अब्दाली हात चोळत पहात राहिला, अटकेच्या किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकत होता !!

लहानपणापासून आपण कथा ऐकली असते की मराठ्यांनी अटकेपार झेंडा गाडला. मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाचा कळस मानला जातो. वेगवेगळ्या बखरीमध्ये अटक ते रामेश्वर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या कथा लिहिलेल्या आहेत. मग प्रश्न पडतो अटकेपार म्हणजे काय? काय विशेष आहे या गावात?

अटक खुर्द हे उत्तरेला सिंधूनदीच्या किनाऱ्यावरच एक गाव. या गावाला प्रचंड मोठा इतिहास आहे. पुराणकाळात देखील या शहराचा उल्लेख येतो. आज आपण ज्याला अफगाणिस्तान म्हणून ओळखतो तो पूर्वी गांधारदेश होता. कौरवांची आई गांधारी ही याच देशाची राजकन्या. हिंदूकुश पर्वतरांगाचा खडतर प्रदेश. भारतात यायचं झालं तर या हिंदुकुश पर्वतातली खैबरखिंड ओलांडून यावे लागत असे.

सोन्याचा धूर येणारा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपल नशिब काढायला येणारे व्यापारी, योद्धे, भारत जिंकायला येणारे आक्रमक हे सगळे याच खैबर खिंडीतून यायचे.

या खैबर खिंडीचा शेवट होतो पेशावर या गावी. पेशावरपासूनही खाली उतरून आले की हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी वसल आहे अटक खुर्द. अनेक आक्रमकांप्रमाणे ग्रीसचा जगज्जेता अलेक्झांडर उर्फ सिकंदर सुद्धा याच अटक जवळून सिंधू ओलांडून भारतात घुसला होता.

याच ग्रीक योद्ध्यांनी सिंधू पलीकडचा देश म्हणून भारताला इंडिया असे नाव दिले.

पूर्वीच्या काळी एक समज होता की भारताची सीमा सिंधू नदीपर्यंत आहे. ही सीमा ओलांडण्यास हिंदू धर्मात परवानगी नव्हती. म्हणूनच आपल्या देशातून कोणी आक्रमक बाहेरच्या देशात हल्ले करण्यासाठी जायचं नाही. भारताच्या सीमेवरच शेवटच गाव म्हणजे अटक.

अटकचा अर्थ होतो अडथळा. अकबर बादशाहने हे नाव दिले अस म्हणतात. त्यानेच अटक खुर्दमध्ये सिंधूनदीच्या तीरावर किल्ला बांधला. हा किल्ला अफगाणिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या परकीय आक्रमकांवर आळा घालण्यासाठी उभा करण्यात आला होता. पंजाबच्या सुभेदाराकडे याची जबाबदारी दिली.

भारताच्या पश्चिम सीमेवरील सर्वात महत्वाचे ठाणे अटक किल्ला बनला.

अफगाणिस्तानपासून निघून बंगाल पर्यंत जाणारा ग्रांड ट्रंक रोड अटक मार्गे जात होता. शेतीने सुपीक संपन्न असणाऱ्या पंजाबची सुरवात अटकपासून होत होती.

साधारण अठराव्या शतकापर्यंत मुघलांच वर्चस्व अटकेवर राहिले. मात्र दुर्राणी घराण्यातला अहमदशाह अब्दाली जेव्हा अफगाणिस्तानचा सुलतान बनला तेव्हा त्याने पंजाबच्या सुभेदाराचं वर्चस्व मोडीत काढलं. तसंही भारतात मुघल सत्ता खिळखिळी झाली होती. अहमदशाह अब्दाली आपलं पठाणी सैन्य घेऊन अटक मार्गे भारतात यायचा देशभर लुट करायचा आणि परत जायचा.

त्याचा त्रास जेव्हा वाढला तेव्हा मुघलांनी आपल्या मदतीची याचना मराठ्यांकडे केली.

त्याकाळात अब्दालीशी सामना करू शकतील असे पराक्रमी सैन्य फक्त नानासाहेब पेशव्याकडेच होतं. आपला अनुभवी सेनापती, सख्खा धाकटा भाऊ  राघोबा दादा उर्फ रघुनाथराव पेशव्याला प्रचंड सेना देऊन उत्तर मोहिमेवर धाडल. सोबतीला होळकर आणि शिंदें हे सरदार सुद्धा होते. रघुनाथ रावने आपल्या वेगवान घोडदळासह गंगेच्या खोऱ्यात धुमाकूळ घातला.

विरोधात असणाऱ्या सगळ्या राजांचा खात्मा करत अब्दालीने जिंकेलेल राज्य मराठा साम्राज्याला जोडत तो पंजाबच्या दिशेने सरकू लागला.

त्याच्या या वेगवान विजयाला राघोभरारी म्हटल जायचं.

अहमदशाह अब्दाली अंतर्गत बंडाळी शमवण्यासाठी अफगाणिस्तानला परत गेला होता. मात्र जाताना त्याने पंजाबची सुभेदारी आपल्या मुलाला तैमुर दुर्राणीला दिली.

पेशावरमध्ये बसून राज्यकारभार करणाऱ्या तैमुरशाह दुर्राणीवर मुघलांच्या सरदारांचा विशेष राग होता. अब्दाली नाही तर कमीतकमी त्याच्या पोराला धडा शिकवण्यासाठी मराठ्यांना पंजाबात उतरवण्यात आल. शीख सरदार, मुघल सरदार देखील त्यांच्या सोबतीला उभे राहिले. मुघलांचा अंदाज खरा ठरला. या एकत्रित भारतीय शक्तीने अफगाणी सैन्याला धडा शिकवला.

२८ एप्रिल १७५८ रोजी अब्द्लीच्या सैन्याचा प्रचंड मोठा पराभव करून मराठ्यांनी अटकेचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

समोर उभा असलेला प्रचंड हिंदुकुश पर्वत मधून वाहणारी सिंधू नदी आणि अलीकडे उभ्या असलेल्या अटकेच्या दिल्ली दरवाजावर लहरणारा भगवा जरीपटका. मागे अख्खा भारतदेश. मराठी इतिहासाचा सर्वोच्च क्षण.

रघुनाथराव पेशवा तिथेच थाबला नाही. यापूर्वी धर्मपंडिताच्या वेड्या नियमामुळे कधीही कोणा भारतीयाने अटकेच्या पुढे जाण्याचा विचार केला नव्हता. पण नानासाहेब पेशव्यांनी आपल्या भावाला स्पष्ट आदेश दिले होते की

एकचित्तेंकरून मेहनत करून अबदालीचें पारिपत्य करून अटकपार करावा

राघोबाने आपलं सैन्य पेशावरला पाठवलं. तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली मराठे पेशावरवर चालून गेलले आणि त्यांनी तैमुर शाह अब्दालीला तिथून पळवून लावलं. मराठा साम्राज्याची ध्वजा अटकेपार नेली. अतुल्य पराक्रमाची उपमा म्हणून मराठी भाषेत असलेली ‘अटकेपार झेंडे लावले’ ही म्हण इथेच जन्माला आली.

पण रघुनाथराव पेशव्याला अटकेत राहण्यात रस नव्हतं किंवा त्याला पेशावरच्या पुढे अफगाणिस्तानलाही जायचं नव्हत. 

त्याला पुण्याच राजकारण, तिथे होत असलेल आपल्या पराक्रमाच कौतुक खुणावत होत. या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था नीट न लावता राघोबा दादा उतावीळपणे पुण्याला परतला.

इतर मराठा सरदार देखील आपल्या मुलखापासून इतक्या दूरप्रदेशात राहण्यात खुश नव्हते. मल्हारराव होळकर दत्ताजी शिंदेला पंजाब प्रांताचा सुभेदार करून परत दक्षिणेत गेले. दत्ताजी सुद्धा जास्त काळ तिथे टिकला नाही. त्याने साबोजी शिंदे पाटील यांना पेशावरच्या किल्ल्याची जबाबदारी दिली.

 भगवा जरीपटका अटकेच्या किल्लावर फक्त अठरा महिने टिकला.

पुढे जेव्हा जखमी अहमदशहा अब्दाली दुप्पट शक्तीने परत आला तेव्हा अटकेच्या अलीकडेत्याला थोपवून धरण्याची ताकद व जिद्द त्याकाळच्या मराठी सरदारांनी दाखवली नाही. पुढे पानिपतचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे. पुढे अब्दालीनंतर शिखांनी अटकेवर वर्चस्व निर्माण केलं. इंग्रजांनी त्यांना हरवून आपला अख्खा वायव्य प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

अटकेला सिंधू नदीपार करण्यासाठी भक्कम असा पूल बांधला. अटकेच नाव सुद्धा कम्प्बेलपूर केले. पुढे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा सगळा भाग फाळणीमुळे पाकिस्तानात गेला. १९७८ साली पाक सरकारने या गावाचे नाव परत अटकखुर्द केले. सध्या अटकचा किल्ला पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात आहे. तिथे स्पेशल ऑपरेशन फोर्स बनवण्यात आला आहे.

शिवाय पाकिस्तानमधले राजकीय दुष्ट्या महत्वाचे कैदी याच किल्ल्यावर ठेवले जातात.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हटवून जेव्हा परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करशहा बनले होते तेव्हा त्यांनी नवाज शरीफ यांना अटकेच्या किल्ल्यात कैदेत ठेवल होतं, माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी सुद्धा इथे अनेक वर्ष कैदेत होते.

म्हणूनच एकेकाळी भगवा झेंडा फडकलेल्या अटकेच्या किल्ल्याच राजकीय महत्व कमी झालेलं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.