कॉट सचिन तेंडूलकर, बोल्ड वसिम अक्रम…

जेव्हा सचिन, अक्रम, कुंबळे आणि सईद अन्वर एकाच संघाकडून खेळतात…

क्रिकेटला धर्म वैगेरे मानणाऱ्या लोकांचा आपला देश. त्यातही सामना जर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असेल तर मग अचानकच आपल्याकडे ‘देशभक्तांची’ संख्या वाढलेली बघायला मिळते. क्रिकेटच्या मैदानाला धर्मयुद्धाचं स्वरूप येतं. भारताने वर्ल्ड कप फायनल गमावली तरी चालेल पण पाकिस्तान विरुद्धचा मॅच हरता कामा नये, इतकं या देशभक्तांचं दिव्य क्रिकेटप्रेम. अखंड भारताचं (अजूनही) ‘दिवास्वप्न’ वैगेरे बघनारांनाही आपापले धार्मिक अजेंडे राबविण्यासाठी ही जमीन सुपीक वाटते आणि मग मैदाने उखडली जातात,अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो आणि अजून असं बरंच काही…

पण याच भारत-पाकिस्तानी खेळाडूंचा एकच संघ असता तर…? सचिन आणि वसिम अक्रम ही जोडी एकाच संघाकडून खेळताना बघायला मिळाली असती तर..? असे  प्रश्न क्रिकेटबद्दल रोमॅटिक असणाऱ्यांना आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी पडलेले असतातच असतात. आजघडीला जरी ते शक्य नसलं तरी भूतकाळात मात्र एकदा अशी घटना घडून गेलीये. फेब्रुवारी १९९६ मधली घटना, श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडीयम, मोहम्मद अझरूद्दीनच्या नेत्वृत्वाखालील भारत-पाकचा संयुक्त संघ विरुद्ध श्रीलंका यांच्यातला मॅच.

किस्सा असा की, १९९६ च्या  वर्ल्डकपचं आयोजन भारतीय उपखंडात करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील परिस्थिती मात्र थोडी तणावपूर्ण होती. त्यामुळे वेस्ट इंडीज आणि कांगारूंच्या संघाने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. श्रीलंकेसाठी हे महत्वाचं होतं की कुठल्यातरी मोठ्या संघाने श्रीलंकेत खेळून इतर संघांना सुरक्षिततेच्या बाबतीत आश्वस्त करावं. श्रीलंकेबरोबरच भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश या वर्ल्डकपचे सहयजमान होते. तेव्हा या संघांनी श्रीलंकेत खेळायची तयारी दाखवली. विशेष म्हणजे दोन वेगवेगळे संघ न पाठवता भारत-पाक यांचा संयुक्त संघ श्रीलंकेत खेळण्यासाठी पाठवण्यात आला. म्हणजेच सचिन तेंडूलकर, वासिम अक्रम, अनिल कुंबळे, सईद अन्वर, मोहम्मद अझरूद्दीन आणि वकार युनुस यांसारखे दिग्गज एकाच संघाकडून खेळत होते. देशाच्या फाळणीनंतरच्या इतिहासात प्रथमच असं घडतं होतं.

sachin and akram

१९८९-९० नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान उभयपक्षी सिरीज पार पडलेली नव्हती. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये तसेच खेळाडूंमध्ये देखील या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. सामना व्यवस्थित पार पडला. प्रथम फलंदाजी करताना रोमेश कालुविथूर्णचा वसिम अक्रमच्या बॉलिंगवर उडालेला कॅच सचिन तेंडूलकरने पकडला आणि प्रेमदासावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. भारत-पाक क्रिकेटच्या इतिहासातील एका अविस्मरणीय क्षणाचे आपण साक्षीदार झालो आहोत, याबद्दलची ही दाद होती. इनिंग संपण्यापूर्वी श्रीलंकेच्या संघाने ४० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून १६८ रन्स काढले. प्रत्युत्तरात भारत-पाक संयुक्त संघाने हे लक्ष्य ३४.३ ओव्हर्समध्येच गाठले. सचिनने ३६ आणि अझरूद्दीनने ३२ रन्स काढले. संयुक्त संघाने श्रीलंकेचा ४ विकेट्सनी पराभव केला. अवघे १२ रन्स मोजून श्रीलंकेच्या ४ बॅटसमनला पॅव्हेलीयनमध्ये पाठवणारा अनिल कुंबळे ‘मॅन ऑफ द मॅच ठरला’

वेस्ट इंडीज आणि कांगारूंनी मात्र त्यानंतरही श्रीलंकेत न खेळण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. श्रीलंकेने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी नोंदवली. सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव करून श्रीलंका फायनलमध्ये पोहोचली. फायनलमध्ये त्यांची गाठ  वेस्ट इंडिजचा पराभव करून फायनलमध्ये पोहचलेल्या कांगारूंच्या संघाविरुद्ध पडली. कांगारूंच्या संघाने श्रीलंकेत न खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल श्रीलंकन खेळाडूंच्या मनात कांगारूंच्या  संघाबद्दल प्रचंड राग होताच. तोच राग त्यांनी मैदानावर देखील कायम ठेवला आणि फायनलमध्ये कांगारूंचा ७ विकेटनी दणदणीत पराभव करत अर्जुना रणतुंगाच्या नेत्वृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने आपला पहिला-वहिला वर्ल्डकप जिंकला.

 

भारत-पाक संयुक्त संघ

सचिन तेंडूलकर

सईद अन्वर

आमीर सोहेल

मोहम्मद अझरूद्दीन (कर्णधार)

एजाज अहमद

अजय जडेजा

रशीद लतीफ

वकार युनुस

वसिम अक्रम

अनिल कुंबळे

आशिष कपूर

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.