….अशा पद्धतीने येडीयुरप्पा विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतात…!!!

 

कर्नाटकाची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार, हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. सत्ता वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दुपारी ४ वाजता कर्नाटक विधानसभेत ‘फ्लोअर टेस्ट’ होणार आहे. या ‘फ्लोअर टेस्ट’मध्ये बहुमत सिद्ध करण्यात जर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आलं तर भाजपचं सरकार कोसळेल आणि येडीयुरप्पा हे केवळ ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला १११  सदस्यांची आवश्यकता असणार आहे. आजच्या विधानसभेतील ‘फ्लोअर टेस्ट’च्या पार्श्वभूमीवर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप काय-काय युक्त्या आणि क्लृप्त्या वापरू शकते, यावर एक नजर…

  • कर्नाटकात भाजपचे स्वतःचे १०४ आमदार आहेत, म्हणजेच बहुमतासाठी भाजपला अजून ७ आमदारांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे भाजप काँग्रेस किंवा जनता दलातील ८ आमदारांना फोडून आपल्या बाजूला मतदान करण्यास सांगू शकते. असं झालं तर भाजपचं बहुमत सिद्ध होऊ शकेल.
  • विश्वास मतासारख्या महत्वाच्या प्रस्तावावर ज्यावेळी ज्यावेळी मतदान होणार असतं त्यावेळी बहुतांश वेळा महत्वाचे पक्ष आपला ‘व्हीप’ घोषित करतात. या ‘व्हीप’मुळे पक्ष सदस्यांना आपल्या पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे, त्या बाजूनेच मतदान करावं लागतं. एखाद्या सदस्याने जर या ‘व्हीप’चे पालन केले नाही तर त्याचे पक्ष सदस्यत्व रद्द होत. असं असलं तरी त्या सदस्याचं पक्ष सदस्यत्व आणि विधानसभा सदस्यत्व नंतर रद्द होतं. विश्वासमताच्या वेळी त्या सदस्याने ज्या बाजूने मतदान केलं, त्याच बाजूने त्याचं मत गृहीत धरलं जातं. त्यामुळे काँग्रेस आणि जनता दलाच्या आमदारांना आपल्या बाजूने मतदान करायला सांगून नंतर त्यांना निवडून आणण्याचा पर्याय भाजपसमोर उपलब्ध आहे.
  • ‘फ्लोअर टेस्ट’च्या वेळी विधानसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षातील काही सदस्यांना निलंबित करू शकतात, त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असणारा संख्याबळाचा आकडा कमी होऊन आपलं बहुमत सिद्ध करणं भाजपला शक्य होऊ शकतं. सध्या ज्या घडामोडी होताहेत, त्यावरून असंच काही होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविण्यात येतेय.
  • विरोधी पक्षातील काही आमदारांना विश्वासमताच्या वेळी विधानसभेत अनुपस्थित राहायला सांगण्यात येऊ शकते. विरोधी पक्षातील आमदारांच्या अनुपस्थितीमुळे आपोआपच बहुमत सिद्ध करण्यासाठीचा आकडा कमी होईल आणि सत्ता टिकवणे भाजपला शक्य होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.