दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं

गोष्ट आहे सहाव्या की सातव्या शतकातली. यापूर्वी महाराष्ट्रात वाकटकांचे राज्य होते. मात्र शेवटचा राजा हरिषेणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राज्य दक्षिणेतील पल्लवांकडे गेलं. ते महाराष्ट्रापासून दूर राहत असल्यामुळे त्यांचे या प्रदेशाकडे दुर्लक्ष होणे सहाजिक होते.

कर्नाटकातील बदामी चालुक्यांनी हा प्रदेश जिंकला. त्यांच्याच शिलालेखांत महाराष्ट्र असा पहिला उल्लेख येतो.

परकीय राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली, शिवाय याच काळात पर्यावरणात प्रचंड बदल घडून येत असल्यामुळे दुष्काळ वारंवार पडू लागला. शेतीची दुरवस्था झाली. व्यापार मंदावला.

दर तीन-चार वर्षांनी दुष्काळ येत होता. त्यातच रोगराईचा तडाखा नित्याचा होता. कधीकधी दुष्काळ 12 वर्षे टिकल्याचा उल्लेख आहे.

या दुष्काळाला दुर्गादेवी दुष्काळ असे म्हटले गेले आहे.

मार्कंडेय पुराण हे सहाव्या शतकातले. थोर संस्कृत गद्यलेखक दंडीन हा याच काळातला त्याच्या दशकुमारचरिता मध्ये असेच एक बारा वर्षे सतत पडणाऱ्या दुष्काळाचे वर्णन आहे. धान्य उगवत नाही, अन्नान दशा झाली आहे.लोक बायका पोरांना विकत आहेत पण विकत घ्यायला कोणी नाही. रस्त्यात माणसे, जनावरे मरून पडली आहेत.

दांडीन हा पल्लवांच्या दरबारात होता. याकाळातील समकालीन ग्रंथामध्ये या दुष्काळाचे वर्णन आढळते.

वाराणसी सकट अनेक तीर्थक्षेत्रे निर्मनुष्य झाली आहेत,

कलियुग अवतरले आहे असे उल्लेख आढळतात.

सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवाशी ह्युएन त्संग लिहितो की, श्रावस्ती, कपिलवास्तू सारखे भरभराटीला आलेले व्यापारी शहरे देखील ओस पडली आहेत. कांची, वैशाली, कुशीनगर सगळी कडे हीच स्थिती आहे. रेशीम उद्योग कारागिर देशोधडीला लागले आहेत.

जाव्हानीज क्रोनिकल या ऐतिहासिक ग्रंथात सहाव्या शतकात पश्चिम भारतात प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे तेथील राजाने आपल्या राजपुत्रासह हजारो सैनिक कारागीर शेतकरी यांना जाव्हा (इंडोनेशिया) बेटांवर पाठवले असा थेट उल्लेख आहे.

हा भारतीयांचे इंडोनेशियाला झालेले पहिले स्थलांतर मानले जाते.

तिथल्या भाषेवरही महाराष्ट्रातील प्राकृत आणि तामिळनाडूच्या तामिळ भाषेतील शब्दांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

पुढे भारतातून या बेटांवर स्थलांतर सुरूच राहिले. इंग्रज सत्ता आल्यावर त्यांनी तिथल्या मळ्यात कामे करण्याच्या निमित्ताने हजारो मुसलमान, हिंदू सर्व समाजातील लोकांना नेले.

म्हणूनच आज तिथे लाखो भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांनीच इंडोनेशिया देशाला भारताची छोटी बहीण अशी ओळख मिळवून दिली आहे.

संदर्भ- महाराष्ट्राची कुळकथा

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.