रॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.

६ जुलै १९४६. मॅनहॅटन न्यूयॉर्कमधील सरकारी हॉस्पिटल. अमेरिकेतली पहिली महिला बॉडीबिल्डर म्हणून ओळख असणारी जॅकी स्टेलॉन गरोदर असल्यामुळे अॅडमिट झाली होती. नवरा फ्रँक स्टेलॉन टेन्शन मध्ये होता. त्यांच हे पहिलच बाळ होतं. प्रसूतीवेळी काही गुंतागुंत झाली आणि त्या नादात डॉक्टरची कात्री लहान बाळाला लागली. मेंदूला जोडणारी एक नर्व्ह दाबली गेली. पोराचा अर्धा चेहरा लुळा पडला.

पोराच नाव ठेवलं होत मायकल सिल्वेस्टर गॉर्डझिलो स्टेलॉन. थोडक्यात सिल्वेस्टर स्टेलॉन. 

असं म्हणतात की प्रत्येक वाईट गोष्टी मागे काही तरी चांगलं असत, काळ्या ढगामागेही सिल्व्हर लायनिंग असते तसच सिल्वेस्टर स्टेलॉनच्या बाबतीतही झालं. आयुष्यभर त्याच्या चेहऱ्याची एक बाजू लुळी राहिली, जीभ जड पडली पण याचाच परिणाम त्याचा दमदार आवाज आणि विशिष्ट स्टाईल बनली जिने सगळ्या जगाला वेड लावलं.

हे कुटुंब मुळच इटलीचं. घरची परिस्थिती अगदी बेताची. फ्रँक स्टेलॉन न्हावी काम करायचा, तर जॅकी आधी म्हटल्या प्रमाणे बॉडीबिल्डिंग, सर्कस मध्ये कसरती, कुस्ती वगैरे करायची. दोघांचे संबंध तसे खूप काही चांगले होते असे नाही. बराच काळ एकमेकाशी भांडायचे, गरिबीमुळे गांजलेली परिस्थिती याला कारणीभूत होती.

याचा परिणाम त्यांच्या दोन्ही मुलांवर झाला. विशेषतः थोरला सिल्वेस्टर वर. एकतर त्याचं अख्खं बालपण पाळणाघरात गेलं. तिथून घरी आल्यावर आईवडिलांची मारामारी बघायला लागायची. तेव्हा पासून तो घुम्याझाला. शाळेतही तो जास्त बोलायचा नाही. बोलला तरी शाळेतली मुले त्याच्या आवाजाची नक्कल करून त्याला चिडवायची. मग हा चिडला की त्या मुलांना दणके द्यायचा. त्यामुळे अनेक शाळामधून त्याला काढून टाकण्यात आलं.

घरातील भांडणे, गल्लीतली मारामारी या सगळ्या टेन्शन मध्येही त्याला एकच सहारा असायचा सिनेमा. तासनतास जिम मध्ये व्यायाम करणे आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघणे हा त्याचा दिवसभराचा प्रोग्रॅम असायचा. सिनेमा नसता तर तो गुन्हेगारी विश्वात गुरफटला असता.  

तसही अभ्यासात काही तो हुशार नव्हताच. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर गावे सुद्धा बदलली. कसाबसा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. दोन तीन कॉलेजसुद्धा बदलले. आवडत्या ड्रामाटिक आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला पण डिग्री काही पूर्ण करू शकला नाही. सगळ शिक्षण सोडलं आणि आपल्या स्वप्नाच्या मागे लागला, सिनेमा!!

काहीही करून या क्षेत्राशी त्याला जोडलं जायचं होतं. खिशात पैसे नव्हते. मग काय कधी सर्कशीतल्या सिंहाचे पिंजरे स्वच्छ करण्यापासून टक्सी ड्रायव्हिंग पर्यंत सगळी कामे केली. रोज आपले फोटो घेऊन वेगवेगळ्या स्टुडियोचे चक्कर काढायचं. त्याचा देखणा चेहरा,तगडी उंची, मजबूत बांधा बघून कास्टिंग करणारे लोक इम्प्रेस व्हायचे पण बोलायला तोंड उघडला की त्याला रिजेक्ट केलं जायचं.

एक दिवस त्याला त्याच्या घरमालकाने भाड दिल नाही म्हणून घरातून बाहेर काढलं. काही दिवस फुटपाथवर काढले. न्यूयॉर्कच्या बसstand वर तीन आठवडे राहिला. शेवटी वैतागून मिळेल तो रोल करायचं त्यानं ठरवलं. मग त्याला मिळाला पार्टी अॅट किटी अँड स्टडस. 

हा एक सेमी पोर्न मुव्ही होता. पण सिल्वेस्टर स्टेलॉनकडे पर्यायचं नव्हता. दोन दिवसाचा शुटींगसाठी त्याला २००$ मिळाले. एवढे पैसे त्याने एकदम पहिल्यांदाच मिळाले होते. याच पैश्यातून पुढे स्ट्रगल करायचं बळ मिळालं. त्यानंतर कधी त्याने पोर्न सिनेमात काम केलं नाही. छोट्या मोठ्या सिनेमात गर्दीमध्ये छोटे रोल मिळू लागले. राहण्याखाण्याची सोय झाली. काही दिवसांनी लग्न देखील झालं.

पण सिल्वेस्टर स्टेलॉन आपल्या करीयरवर खुश नव्हता. त्याला सिनेमात लीड रोल करायचा होता. आता तो जे रोल करायचा त्याच त्याला क्रेडीट सुद्धा मिळत नव्हतं. अखेर त्यान ठरवलं की आपला सिनेमा आपण स्वतः लिहायचा. पण सिनेमा लिहायचा तर बाकीच काम थांबवावं लागणार होतं. कसेबसे थोडेफार पैसे जमवले आणि सिनेमा लिहायला सुरवात केली.

sylvester stallone dog

पण या फिल्म लिहिण्यापायी एक दिवस त्याला आपला लाडका कुत्रा ‘बटकस’ ला सुद्धा विकाव लागल. त्याच्या गल्लीत राहणाऱ्या एका माणसाने ४० डॉलर म्हणजेचं जवळपास ३००० रुपयात तो कुत्रा विकत घेतला. त्या दिवशी सिल्वेस्टर स्टेलॉन आयुष्यात सर्वात जास्त रडला. पण काही पर्याय नव्हता.  असं म्हणतात की यासाठी कुत्रा विकावा लागू नये म्हणून आपल्या बायकोचे दागिने चोरायचा देखील प्रयत्न केला होता.

२४ मार्च १९७५ साली एक जबरदस्त बॉक्सिंग मॅच झाली होती. तेव्हाचा चम्पियन मोहम्मद अली विरुद्ध चक वेपनर. चक वेपनर हा काही अलीच्या तोडीचा बॉक्सर नव्हता पण तरी त्याने वर्ल्ड चम्पियन असणाऱ्या अलीला चांगलीच फाईट दिली. १९व्या राऊंड पर्यंत रंगलेला हा सामना वेपनर हरला पण ही फाईट ऐतिहासिक ठरली.

सिल्वेस्टर स्टेलॉन या सामन्याला हजर होता. तिथून तो थेट घरी गेला आणि तीन दिवसात सलग बसून एका सिनेमाची स्क्रिप्ट लिहून तयार केली, सिनेमाच नाव होतं “रॉकी”.खूप वर्षापूर्वी याच नावाचा एक बॉक्सर होऊन गेला होता. सिल्वेस्टर स्टेलॉनने आपल्या या लाडक्या फायटर वरून आपल्या फिल्मचं नाव ठेवलं होतं.

आता फिल्मस्टुडियोमध्ये स्ट्रगल करायला जाताना तो स्वतःच्या फोटोअल्बमबरोबर रॉकीची स्क्रिप्ट सुद्धा घेऊन जायचा.  काही जणांना स्क्रिप्ट आवडली त्यांनी सिनेमा बनवायची तयारी दाखवली पण स्टेलॉनची त्यांना एक अट असायची.

“स्क्रिप्ट देतो पण हिरो म्हणून मला घ्यायचं.”

अनेकांनी त्याला वेड्यात काढून हाकलून दिलं. धड डायलॉग म्हणता येत नाहीत आणि हिरो व्हायला निघालाय असे टोमणे ऐकून घ्यावे लागले. पण स्टेलॉनने हार मानली नाही. काही जण फक्त या स्टोरी साठी लाखो रुपये द्यायला तयार होते, असं म्हणतात की एक ऑफर २ कोटी रुपयांची सुद्धा होती पण तो आपल्या अटीवर ठाम राहिला.

अखेर युनायटेड आर्टिस्टनां ही स्क्रिप्ट आवडली आणि मोठ्या स्टारच्या ऐवजी मुख्य भूमिकेत सिल्वेस्टर स्टेलॉन हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. दोन्ही कामाचे मिळून त्याला सतरा लाखाचा चेक देण्यात आला.

स्टेलॉन तिथून निघाला ते थेट आपला कुत्रा ज्याने विकत घेतला त्याच्याकडे जाऊन पोहचला. आधी गोड शब्दात सांगितलं, नंतर धमकावल आणि त्याच्या खिशात दोन लाख रुपये सारले आणि बटकसला घरी घेऊन आला. पुढे या बटकसने रॉकीमध्ये एक छोटासा रोल देखील केला.

91a937115c40830220ad471a34329926

सिल्वेस्टर स्टेलॉनच्या आयुष्याच एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. रॉकी तुफान हिट झाला. त्याने आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून टाकले होते. ऑस्करपासून अनेक पुरस्कार खिशात टाकले. एका गल्लीतला काहीच स्वप्न नसणारा तरुण आपल्या चिकाटीमुळे वर्ल्ड चम्पियनला टक्कर देतो हे अनेकांनी आपल्या जीवनाशी जोडलं होतं. 

पुढे रॉकीचे अनेक पार्ट आले, अजूनही येतायत, रॅम्बोचे सुद्धा बरेच पार्ट आले. सिल्वेस्टर स्टेलॉन आजही सुपरस्टार आहे. त्याचा रॉकी आजच्या पिढीला देखील परिस्थती विरुद्ध लढण्याचं बळ देतो. स्टेलोन आपल्या या यशा मागचं कारण देताना म्हणतो,

“I am not the richest, smartest or most talented person in the world. But I succeed because I keep going and going and going. ” 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.