२००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.

आपण ज्याला मनापासून शिव्या घातल्या असा शेवटचा प्लेअर, रिकी पॉंटिंग.

कायम च्युइन्ग्म चघळत चेहऱ्यावर बेदरकार भाव घेऊन तो मैदानात उतरला की डोकंच फिरायचं. त्याकाळात त्याला आणि त्याच्या टीमला जिंकण्याची सवयच होती आणि आपल्याला हरायची. अॅलन बॉर्डर मार्क टेलर आणि स्टिव्ह वाॅ यांचा कॅप्टनशिपचा वारसा त्याच्याकडे चालत आलेला. पण या सगळया लिजेंडस पेक्षाही काकणभर तो जास्तच खडूस होता.

पॉंटिंग ऑस्ट्रेलियन टीम मध्ये आगमनाच्या पूर्वीपासून विवादात होता.

शाळेच्या टीमपासून त्याच्या बॅटीगची हवा जोरात होती. त्याला टास्मानियन टीम मधून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये काही सामने भारी खेळल्यावर त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात समावेशाच्या वावड्या फिरू लागल्या. इतक्या कमी वयात कमी फर्स्ट क्लास खेळलेल्या खेळाडूला कधी राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाला नव्हता. त्याच्यावरून मिडीयामध्ये वाद झाले.

अखेर १९९५ला पॉंटिंगच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या क्षमतेमुळे बदली विकेटकीपर म्हणून वापरता येईल या मुद्द्यावर न्युजीलंडमधल्या चौरंगी लढतीसाठी त्याला निवडले गेले.

सुरवातीच्या दोन सामन्यामध्ये तो काहीच चमक दाखवू शकला नाही. मिडियाने पॉंटिंगला परत बोलवा असा धोशा लावला होता. तेव्हा भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले. जेव्हा बाकीचे खेळाडू पत्त्याप्रमाणे कोसळत होते तेव्हा रिकी खुंटा गाडून मैदानात उभा राहिला. ९२ चेंडूत ६२ धावा काढताना त्याने एकही बाउन्ड्री मारली नाही. त्याची ही पेशन्सवाली इनिंग पाहिल्यावर त्याच्याबद्दलचे सगळे विवाद मिटले.

तिथून जगभरातल्या खेळाडूंशी भांडायला तो सरसावला.

भारतियाशी पहिला पंगा त्याने कलकात्त्यामधल्या एका नाईटक्लब मध्ये घेतला. तिथे झालेल्या मारामारीमध्ये त्याला काही सामन्यांचा दंड झाला. त्याच वर्षी शारजामध्ये झालेल्या एका मॅच मध्ये सतरा वर्षाच्या काटकुळ्या हरभजन सिंगने त्याला आउट काढले आणि पॅव्हेलीयन मध्ये जाण्याचा इशारा केला. पॉंटिंगसाठी हा अपमान होता. त्याने तिथेच त्याला शिवीगाळ केली. इथून सुरु झाली दोघांची रायव्हलरी.

रिकी पॉंटिंगला त्यानंतर अनेकदा हरभजन ने आउट केले. दोघांची मैदानातही अनेकवेळा भांडणे झाली. पण बऱ्याचदा हरभजन त्याच्यावर भारी पडला. जगभरातल्या प्रत्येक मैदानात खोऱ्याने रन गोळा करणारा, सचिन लाराशी तुलना केली जाते असा वर्ल्ड क्लास फलंदाज भज्जीच्या स्पिनला खेळायला घाबरायचा.

स्टीव्ह वॉ कप्तान असतानाच रिकी पॉंटिंग त्याचा वारसदार असणार आहे हे सांगण्यात येत होत. वॉच्या नेतृत्वाखाली कप्तान बनण्यासाठीचे धडे त्याने गिरवले. २००२मध्ये त्याला वनडेची कप्तानी मिळाली. बऱ्याचदा कप्तानीचे ओझे प्लेअर्सन न झेपल्याने त्यांचा फॉर्म बिघडतो. रिकी पॉंटिंगसाठी उलट झालं. कप्तानीच्या प्रेशरमध्ये तो जास्त खुलून खेळू लागला.

२००३चा वर्ल्ड कप हा त्याच्या लीडरशिपचा सर्वोच्च प्रदर्शन होते. या वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीमने अविश्वसनीय खेळ करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. पण वर्ल्ड कप आणि भारत याच्या मध्ये रिकी पॉंटिंग उभा होता.

पहिल्या बॉल पासून भारताचे नशीब गडगडले होते. हेडन आणि गिलख्रिस्ट ने ऑस्ट्रेलियाला जबरदस्त सुरवात करून दिली. पण रिकी पॉंटिंगने त्यावर कळस चढवला. १२१ चेंडूत १४० धावा ठोकून तो शेवट पर्यंत भारताला आउटच झाला नाही.

३५९धावांचे आव्हान समोर असताना उतरलेल्या भारतीय टिमचा आत्मविश्वास सचिन पहिल्या ओव्हरमध्येच आउट झाल्यावर गळाला. २३९मध्ये अख्खी टीम गुंडाळून जगातली सर्वात एकतर्फी वर्ल्ड कप फायनल रिकी पॉंटिंगने जिंकली.

रिकी पॉंटिंगने फक्त २००३चा वर्ल्ड कपच उचलला नाही तर फायनलचा सामनावीरही तोच होता.

स्टीव्ह वॉने लवकरच टेस्टचहि कर्णधारपद पॉंटिंगकड सोपवलं. द ग्रेट आॅस्ट्रेलियाची लिगसी आता त्याच्या हातात आली.  हेडन, गिलख्रिस्ट , हसी, बेवन, मार्टिन लेहमन मक्ग्रा, शेन वॉर्न असे रथी महारथी त्याच्या टीम मध्ये होते . या टीम ला घेऊन रिकी पॉंटिंगने पन्नास ओवरचे दोन वर्ल्ड कप जिंकले. त्यांना कधी हरवताच येत नाही असे गैरसमज त्या काळात होते.

रिकी पॉंटिंगच्या कप्तानीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याने कधीच मागे राहून नेतृत्व केले नाही. विरोधी टीम मध्ये खेळणाऱ्या चांगल्या प्लेअरशी तो स्वतः मुद्दामहून नडू लागला. त्याचा आत्मविश्वास हेच बलस्थान होते. जगातले सर्वात बेस्ट प्लेअर आपल्या साइडकडून असल्यावर कोणाला इतका आत्मविश्वास येणार नाही.

२००७सालच्या बॉर्डर गावस्कर भारत ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये भारतीय खेळाडू आणि त्याच्यामध्ये बरेच वाद झाले.

हरभजन आणि सायमंड्सच्या मंकीगेट वादात तो टीमच्या बाजूने खंबीर उभा राहिला. ही सिरीज कशीबशी पार पडली. ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव करून २-१ने सिरीज जिंकली मात्र वनडे मध्ये टीम इंडियाने त्यांना धूळ चारलीचं. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या भूमीत भारताने सिरीज जिंकली होती. रिकी पॉंटिंगच्या कप्तानीवर पहिल्यांदाच सिरीयस आरोप झाले.

अखेरच्या क्षणापर्यंत लढत देण्याच्या पॉंटिंगच्या चिवट वृत्तीचे कौतुक होत होते पण जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची वृत्ती या सिरीज वेळी ठळकपणे समोर आली. क्रिकेटचा बॅडबॉय म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

त्याला काहीच फरक पडत नव्हता.

M Id 3864

यापूर्वीही भारताचे कृषिमंत्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जेष्ठ वयाकडे दुर्लक्ष करत त्यांना चॅम्पियंस ट्रॉफी घेताना धक्काबुक्की केली. तेव्हाही भारतीय मीडियाशी त्याचा पंगा झाला होता.

२०१२ साली जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा सचिनच्या खालोखाल धावा बनवणारा प्लेअर बनला होता. तो फक्त कप्तान म्हणूनच ग्रेट नाही तर ऑस्ट्रेलियामधल्या वेगवान पिचवर इतक्या धावा बनवून तो जगातला सगळ्यात ग्रेट बॅटसमनपैकी एक ठरला.

रिकी पॉंटिंग जरी भारताचा पक्का वैरी होता तरी त्याच्यावेळच्या भारत ऑस्ट्रेलिया सामने जेव्हडे अटीतटीचे झाले तेव्हढे परत कधीच झाले नाहीत. रिकी पॉंटिंगचा माज उतरवण्यासाठी म्हणून गांगुलीच्या टीमचे प्लेअर्स दुप्पट जिद्दीने खेळायचे. अनेकदा अनेक सामन्यामध्ये त्यांनी तसे करूनही दाखवले.

आपण भारतीय फॅननी किती जरी त्याच्या नावाने बोटे मोडली तरी रिकी पॉंटिंगला आपण मैदानात मिस करतो हे नक्की. त्याच्या टीमला हरताना बघायला जी मजा यायची ती वर्ल्ड कप पेक्षा पण जास्त भारी असायची.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.