ब्रिटीश राजघराण्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणणारं पुस्तक

आपल्याकडं भाऊबंदकीनं अनेक घराणी बुडाल्याचा इतिहास आहे. अगदी इतिहासातल्या राजघराण्यांपासून ते आताच्या राजकीय क्षेत्रात असलेल्या परिवारांमध्येही अंतर्गत वाद असतात हे आपण बघतोच आहोत. हीच भाऊबंदकी तिकडं सातासमुद्रा पलीकडे इंग्लंडमध्येही आहे.

ब्रिटीशच्या राजघराण्यात अंतर्गत कलह आहेत, वाद आहेत आणि त्यामुळे परिवार विक्षक्तही झालाय.

ब्रिटीशच्या राजघराण्यातले धाकटे राजपूत्र प्रिंस हॅरी हे घरापासून आणि राजवैभवापासून लांब अमेरिकेत राहतात. ते राजघराण्यावर नाराज आहेत आणि विभक्तपणेच राहणार आहेत अश्या चर्चा तर आधीपासूनच होत्या. पण, नेमकं काय बिनसलं होतं हे आता प्रिंस हॅरी यांनी एक पुस्तक प्रकाशित करून स्पष्ट केलंय.

‘स्पेअर’ असं या पुस्तकाचं नाव आहे.

राजघराण्यात त्यांची कश्याप्रकारे कुचंबना होत होती आणि राजघराण्यापासून लांब राहण्याचा निर्णय त्यांनी का घेतला हे प्रिंस हॅरी यांनी या पुस्तकातून मांडलंय. हॅरी यांचे मोठे बंधू युवराज विल्यम, विल्यमची बायको कॅथरीन ऊर्फ केट, वडील म्हणजेच राजे चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला जी की हॅरीची सावत्र आई आहे त्यांच्याविरूद्ध नाराजीचा सूर या पुस्तकात दिसतो.

विल्यम हे थोरले पूत्र असल्यामुळे त्यांना हेअर म्हणजे वारस म्हणून संबोधलं जायचं तर, हॅरी यांना मात्र स्पेअर म्हणजे एक पर्यायी व्यवस्था असं संबोधलं जायचं त्याचमुळे या पुस्तकाचं शीर्षक ‘स्पेअर’ असं आहे.

या पुस्तकात त्यांनी अनेक असे प्रसंग लिहीले आहेत की, ज्यामुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं होतं.

या पुस्तकात त्यांनी असं म्हटलंय की, त्यांचे वडील म्हणजे महाराजांचा एक सहाय्यक आणि सावत्र आईचे एक सहाय्यकाने वृत्तपत्रात जाणीवपूर्वक निगेटीव्ह बातम्या छापून आणल्या आणि त्यानंतर तशी प्रथाच पडली. हे सगळं हॅरी यांची पत्नी मेगनबाबतीतही होत होतं. त्यामुळे, हॅरी यांच्या मनात चीड होती. ‘पण, हे  सगळं विल्यमच्या बाबतीतही झालं होतं हे विसरून चालणार नाही’ असं त्यांनी पुस्तकात लिहीलंय.

असं असलं तरी एकंदरीत पुस्तकाचा विचार केला तर, या पुस्तकात विल्यमबाबतही हॅरी यांचं मत फारसं पॉझिटीव्ह दिसत नाही.

हे पूस्तक प्रकाशित होण्याआधी प्रिंस हॅरी यांनी आय टीव्ही आणि सी बी एस या दोन वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी पुस्तकात साधारण काय असणार आहे याचा अंदाज दिला होता. त्यामुळे, हे पूस्तक प्रकाशित होण्याआधी पासूनच प्रचंड चर्चेत राहिलं.

राजघराण्याबद्दल छापून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ब्रिटनच्या राजघराण्याबाबत बऱ्याचदा वर्तमानपत्रात, पुस्तकात चांगलं, वाईट छापून आलेलं आहे. साधारणत: या गोष्टींबद्दल बोलणं राजघराण्यातील मंडळी टाळतात. पण, आता जे लिखाण झालंय ते खुद्द राजघराण्यातील व्यक्तिने केलेलं असल्याने चर्चा अधिक होतायत.

या पुस्तकात टीका आणि आरोपांशिवाय हॅरी यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केलंय.

या पुस्तकाची दुसरी बाजू सांगायची झाली तर, या पुस्तकात हॅरी यांनी आपल्या पर्सनल लाईफ बद्दल अगदी मनमोकळे पणाने लिहीलंय. त्यांच्या वाईट सवयींबद्दल लिहीताना ते आधी कश्याप्रकारे फार हानीकारक नसलेल्या अश्या अमली पदार्थांचं सेवन करायचे हे ही त्यांनी लिहीलंय.

चक्क त्यांनी त्यांचं कौमार्य गमवलं म्हणजे व्हर्जिनिटी कधी आणि कशी तोडली याबाबतही त्यांनी लिहीलंय. याबाबतचा किस्सा लिहीताना त्यांनी म्हटलंय, एका पबच्या मागे असलेल्या गार्डनमध्ये त्यांनी कौमार्य गमावलंय.

विशेष म्हणजे हे पुस्तक १० जानेवारी रोजी प्रकाशित होणार होतं. त्याआधीच त्याच्या काही आवृत्ती बाजारात आल्या आणि काही मजकूर हा लीक झाला होता.

एकंदरीत पुस्तकाचा विचार केला तर, वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतानाच प्रिंस हॅरी यांनी शीर्षकापासून ते मजकुरापर्यंत प्रत्येक ठिकाणी राजघराण्यावर टीका केली आहे. त्यामुळे आतापर्यंत हॅरी राजघराण्यात परततील अशा सुरू असलेल्या चर्चा खरी ठरण्याची शक्यता अगदीच धुसर झाली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.