महाराष्ट्रात आहे ३८२ एकरावर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला !

मेळघाट म्हटले पहिले डोळ्यासमोर येतो तिथला वाघ. मेळघाटचा व्याघ्रप्रकल्प जगभर प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले मेळघाट तितकेच परंपरा, संस्कृती, तिथले जनजीवन आणि नैसर्गिक संपत्तीने नटलेले आहे. ते अस वाचून किंवा नेटवर बघून कळत नाही. त्यासाठी तिथे जाऊन त्यात एकरूप व्हाव लागत. कारण मेळघाटात गेलेला माणूस मेळघाटाच्या प्रेमात पडला नाही, असे होऊच शकत नाही.

तर मंडळी याच मेळघाटाला ऐतिहासिक वारसाही कमी लाभलेला नाही. मेळघाट हे विदर्भाच नंदनवन म्हणून ओळखल जात ते तिथे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेल्या उधळनीने. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला गिरिदुर्ग याच मेळघाटच्या जंगलात लपलेला आहे.

तो दुर्ग म्हणजे नरनाळा किल्ला.

अकोला जिल्यातील अकोट पासून २४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हा सुमारे ३८२ एकर वर पसरलेल्या ह्या किल्ल्याला एकूण ६३ बुरुज व २४ मैल लांबीची तटबंदी आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकूण ५ प्रवेशद्वार आहेत. किल्ला तीन भागात विभागलेला असून, मुख्य किल्ल्याच्या पूर्व-पश्चिमेस तेलियागड व जाफराबाद हे दोन उपदुर्ग आहेत.

राजपूत राजा नरनाळासिंग याच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा हे नाव मिळाले असे म्हणतात.

किल्ला कुणी बांधला याच्या कुठे उल्लेख नसल्या तरी तो गोंड राजाने बांधल्याचा सांगण्यात येते. शहानुरच्या अलीकडे मलकापूर (गोंड) म्हणून गावं ही आहे. किल्ल्याची दुरुस्ती इ.स.१४२५ मध्ये बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने केल्याचा उल्लेख “तारिख-ए-फरीश्ता” या ग्रंथात आढळतो. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला.

किल्ल्याचे शहानुर, मेहंदी, महाकाली, शिवपूर व दिल्ली हे पाचही प्रवेशद्वार सुंदर कलाकृतीने नटलेले आहेत.

यातील महाकाली दरवाजा सर्वात भव्य व कलाकुसरयुक्त अशी वास्तू आहे. दरवाज्यावर १४ सहस्त्रदल कमळे व इतर बरच कोरीवकाम केलेलं आहे. वरच्या बाजूस फारसी भाषेत दोन शिलालेख लिहिलेले आहेत. दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सुबक अशा देवड्या आहेत. उजव्या बाजूला टेळहानीसाठी बुरुज आहे. आतल्या बाजूस कमानी व तळखोल्या आहेत.

याव्यतिरिक्त किल्ल्यावर अंबर महल आहे. तीन कमानी असलेल्या महालाच्या आत मध्ये घुमटावर कोरीवकाम केलेलं आहे. तसेच तत्कालीन काळात चुन्यासारखाच भितींना निळा लेप देत असत तो इथं बघायला मिळतो. महलावर पहारेकर्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. उजव्या बाजूला एक तळखोली देखील आहे. महलासमोर एक पाण्याचं टाक आहे व चारही बाजूंनी खांबांचे अवशेष बघायला मिळतात. त्यावरून लक्षात येत की, तिथं सभामंडप असावा असा अंदाज येतो.

भग्न वाड्यासमोर आपल्याला एक भलीमोठी अठराफुटी तोफ दिसते. तिला नवगज तोफ म्हणतात. गडावर असलेली ही एकमेव तोफ. दोन माणसाच्या हाताच्या रिंगणातही या तोफेच तोंड बसत नाही. तोफेचा आकार बघून, त्यातून मारा मारायला गोळा किती मोठा लागत असेल ? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. इथून शहानुर गाव व पोपटखेड धरणाचा जलाशय नजरेस पडतो.

picsart 06 27 12 55 42 01

अंबरमहलच्या बाजूने एक पायवाट जाते. या वाटेने जातांना उजव्या बाजूला तीन कमानी असलेला ओटा दिसतो. मात्र त्यावर गेल्यावर लक्षात येत की, तो ओटा नसून तेल-तुपाचे टाके आहे.

यासोबतच किल्ल्यावरील मस्जिद, घोड्पागा, गजशाळा अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. शिवाय गडावर शक्कर, चंद्रावती, धोबी, मोती, खंब, दमयंती, इमली हे तलाव हि आहेत. कुत्रा चावल्यास यातील शक्कर तलावात अंघोळ करून समोर असलेल्या असलेल्या दर्गेवर गुळ फुटण्याच्या प्रसाद चढवल्यास रुग्ण बरा होते अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

wp 1498498236932

किल्ल्याला जायचं असेल तर आपल्याला आधी अकोटला जावे लागेल. अकोलापासून अकोट ४५ किमीचे अंतर आहे. तिकडे जाण्यासाठी दर १५ मिनिटाला बस मिळते. अकोट ते शहानुर प्रवास आपल्याला भाड्याच्या गाडीने करावा लागतो. राहण्याची सोय अकोट गावात आहे. शहानुर येथे वनखात्याचे संकुल आहे. पण त्यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागते.

मग भिडूंनो कधी जाताय मेळघाट आणि नरनाळ्याचे सौंदर्य अनुभवायला?

फक्त इथे फिरताना जागोजागी वाघाच्या पावलाचे ठसे पाहायला मिळतात. हा किल्ला मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे फिरताना काळजी घ्यायची सूचना वनखात्याने दिलेली आहे. तसेच किल्ल्याची दारे दुपारी तीन नंतर बंद केली जातात.

महाराष्ट्रातले गडकिल्ले हीच आपली खरी संपत्ती आहे. त्याचे रक्षण करणे, संवर्धन करणे हीच आपली जबाबदारी आहे. बरोबर ना?

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. S. N. khating says

    इतिहास का जतन होना अति आवश्यक है आनेवाली जनरेशन को सौपना वर्तमान जनरेशन का परंम दायित्व है.।

Leave A Reply

Your email address will not be published.