत अंधेरी पोटनिवडणुकीच्या वारे जोराने वाहत आहेत. 

शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे गट असे दोन गट पडले असताना ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कम्युनिस्ट पार्टीने आपलं समर्थन दर्शवलं आहे. 

एकेकाळी जी शिवसेना कम्युनिस्टांना लाल माकड म्हणायची, त्यांच्यावर टीका करायची अशा शिवसेनेने निवडणुकीत मात्र कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी केली आहे. कम्युनिस्ट पार्टीचा एवढे वर्षाचा रक्तरंजित इतिहास बघता ही गोष्ट नक्कीच चकित करणारी आहे. सध्या तरी ठाकरे आणि भाकप यांच्यात संबंध चांगले झाले असले तरी इतिहासात मात्र काहीतरी वेगळंच सांगतोय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.