आज इतक्या वर्षांनंतरही ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य उलगडत नाही !!

२७ नोव्हेंबर १९४०ला पहाटे ६ वाजता ब्रूस ली जन्मला. चिनी कँलेंडर नुसार ते वर्ष ड्रॅगन च समजलं जायचं, तिथल्या भविष्य वेत्त्यांच्या नुसार तो जन्मला ती वेळसुद्धा ड्रॅगनची होती. त्याच्या वडिलांना कोणी तरी म्हटलं देखील,

“तुमच्या घरी ड्रॅगन जन्माला आलाय.”

ब्रूस ली मूळचा हॉंगकॉंग चीनचा. पण चीन पासून लाखो किलोमीटर दूर अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को मध्ये जन्मला. त्याचे आई वडील दोघेही ऑपेरा सिंगर होते. वडील ली होई च्यूअन हे फेमस गायक पण होते शिवाय सिनेमात छोटे मोठे रोल देखील करायचे.

त्यांची टीम अमेरिका दौऱ्यावर आली होती तेव्हा तिथेच ब्रूस जन्मला. त्यांना काय माहीत त्यांचा नुकताच जन्मलेला मुलगा सगळ्या जगातल्या सिनेमाचा इतिहास बदलून टाकणार आहे.

ब्रूस ली लहानपणा पासून खोडकर होता. त्याला मारामारीची आवड होती. रस्त्यावर जाऊन भांडणा मध्ये सामील होणे त्याला आवडायचं. खरं तर त्याच्या घरची परिस्थिती उत्तम होती पण तरीही घरच्यांची नजर चुकवून हॉंगकाँग मधल्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये जाऊन फाईट करायचा. त्याला एका चांगल्या शाळेत घातलं होतं मात्र तिथूनही त्याच्या मारामाऱ्या बघून काढून टाकण्यात आलं.

१४ वर्षाचा असताना त्याच आयुष्य बदलणारी एक घटना घडली.

त्याच्या आईवडिलांनी ठरवलं कि याला मारामारीत इंटरेस्ट आहे तर कमीतकमी त्याचं  व्यवस्थित ट्रेनिंग तरी घेऊ दे. त्याच्या वडिलांनी त्याला घरीच कुंगफूच प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. ब्रूस ली त्यात खुश होता.

पण एकदिवस एका स्ट्रीट फाईट मध्ये कुठल्यातरी प्रतिस्पर्ध्याकडून जोरात मार खाल्यावर त्यानं ठरवलं आता एखादा शिफू अर्थात गुरु शोधायचा. लवकरच त्याला तो मिळाला. यिप मॅन  त्याच नाव.एकेकाळी चीन मध्ये पोलीस ऑफिसर असणारा यिप माओने चीनी कम्युनिस्ट क्रांती केल्यावर जीव वाचवून हाँगकाँगला आला होता.

ब्रूस ली त्याच्या स्कुलमध्ये  विंग चू ही पुरातन मार्शल आर्टची कला शिकू लागला.

सोळा वर्षाच्या या मुलाची अवघ्या काही दिवसातली प्रगती यिप मॅनच्या कानावर आली त्याने त्याला पाहिलं. या मुलामध्ये काही तरी विजेसारखा स्पार्क आहे त्यांना जाणवलं. त्यांनी स्वतः त्याच ट्रेनिंग सुरु केलं. खरं तर संपुर्ण स्कुलमध्ये अगदी निवडक ५-६ जणांना शिफू स्वतः शिकवत असतात पण ब्रूस ने आपल्या मेहनतीच्या जीवावर अगदी थोड्याच दिवसात ते स्थान मिळवलं.

दोन वर्षे शिफू च्या रगड्या खाली तयार होऊन ब्रूस ली आणखी जास्त घातक बनला. एवढं करून त्याचा स्ट्रीट फाईट चा नाद सुटत नव्हता. एकदा तर पोलीस त्याला पकडून  थेट त्याच्या घरी घेऊन  आले. त्यांनी ली च्या वडिलांना सक्त वोर्निंग दिली,

“पोरग हाताबाहेर जात आहे. परत रस्त्यात मारामारी करताना सापडला तर घरी नाही तर तुरुंगात खडी फोडायला पाठवेन .”

मग मात्र ब्रूस ली ची रवानगी त्याच्या मोठ्या बहिणीकडे अमेरिकेला करण्यात आली. तिथे गेल्यावर अठरा वर्षाचा ब्रूस ली दिवसा कॉलेज आणि रात्री एका रेस्टोरंटमध्ये वेटर च काम करू लागला.

कुंगफू ची आवड गप्प बसणारी नव्हतीच. स्वतः स्वतःची प्रॅक्टिस सुरूच होती. काही दिवसांनी सगळं गाशा गुंडाळला व ऑकलँड मध्ये जेम्स ली नावाच्या मार्शल आर्ट तज्ञाबरोबर राहायला गेला. जेम्स ली ला अमेरिकन मार्शल आर्ट चा निर्माता म्हटलं जात तो ब्रूस ली पेक्षा २४ वर्षांनी मोठा होता पण त्याची जागा ब्रूस ली च्या आयुष्यात एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे होती.

दोघांनी मिळून ऑकलंड मध्ये एक मार्शल आर्ट स्टुडियो सुरु केलं.

जेम्स ने ब्रूस ला एक गोष्ट शिकवली, चमत्कार केल्या शिवाय नमस्कार मिळत नसतो. टिपिकल जुन्या कर्मठ कुंगफू ला धरून बसलं तर कधीच अमेरिकेत आपल्याला स्वीकारलं जाणार नाही. काही तरी आगळ वेगळं करून दाखवलं पाहिजे.

हे दोघे आशियाई  सोडून इतर लोकांनाही आपली कला शिकवतात याचा काही कर्मठ लोकांना राग होता पण त्याला ते  भीक घालत नव्हते . त्यातूनच  ब्रूस लीच्या आयुष्यातली एक सर्वात मोठी फाईट झाली होती. त्यात त्याचा विजय झाला होता पण त्यासाठी त्याला ३ मिनिट लागली होती, इतका वेळ लागणे म्हणजे आपला पराभव च झालाय असं गैरसमज करून घेऊन ब्रूस ली ने मार्शल आर्ट टेक्निक मध्ये बरेच क्रांतिकारी बदल केले. त्यात स्पीड आणली.

जेम्स लीने ब्रूस लीची एडी पार्कर नावाच्या हॉलिवूड मधल्या व्यक्तीशी ओळख करून दिली.

पार्कर बीच कराटे चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करायचा. ब्रूस ली ने तिथे आपला फेमस दोन बोटावर पुशअप आणि एक इंच पंच करून दाखवला. अमेरिकेतल्या सर्वात बेस्ट कराटे चॅम्पियनला अवघ्या १ इंचावरुन पंच मारून त्याला ४ फूट लांब उडवून दाखवले.

त्या दिवसापासून ब्रूस ली हे नाव हॉलिवूड मध्ये चर्चेत येऊ लागलं. यापूर्वी हाँग काँग मध्ये असताना त्याने वडिलांसोबत काही सिनेमात काम केलं होत पण हॉलिवूड मध्ये इंग्रजी सिनेमात काम मिळणे म्हणजे जगभरात आपली कला पोचवण्याची संधी होती. ब्रूस ली ती सोडणार नव्हता.

त्याला ग्रीन हॉर्नट नावाच्या एका सिरीयलमध्ये एका डिटेक्टिव्ह चा साथीदार बनला. हि सिरीयल त्याला सिनेमात छोटे मोठे रोल मिळवून देण्यास उपयोगी पडली. ब्रूस ली ने याकाळात लिहिलेलं एक पत्र प्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो

 येत्या दहा वर्षात मी अमेरिकेतला चिनी वंशाचा सर्वात मोठा सुपरस्टार बनेन आणि माझी संपत्ती १० बिलियन डॉलर इतकी असेल.

पुढच्या चारच वर्षात ब्रूस लीने याच्या पेक्षा कित्येक जास्त पटीने कमावलं. बिग बॉस  नावाच्या सिनेमात त्याला पहिल्यांदाच लीड रोल मिळाला. तो  सिनेमा तुफान गाजला, त्या पाठोपाठ फिस्ट  ऑफ फ्युरि आणि वे ऑफ ड्रॅगन असे आणखी दोन सिनेमे आले ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. वोर्नर ब्रदर्स सारखी जगातली सगळ्यात मोठी फिल्म कंपनी त्याला साइन करण्यासाठी तडफडू लागली.

त्यांच्या एंटर द ड्रॅगन या महत्वाकांक्षी सिनेमाचं शूटिंग सुरु झालं.

या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं तस ब्रूस ली ला तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. त्याच झालं असं होत कि शरीराला येणारा अतिरिक्त घाम रोखण्यासाठी त्याने आपल्या काखेतील घर्मग्रंथी काढून टाकल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला कि त्याच्या मेंदूला सूज आली. अधूनमधून शूटिंग सुरु असताना तो चक्कर येऊन देखील पडला.

२० जुलै १९७३.

त्याला एक प्रोड्युसर कुठल्यातरी सिनेमाच्या स्टोरी साठी येऊन भेटणार होता. दोघे जण हॉंगकॉंग मधल्या हॉटेल मध्ये भेटले. काही काळ तिथे गप्पा मारल्या आणि नन्तर बेटी टिंग पेई  नावाच्या ब्रूस ली च्या एका मैत्रिणीच्या घरी दोघे आले. तिथे आल्यावर ब्रूस ली ला परत कसला तरी त्रास सुरु झाला.

बेटी ने त्याला पेनकिलर औषध खाऊ घातलं. ते औषध खाल्ल्यावर  ब्रूस ली झोपला खूप वेळ झालं तो उठलाच नाही. त्यांनतर त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी जाहीर केलं कि ब्रूस लीचा मृत्यू झाला आहे.

अवघा ३२ वर्षाचं आयुष्य. फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सिनेमे आले. पण त्याने जगभरातल्या सिनेमात मार्शल आर्ट आणला. त्याला राजमान्यता मिळाली. जॅकी चेन सारख्या त्याच्या वारसदारांनी मार्शल आर्टला पुढं नेलं. अमेरिकेपासून भारतापर्यँत गल्लीबोळात कुंगफू कराटेचे क्लासेस निघाले.

मार्शल आर्ट शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रूस ली हा देव आहे.

मात्र इतक्या वर्षातही त्याच्या मृत्यूचं रहस्य कमी झालेलं नाही. कोणी म्हणत त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता तर कोणी म्हणतो कि ब्रूस ली आपल्या वेदना लपवण्यासाठी ड्रग घ्यायचा त्याचा ओव्हरडोस झाला होता. कोणी कोणी अशी म्हणत त्याच्या विरुद्ध असलेल्या लोकांनी त्याच्यावर जादू टोणा केला होता.

आता थियरी काहीही असतील पण डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या दिवशी त्याने अजाणतेपणे खाल्लेलं ऍस्प्रीन सारखं साधं औषध त्याच्या मेंदूत मोठी खळबळ करून गेलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.तो जगला जसा चमत्कार होता तो मेला  तेही चमत्कार बनूनच.

आपल्या पैकी प्रत्येकाला लहानपणी ब्रूस ली होण्याचं वेड लागलेलं. तो आज असता तर ७९ वर्षाचा झाला असता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.