शेवटच्या क्षणी शूटिंगला येणास नकार देऊन बेगम अख्तरने दिग्दर्शकाला अडचणीत आणले होते

हिंदी सिनेमातील समांतर चित्रपटांच्या यादीत १९७४ साली प्रदर्शित झालेल्या एम एस सत्थू यांच्या ‘गर्म हवा’ या सिनेमाचे नाव अग्रक्रमात येते. भारत पाकिस्तान फाळणीच्या विषयावर बनलेला हा चित्रपट त्याकाळी मोठा वादग्रस्त देखील झाला होता.

एका उत्तर भारतीय मुस्लिम कुटुंबावर केवळ ते मुसलमान असल्याने भारत सोडून पाकिस्तानात जाण्याची वेळ येते.

त्यावेळी इथे असलेले सगळे लागे बांधे, सर्व नाते रिश्ते एका झटक्यात तोडून पाकिस्तानला जावे लागते आहे हे दुःख त्या कुटुंबाला असते. अतिशय भावस्पर्शी आणि वास्तववादी असा हा चित्रपट होता. दिग्दर्शक एम एस सत्थू हे डाव्या विचारसरणीचे त्यामुळे त्यांच्या चित्रपटात साम्यवादाची छटा आपल्याला कायम दिसते.

या चित्रपटात जेष्ठ अभिनेते बलराज सहानी यांनी हवेलीच्या मालकाची सलीम मिर्झा यांची भूमिका केली होती. त्यांच्या आईच्या भूमिकेसाठी ख्यातनाम गायिका बेगम अख्तर यांची निवड झाली होती. बेगम अख्तर तब्बल 30-35 वर्षानंतर हिंदी सिनेमात काम करणार होत्या. त्यापूर्वी त्यांनी चाळीस च्या दशकात महबूब यांच्या ‘रोटी’ या चित्रपटात काम केले होते. त्यामुळे सर्वांनाच बेगम अख्तर यांच्या पुनरागमनाची खूप उत्सुकता होती.

या सिनेमाचे सर्व चित्रीकरण आग्रा येथील मिर्झा मॅन्शन या बिल्डिंगमध्ये होणार होते.

सर्व युनिट आणि कलावंत आग्र्याला पोहोचले. आता इंतजार होता फक्त बेगम अख्तर यांचा. त्यावेळी त्या लखनऊ येथे राहत होत्या. शूटिंगचा दिवस उजाडला पण त्याच दिवशी बेगम अख्तर यांचा निरोप आला त्या सिनेमात काम करू शकत नाही. दिग्दर्शक एम एस सत्थू यांच्या पोटात गोळा आला. आता ऐन वेळेला आईची भूमिका कोणाला द्यायची? सर्व शूटिंग खोळंबून राहणार होते.

सिनेमाचे बजेट आधीच कमी होते. काय करायचे? त्याच वेळी या हवेलीचे मालक माथूर तिथे आले. सत्थू यांनी माथुर यांच्यापुढे हा प्रश्न टाकला. कारण ते स्थानिक होते. ते मदत करू शकतील अशी आशा होती. त्यावेळी माथुर यांनी सांगितले,” आपण आत्ता ज्या हवेलीमध्ये आता चित्रीकरण करणार आहोत;  पूर्वी येथे तवायफ राहत असत.

गाणे बजावणे संगीत बारी इथे चालत असे. माझे आजोबा खूप शौकीन होते. नंतर त्यांनी ही हवेलीच विकत घेतली.” यावर सत्थू यांनी विचारले,” यातली तुम्हाला कुठली तवायफ माहिती आहे का जी आपल्या चित्रपटात भूमिका करू शकेल?” माथुर साहेबांनी विचार केला.

त्यावेळी रात्रीच्या अकरा वाजले होते आणि अचानक त्यांना एका तवायफची आठवण झाली. मग काय माथूर साहेब, दिग्दर्शक एम एस सत्थू आणि अभिनेता बलराज सहानी ताबडतोब आग्र्याच्या त्या बस्ती मध्ये गेले. तीन फुटाच्या चिंचोळ्या गल्लीतून ते आत एका खोली कडे गेले आणि एका दाराची कडी त्यांनी वाजवली.

एका वृद्ध स्त्रीने वैतागून आतूनच उत्तर दिले , “घर चले जाओ यहा अब कोई नही है!” माथूर साहेबांनी आपला परिचय दिला तरी आतून आवाज आला ,” अंदर कोई लडकी नही है. सब लडकीयो को पोलीस उठाकर लेके गई!” त्यावर माथुर साहेब म्हणाले ,”हमे कोई लडकी वडकी नही चाहिये हम आपसे ही मिलना चाहते है.”

आतून त्या वृध्द स्त्री ने पुन्हा आवाज दिला,” आप मुझे क्यू मिलना चाहते है?” त्यावर माथुर म्हणाले,” खाला, आप पहले दरवाजा तो खोलीये’ तेंव्हा कुठे दबकत दबकत येऊन त्या वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला.

माथूर साहेब आपल्या मित्रांना घेऊन आत गेले. त्यांनी त्या वृद्ध स्त्रीला सांगितले ,”खाला कई बरस पहले आग्रा के जिस हवेली मे आप गाना गाती थी उसी हवेली मे हे ये लोग एक फिल्म का शूटिंग करने वाले है. और ये चाहते है आप इस फिल्म काम करे.” यावर ती मुस्लिम वृद्ध स्त्री ढसाढसा रडू लागली. सर्वांना काहीच कळेना.

काय चुकले? माथुर साहेबांना वाटले माझ्या बोलण्याचे यांना एवढे दुःख का झाले असावे” दु:खावेग ओसरल्यानंतर ती वृद्ध म्हणाली,” कई बरस पहले की ये बात है. मी माझ्या भावासोबत माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईला हीरोइन बनण्यासाठी गेले होते.

या स्टुडिओतून त्या स्टुडिओमध्ये असे ठोकर खात फिरत होते. वाडिया मूवी टोन मध्ये एक्स्ट्राच्या काही भूमिका देखील केल्या. पण सिनेमात मोठी भूमिका करण्याचे स्वप्न काही पुरे झाले नाही.

उदास होऊन आम्ही आग्र्याला परत आलो. पुन्हा तवायफचा कोठा नशिबी आला. माझे हीरोइन बनण्याचं स्वप्न आणि सिनेमात काम करण्यास स्वप्न अधुरेच राहीले. आणि आज इतक्या वर्षानंतर तुम्ही मला सिनेमात भूमिका ऑफर करीत आहात. माझं इतक्या वर्षानंतर स्वप्न या वयात पूर्ण होत आहे. त्यामुळे मला रडू कोसळले. मै आपको कैसे मना कर सकती हूं ?”

अशा पद्धतीने ‘गर्म हवा’ या चित्रपटात बलराज सहानी यांच्या आईच्या भूमिकेत आपल्याला दिसल्या बदर बेगम! जी भूमिका बेगम अख्तर यांना ऑफर झाली होती ती भूमिका बदर बेगम यांनी अतिशय अप्रतिम रित्या रंगवली. पहिलाच सिनेमा आहे असं कुणालाच वाटले नाही.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

-हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.