नगरच्या ५२ महिला असलेली बस दिल्लीत गायब झाली, अन् पवारांनी ती बातमी छापून दिली नाही.

गोष्ट आहे १९९६ ची. ज्यावेळी हि घटना घडली त्यावेळी एका छोट्याशा चौकटीत बातमी छापून आली होती. त्यानंतर बातमीचा कुठेच उल्लेख नाही. अखेर या बातमीचा ठावठिकाणा आम्हाला एका पुस्तकात सापडला. झालं अस होतं की दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मोर्चाच आयोजन केल होतं. त्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून दिल्लीत महिला पोहचल्या होत्या. 

दिवसभर मोर्चा झाल्यानंतर आत्ता दिल्लीत आलोच आहोत तर देवदर्शन करुनच परत जाण्याचा सुपीक प्लॅन ठरला. इथपर्यन्त काहीच इश्यू नव्हता. मग ठरलं. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या अंगणवाडी कर्मचारी महिलांनी चार बस ठरवल्या. दिवसभर दिल्ली दर्शन करायचं आणि परत यायच अस ते नियोजन. 

दिवसभर दिल्ली दर्शन करुन तीन बस परत आल्या. एक बस मात्र काही केल्या परत आली नाही. बसमध्ये ५२ महिला होत्या. बऱ्याच तरुण होत्या. रात्रीचे बारा वाजू लागले आणि मागे राहिलेल्या बसची वाट बघणाऱ्या महिलांचे धाबे दणाणले. 

आत्ता काय करायचं, यावेळी सारखे त्यावेळी ना मोबाईल होते तो टेलिफोनची संख्या जास्त होती. त्यात दिल्लीसारखं अनोळखी शहर. त्यातही घरी फोन करुन सांगायचं तर त्या काळजीने महाराष्ट्रात काय भूकंप होईल सांगता येत नव्हतं. 

अशात एकीने सुचवलं की दिल्लीत असणाऱ्या महाराष्ट्रातले पत्रकार नितीन वैद्य आहेत, त्यांना फोन लावू. 

नितीन वैद्य यांना फोन लावण्यात आला. तेव्हा वाजलेले पहाटेचे पाच. 

परिस्थितीच गांभिर्य त्यांच्यादेखील लक्षात आलं, पण इतक्या रात्री उठवणार तर कोणाला? एखाद्या मंत्र्याला फोन करायचा म्हणलं तर इतक्या रात्री ते फोन उचलतील याची गॅरेंटी नव्हती. अधिकाऱ्यांना फोन करावं तर ते तातडीने काही हालचाल करतील याची देखील गॅरेंटी नव्हती. 

अशा वेळी नाव पुढं आले ते शरद पवारांच. शरद पवार तेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. पण एका कामानिमित्त ते दिल्लीला आले होते. शरद पवारांचा मुक्काम कुठे आहे तिथला नंबर काय आहे याची माहिती नितिन वैद्य यांना होती. 

नितीन वैद्य यांनी फोन लावला आणि पवारांनी फोन उचलला. त्यांनी फोनवर  महिलांची बस गायब असल्याचं सांगितलं. शरद पवारांनी काय करता येईल ते बघतो अस सांगून फोन ठेवून दिला. 

सकाळी सात वाजता शरद पवारांचा नितीन वैद्य यांना पुन्हा फोन आला. तेव्हा शरद पवार दिल्लीच्या निझामुद्दीन पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. 

या दरम्यान काय झालं तर शरद पवारांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त निखिलकुमार यांच्याशी पहाटेच संपर्क साधला. त्यांनी घटनेचे गांभिर्य सांगितलं. आयुक्तांनी दिल्ली पोलीसांना चौकशीचे आदेश दिले. दिल्लीपासून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. दिल्लीसह आजूबाजूच्या सर्व शहरातील पोलीस स्टेशनला तपासणीचे आदेश पोहचले. दिल्ली सोबतच दिल्लीच्या आजूबाजूच्या पोलीसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. ५२ महिलांची बस गायब होते हि छोटी बातमी नव्हती. 

सकाळच्या सुमारास बस सापडली…! 

बस कुठे सापडली तर हरिद्वारला. बसमधील महिलांनी ड्रायव्हरला सांगून परस्परच दिल्ली दर्शनासोबत हरिद्वारला घेवून जाण्याचा लकडा लावला. संध्याकाळच्या वेळीस हि बस हरिद्वारच्या दिशेने आली. एक्स्ट्रा देवदर्शनच्या हिशोबातून बसमधील ५२ महिलांनी हा प्लॅन केला होता. 

आयुक्तांनी पवारांना खुशालीचा निरोप पाठवला होता. महिला फिरायला गेल्या होत्या म्हणल्यानंतर शरद पवार देखील पोलीस स्टेशनमध्ये आले. यासाठी पोलीसांना कामाला लावल्यामुळे शरद पवार संकोचले होते तर शरद पवारांना कामाला लावल्यामुळे नितीन वैद्य संकोचले होते. कारण काय तर सकाळपासून शोधमोहिम विमानातून सुरू करण्यात येणार होती. इतक्यात बस सापडली, ते गायब होण्याच कारण पाहून खजील वाटण्याशिवाय इतर मार्ग नव्हता. 

आत्ता ती बातमी शरद पवारांनी का छापून दिली नाही. वैद्य यांना पवारांनीच सांगितल की हि बातमी कुठेही छापून येवून देवू नकोस. वैद्य यांनी का विचारताच पवार म्हणाले, 

तुझी बातमी होईल, पण त्या ५२ महिलांचे पती त्यांना आयुष्यात पुन्हा कधीही कुठे जावू देणार नाहीत. त्यामुळे ती चूक करु नकोस…! 

हे ही वाच भिडू. 

 

1 Comment
  1. अनिल शिंदे says

    खूपच छान

Leave A Reply

Your email address will not be published.