आमदार गेले, नातेवाईक गेले, थापा गेला मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?

उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं.” राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या विधानसभा अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे स्पष्टीकरण दिलं आणि सगळ्या सभागृहात हशा पिकला.

त्यावेळी धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीची मोठी बातमी झाली, पण मिलिंद नार्वेकर फडणवीसांना का भेटले हे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिलं.

आता मिलिंद नार्वेकर पुन्हा चर्चेत आले आहेत ते MCA च्या इलेक्शनमुळे. सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यामुळे MCA ची इलेक्शन चर्चेत होतंच पण त्याचवेळी सगळ्या पक्षांतील नेत्यांशी असलेली आपली गुडविल वापरत नार्वेकर MCA च्या बॉडीवर निवडून गेले आहेत. जिंकून आल्यांनतर त्यांचे फोटो आशिष शेलार, प्रसाद लाड शिंदे गटाचे पेरतो सरनाईक यांच्याबरोबर विक्ट्री साइन दाखवताना दिसले.
या आधी एकदा मिलिंद नार्वेकर चर्चेत आले होते ते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे . ते म्हणाले होते ‘थापा गेले, आता मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येतायत’.

आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आता शिंदे गटात जाणार का या चर्चांना उधाण आलंय.

पण उद्धव ठाकरेंची सावली, मातोश्रीवरचा सीसीटीव्ही अशी ओळख असणारे नार्वेकर सेनेला रामराम ठोकतील अशा चर्चा होण्यामागं नेमकी कारणं काय आहेत ? ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये अंतर कसं पडत गेलं ? तेच पाहुयात.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिलिंद नार्वेकर शाखाप्रमुख बनण्याची इच्छा जवळ बाळगून उद्धव ठाकरेंना भेटायला आले. उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न विचारला, ‘फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे ? नार्वेकरांनी उत्तर दिलं, ‘साहेब तुम्ही म्हणाल ते.’ त्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे समीकरण पक्कं झालं. नार्वेकरांकडं पुढं जाऊन उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून जबाबदारी आली. जसं उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वजन वाढत गेलं, तसं मिलिंद नार्वेकरांचं मातोश्रीवरचं वजन वाढलं. भास्कर जाधव, नारायण राणे, राज ठाकरे अशा दिग्गज नेत्यांनी शिवसेना सोडली आणि प्रत्येकवेळी नार्वेकरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. राणेंनी तर नार्वेकर तिकीट वाटपासाठी खंडणी घेतात असा आरोपही केला. मात्र मातोश्रीवरचं नार्वेकरांचं महत्त्व कमी झालं नाही, उलट वाढतच गेलं.

तिकीटवाटप असेल किंवा उद्धव ठाकरेंची भेट घेणं शिवसेना नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून मिलिंद नार्वेकरांकडेच बघितलं जायचं.

इतर पक्षातल्या मोठ्या नेत्यांशी, उद्योगपतींशी असलेले मैत्रीचे संबंध, मातोश्रीवरचा अंमल आणि उद्धव ठाकरेंचा विश्वास यामुळं नार्वेकर समांतर सत्ताकेंद्र म्हणून उदयाला आले. त्यांची शिवसेनेतली ताकद सांगायची झाली, तर अनेक शिवसेना नेत्यांकडे कुठलं काम घेऊन गेल्यावर ‘मिलिंदला विचारुन सांगतो’ किंवा ‘मिलिंदला विचारुन केलंय’ अशी उत्तरं मिळतात. जेव्हा महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी हालचाल सुरु होती, तेव्हाही मिलिंद नार्वेकर चांगलेच सक्रिय होते. पण आत्ता पक्षावर सगळ्यात मोठं संकट आलेलं असताना, अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच नार्वेकर शिंदे गटात जातील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

साहजिकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात अंतर कसं पडत गेलं ?

ज्यादिवशी एकनाथ शिंदे आमदारांसह सुरतला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंकडून चर्चा करण्यासाठी दोन दूत पाठवण्यात आले. त्यातले एक आमदार रवींद्र फाटक होते आणि दुसरे अर्थातच मिलिंद नार्वेकर. मात्र या दोघांना ती मसलत यशस्वी करता आली नाही. पुढं स्वतः फाटक यांनीच शिंदे गटाचा रस्ता धरला. शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व बंडासाठी अनेकांनी मिलिंद नार्वेकरांना जबाबदार धरलं. मंत्र्यांचे, आमदारांचे फोन न उचलणं, उद्धव ठाकरेंना भेटू न देणं असे आरोपही त्यांच्यावर झाले. तरीही उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात तणाव असल्याची किंवा नार्वेकर नाराज असल्याची चर्चा होत नव्हती.

राज्यात सत्तांतर झालं आणि लगेचच अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी नार्वेकर आणि फडणवीस यांची भेट झाल्याचा दाखला दिला.

ही गोष्ट ताजी असतानाच मिलिंद नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या आणि मिलिंद नार्वेकर सेनेला जय महाराष्ट्र करणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा सांत्वनपर आणि एकदा गणपती दर्शनानिमित्त मिलिंद नार्वेकरांच्या निवासस्थानी भेट दिली. या दोघांमध्ये बोलणं सुरु असल्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले. पुन्हा एकदा नार्वेकर नेमके अलीकडे की पलीकडे असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

या चर्चांना पूरक ठरलं ते शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातलं चित्र.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जाहीर भाषण करणार होते. दसरा मेळाव्याआधीचं शक्ती प्रदर्शन म्हणून या गटप्रमुखांच्या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. याच्या तयारीमध्ये मिलिंद नार्वेकर सक्रिय होते, मात्र ऐन मेळाव्यात नार्वेकर मागं बसलेले होते आणि उद्धव ठाकरेंसोबत वावरत होते ते बाळासाहेबांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रवी म्हात्रेंचा मातोश्रीवरचा वावर आणि जबाबदारी वाढली असल्याचं सांगण्यात येतं. साहजिकच म्हात्रेंचं वाढतं महत्व पाहता, नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये अंतर पडलंय का अशी शंका उपस्थित होते.

शिवसेनेत सगळ्यात मोठं बंड झालेलं असताना ते थोपवण्याची पहिली जबाबदारी उद्धव ठाकरेंनी ज्यांच्याकडे दिली, त्याच मिलिंद नार्वेकरांना मागच्या रांगेत बसायला लागणं हे भुवया उंचावणारं आहे. बंडानंतर मिलिंद नार्वेकरांवर झालेले आरोप, उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू न दिल्याची आमदारांची तक्रार, बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या ३ भेटी, संजय राऊतांसोबतच अरविंद सावंत, अनिल परब, अनिल देसाई या नेत्यांचा मातोश्रीवरचा वाढलेला वावर या गोष्टींमुळे ठाकरे आणि नार्वेकरांमधलं अंतर नेमकं का वाढलं असेल याचा आपल्याला अंदाज येतो.

मिलिंद नार्वेकर यांच्या दृष्टीनं विचार करायचा झाला, तर त्यांच्याकडेही नाराजीची कारणं आहेत.

नार्वेकरांना पार २०१८ मध्ये शिवसेना सचिव हे पद देण्यात आलं, त्याआधी ते सेनेत कुठल्याही पदावर नव्हते. २०१८ मध्ये आणि त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नार्वेकर विधान परिषदेवर जातील अशा चर्चा झाल्या, पण दोन्ही वेळेस या फक्त चर्चाच राहिल्या.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचे चीफ कोओर्डीनेटिंग ऑफिसर मिलिंद नार्वेकर होते, मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची उचलबांगडी करत आमदार रवींद्र वायकरांना ही जबाबदारी देण्यात आली. त्यात भाजप नेते किरीट सोमय्यांनी नार्वेकरांचा दापोलीतला बंगला अनधिकृत असल्याचे आरोप जेव्हा केले, तेव्हा नार्वेकरांनी स्वतःच हा बंगला पाडला. असं सांगण्यात येतं की वाद टाळण्यासाठी त्यांना सेना नेतृत्वाकडूनच असे आदेश देण्यात आले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा असाच वाद माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याबद्दलही सुरु आहेच. ही कारणं पाहिली, तर नार्वेकर वेगळा विचार करतील का ? ही शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही.
अजून एक म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातसुद्धा उद्धव ठाकरेंचे बाकीचे PA समोर दिसत असताना मिलिंद नार्वेकर पाहिल्यासारखे दिसेल नाहीत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर आता आपली वेगळी चूल मांडणार का? हे येणारा कालच सांगेल

Leave A Reply

Your email address will not be published.